अन्न संस्कारित आणि शुद्ध करून खाण्याचे महत्त्व !

 ‘अन्नग्रहण ही आपली सर्वांत महत्त्वाची आणि मूलभूत गरज ! आपण सर्वजण जीवन जगण्यासाठी अन्नावर सर्वस्वी अवलंबून आहोत आणि त्यासाठीच आयुष्यभर आपली धडपड चालू असते. आपल्यापैकी काही जण घरी बनवलेले अन्न जेवत असू, तर काही जण बाहेरचे ! मथळा आणि ही प्रस्तावना वाचून आपल्यापैकी काहींना वाटू शकते की, कदाचित् लेखाचा विषय ‘बाहेरचे अन्न खाऊ नका’, असा काहीतरी असेल; कारण ते भेसळयुक्त, अस्वच्छ वातावरणात सिद्ध केलेले किंवा ते सिद्ध करण्यासाठी सांडपाणी वापरलेले असते किंवा उंदीर, झुरळ, पाली यांनी उष्टावलेले, तर काही वेळेला जिहादींनी थुंकी लावलेले असते. असो. या सर्वच गोष्टी आपल्या नेहमीच्याच झाल्याने किंवा अंगवळणी पडल्याने म्हणा, कदाचित् लेख वाचण्याचा कंटाळा येईल; कारण या विषयावर आता सामाजिक माध्यमांमध्ये बर्‍याचदा जागृती होत असते. जे खर्‍या अर्थाने जागृत आहेत, ते याविषयी आवश्यक ती काळजी घेतात आणि काही जागृत नागरिक बाहेरचे खाण्याच्या आवडीला भुलून डोळे बंद करून ते अन्न खराब वा निकृष्ट दर्जाचे आहे, हे माहिती असूनही ग्रहण करतात.

अर्थात् हा व्यक्तीस्वातंत्र्याचा विषय असल्याने कुणी कुठले आणि कोणते अन्न खावे ? याविषयी आम्ही आग्रही नाही; परंतु आज आपण वाचणार असलेला विषय हा आपल्या अनुभवातील असला, तरी कळत-नकळतपणे आपण त्याकडे तितक्याशा गांभिर्याने पहात नाही आणि म्हणूनच आपल्याला बर्‍याचशा शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास यांना सामोरे जावे लागते. अन्नग्रहणाच्या माध्यमातून होणारे त्रास आपल्याला होऊ नयेत, त्या त्रासांचे स्वरूप आणि ते होऊ नये, यासाठी करावयाचे प्रयत्न अशी काही सूत्रे लेखात मांडत आहे. ‘ही सूत्रे कृतीत आणण्याची बुद्धी आम्हास होवो’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !

जेवतांना अन्नपूर्णामातेला प्रार्थना करून अन्नग्रहण करा !

१. अन्नामुळे मनाची जडणघडण होते !

आपण जे अन्न ग्रहण करतो, त्यातून आपल्या मनाची जडणघडण होत असते. सामान्यतः सात्त्विक अन्न ग्रहण करणारी व्यक्ती मनाने सात्त्विक, तर मांसाहारादी भोजन करणारी व्यक्ती मनानेही तामसी असते. हे आपण सर्वच जण साधारणपणे अनुभवत असतो. काही लोकांना हे बुद्धीने पटत नाही; परंतु अन्नामुळे होणारा संस्कार हा कालांतराने दिसून येतोच.

श्री. योगेश जलतारे

सात्त्विक अन्न ग्रहण करणारी व्यक्ती प्रतिकूल प्रसंगात स्वतःवर नियंत्रण मिळवू शकते. तिच्यामध्ये तामसिक अन्न ग्रहण करणार्‍या व्यक्तीच्या तुलनेत संयम अधिक असतो आणि अशी व्यक्ती सद्सद्विवेकबुद्धीने कार्य करण्याची क्षमता बाळगते. याउलट तामसिक अन्न ग्रहण करणार्‍या व्यक्ती असंयमी, उतावीळ आणि स्वभावदोष यांनी ग्रासलेल्या असतात. याला काही अपवादात्मक उदाहरणे असू शकतात; परंतु अधिकतर लोकांवर अन्नाचा परिणाम होतच असतो. त्यामुळेच आपल्याकडे चातुर्मासात कोणते अन्नपदार्थ खावे किंवा न खावे, याची नियमावली असते. हे नियम केवळ धर्मनियम म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे हानीकारक ठरू शकते; कारण आयुर्वेदानुसार आरोग्याच्या दृष्टीनेही ते घातक असते.

२. अन्नावर व्यक्तीच्या वृत्तीचा संस्कार होतो !

अन्नामुळे मनाची जडणघडण होते, म्हणजे अन्नामुळे व्यक्तीच्या मनावर संस्कार होतात, तसेच कोण व्यक्ती अन्न सिद्ध करते, त्या व्यक्तीच्या वृत्तीचा संस्कार अन्नावरही होत असतो. आपल्या घरातीलच उदाहरण अभ्यासाच्या दृष्टीने पाहूया. आपण प्रत्येकाने आपल्या आईच्या हातचे, बहिणीने सिद्ध केलेले जेवण ग्रहण केलेले असते. विवाहितांनी पत्नीच्या हातच्या जेवणाची चवही घेतलेली असते. काही वेळेला आपण बाहेर नातेवाइकांकडे किंवा उपाहारगृहात जेवायला जातो, तेव्हा नातेवाईक किंवा आचारी यांनी सिद्ध केलेले आणि ‘वेटर’ने (वाढप्याने) वाढलेले जेवण आपण जेवतो. आता या सर्वांच्या वृत्तीचा परिणाम अन्नावर होत असतो.

स्वयंपाक करतांना प्रसन्न मनाने, नामजप करत स्वयंपाक बनवा !

आई जेव्हा मुलाला वाढते, तेव्हा तिची मुलाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते. ‘मुलाने पोटभर जेवावे, धष्टपुष्ट व्हावे’, असे प्रत्येक आईला वाटत असते आणि त्यासाठी प्रसंगी ती स्वतः उपाशी रहाते. त्यामुळे आईच्या हातच्या जेवणातून आपल्याला ममता, वात्सल्य अनुभवायला येते. हाच अनुभव थोड्या बहुत फरकाने बहिणीच्या हातचे जेवण जेवल्यावरही येतो; परंतु बहिणीची भावाकडून अपेक्षा असू शकते. किमान ‘भावाने जेवणाचे कौतुक करावे, चांगले म्हणावे’, हा विचार बहिणीच्या मनात राहिल्याने आपल्याला कदाचित् १०० टक्के समाधान मिळणार नाही. पत्नी जेव्हा तिच्या पतीला वाढते, तेव्हा स्वाभाविकपणे ‘पतीने जेवणाचे कौतुक करावे’, अशी अपेक्षा पत्नीच्या मनात असते. काही बायका नवर्‍याकडून स्वतःच्या मागण्या किंवा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी पतीचे आवडते पदार्थ बनवत असल्याचेही आपण ऐकतो. त्यामुळे पत्नीने वाढलेल्या अन्नावरही तिच्या सापेक्षतेचा संस्कार होतो. बाहेर उपाहारगृहात जेव्हा आपण जेवतो, तेव्हा उपाहारगृहाच्या मालकाला वाटते, ‘तेथे आलेल्या व्यक्तीने अधिकाधिक जेवावे आणि त्यातून आपल्याला अधिक पैसे मिळावे’, असा आर्थिक दृष्टीकोन असल्याने त्या जेवणावर तसाच परिणाम होतो. तेथील आचारी किंवा वाढणारा ‘वेटर’ कशा वृत्तीचा आहे, त्याच्या वृत्तीचा परिणाम अन्नावर होतो. उपाहारगृहात कुठल्याही प्रकारच्या भाव-भावना, प्रेम, वात्सल्य असे असत नाही. असते ते केवळ आर्थिक समीकरण !

त्यामुळे आईच्या किंवा घरच्या लोकांच्या हातचे जेवण जेवण्यात जे समाधान असते, ते बाहेरच्या जेवणात आपल्याला मिळत नाही. त्या जेवणात एकप्रकारे जडत्व असते. या उदाहरणातून व्यक्तीच्या वृत्तीचा परिणाम अन्नावर कसा होतो, हे आपल्या लक्षात येते.

३. अन्नाविषयीची वासना आणि परिणाम !

धर्मशास्त्रानुसार भोजन २ प्रकारे केले जाते, एक प्रत्यक्ष अन्नग्रहण करून आणि दुसरे अन्नाचा वास घेऊन. म्हणूनच देवासाठी नैवेद्य किंवा पितरांसाठी श्राद्धाचे जेवण सिद्ध करत असतांना विशेष काळजी घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. अन्नाचा वास घेऊन पोट भरते का ? तर हो ! मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणारे अधिकांश आचारी त्या ठिकाणी जेवत नाहीत; कारण स्वयंपाक केल्यानंतर अन्नाच्या वासाने त्यांची जेवणावरची वासना नष्ट होते. त्यांना न जेवताच पोट भरल्यासारखे वाटत असते.

घरचे बनवलेले अन्न ग्रहण करा !

आता अन्नाच्या वासाने खाण्याची वासना कशी जागृत होते, ते पाहूया. आपण कधीतरी एखाद्या उपाहारगृहाच्या बाजूने जात असतांना तेथे कुठलीही भाजी फोडणीला घातली असेल, तर त्या वासाने आपली खाण्याची वासना जागृत होते. आपल्या अन्नाच्या वासनेचा प्रभाव त्या अन्नावर होत असतो. एकप्रकारे त्या अन्नावर आपली वासना गेल्याने ते काही प्रमाणात का होईना, दूषित झालेले असते. असे अन्न जेव्हा अन्य व्यक्ती ग्रहण करते, तेव्हा तिला ते पचायला जड जाते. काही प्रसंगात असे अन्नग्रहण केल्याने व्यक्तीला पोटाचे विकार होऊ शकतात. अर्थात् हा अतिशय सूक्ष्म भाग असल्याने आपल्याला ते सहज लक्षात येत नाही; परंतु बाहेर जेवून आल्यानंतर शरिराला जडत्व येणे, आळस वाढणे, अंग दुखणे, झोप आल्यासारखे वाटणे असे अनुभव येण्याची शक्यता असते. हे सर्व अनुभव त्या अन्नावर त्या व्यक्तीच्या वासनांच्या प्रभावाने झालेल्या संस्कारांचा दृश्य परिणाम असतो.

४. सूक्ष्म शक्तींच्या वासनांचा परिणामही अन्नावर होतो !       

आपण सदेह आहोत, आपले मन, बुद्धी कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला एखादे अन्न खावेसे वाटले किंवा एखाद्या अन्नावर आपली वासना गेली, तर आपल्याला कळते; परंतु जगामध्ये काही सूक्ष्म शक्तीही असतात. त्यांच्या वासनांचा परिणामही अन्नावर होत असतो. या शक्ती प्रत्यक्ष देहात असत नाहीत; परंतु त्यांना विशिष्ट पदार्थ खाण्याची आवड असल्याने त्यांचे मन त्या पदार्थात रहाते. त्यामुळेही तो पदार्थ दूषित होतो. काही वेळा या सूक्ष्म शक्ती इतरांच्या माध्यमातून आपल्या खाण्याच्या वासना पूर्ण करून घेतात.

उदाहरण सांगायचे, तर आमच्या एका हितचिंतकाची आजी काही आध्यात्मिक त्रासामुळे प्रतिदिन जेवणानंतर समोसे खायला मागायची. तिचा नातू बुद्धीजीवी आणि सुशिक्षित असल्याने त्याला अशा प्रकारचा काही विषय आध्यात्मिक कारणामुळे असतो, हा भाग पटत नसल्याने तो आजीला नियमित समोसे आणून द्यायचा. कालांतराने आजीचे देहावसान झाले आणि त्याच्या दुसर्‍या दिवसापासून संबंधित नातवाला प्रतिदिन जेवणानंतर समोसे खाण्याची इच्छा होऊ लागली. या उदाहरणातून सूक्ष्म शक्तींची अन्नावरील वासना कशी असते आणि तिचा परिणाम कसा होतो, हे आम्हाला लक्षात आले. काही गृहिणींना पुरेसे अन्न सिद्ध केलेले असतांनाही ते अपुरे पडणे किंवा प्रामुख्याने पितृपक्षात जेवणाचा अंदाज चुकणे, असे अनुभव निश्चितच आलेले असतील.

५. अन्न संस्कारित होण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

५ अ. स्वयंपाक करतांना श्लोक, मंत्र म्हणत किंवा नामजपासह करा ! : बर्‍याच गृहिणी स्वयंपाक करतांना भ्रमणभाषचा वापर करत स्वयंपाक करतात. काही चित्रपटाची गाणी ऐकतात. काही ठिकाणी गृहकलहामुळे स्वयंपाक करणार्‍या गृहिणीची मनःस्थिती खालावलेली असते. या सर्वांचा परिणाम स्वयंपाकावर होतो. हे टाळण्यासाठी स्वयंपाक करतांना श्लोक किंवा मंत्र पठण करा अथवा त्या वेळी आपल्या उपास्यदेवतेचा नामजप करा. असे करणे शक्य नसल्यास किमान स्वयंपाकघरात नामजप ऐकू येईल, असा भ्रमणभाषवर लावून ठेवा. असे केल्याने त्या नामजपाचा सात्त्विक परिणाम अन्नावर होईल.

उपाहारगृहात खाणे टाळा !

५ आ. आध्यात्मिक स्तरावरील उपाय ! : आपण घरी किंवा बाहेर जेवण करत असतांना यथासंभव जेवणाच्या पानाभोवती प्रार्थनापूर्वक गोलाकार पाणी फिरवा. असे करणे शक्य नसल्यास एखाद्या तीर्थक्षेत्राची विभूती किंवा तीर्थ आपल्या जवळ असल्यास ते पाण्यात घालून त्या पाण्याचे वा गोमूत्र अर्काचे पाणी सिद्ध करून त्याचे प्रक्षालन अन्नावर करू शकतो. हेही शक्य नसल्यास चिमूटभर विभूती अन्न पदार्थांवर घालू शकतो. असे केल्याने अन्नावर सात्त्विकतेचा संस्कार होऊन त्यातील दूषित स्पंदने नष्ट होण्यास साहाय्य होईल.

५ इ. प्रतिदिन देवतेला प्रार्थना करून मगच अन्नग्रहण करा ! : आपल्यापैकी बहुतेकांना अशी सवय असते की, ताटात जेवण वाढल्यावर लगेच आपण खायला आरंभ करतो; परंतु असे न करता ताटात वाढलेले अन्न आधी भगवंताच्या चरणी अर्पण करून ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायला हवे. असे केल्याने त्या अन्नावर झालेले बाह्य कुसंस्कार नष्ट होऊन भगवंताच्या आशीर्वादाचे संस्कार होतात आणि त्यातून आपल्याला लाभ होतो.

५ ई. नामजप करत अन्नग्रहण करा ! : घरी किंवा बाहेर कुठेही अन्नग्रहण करत असतांना ‘आपल्याला मिळालेले अन्न हे भगवंताच्या कृपेने मिळालेले आहे’, असा कृतज्ञताभाव मनात ठेवून नामजप करत अन्न ग्रहण करा. ‘असे केल्यास ते केवळ उदरभरण न होता एक यज्ञकर्म होते’, असे आपल्या संतांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे भोजन ग्रहण करत असतांना नामजप करण्याचा प्रयत्न करावा.

असे काही आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न आपण नियमितपणे केल्यास अन्नातून आपल्या मनावर होणारे कुसंस्कार दूर होऊन निश्चितपणे चांगले संस्कार होतील. यातून स्वतःचा लौकीकच नव्हे, तर आध्यात्मिक विकासही होईल, यात शंका नाही !’

(२८.९.२०२५)

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम.

संपादकीय भूमिका : आध्यात्मिक कृतींचे पालन केले, तर काही प्रमाणात का होईना, आपण ग्रहण करत असलेले अन्न निश्चितपणे संस्कारित आणि शुद्ध होईल !
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.