Home Minister Amit Shah : भारतात मुसलमानांची लोकसंख्या प्रजनन दरामुळे नाही, तर घुसखोरीमुळे वाढली !

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रोखठोक भूमिका !

  • ‘भारतावर एक हिंदू म्हणून जेवढा माझा अधिकार, तेवढाच पाकिस्तान-बांगलादेश येथील हिंदूंचा आहे’, असेही केले विधान !

  • देशातील घुसखोरांना हाकलून लावू ! – गृहमंत्री

नवी देहली : भारतात मुसलमानांची लोकसंख्या प्रजनन दरामुळे नाही, तर पाकिस्तान आणि बांगलादेश येथून झालेल्या घुसखोरीमुळे वाढली, अशी सडेतोड भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. ते येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी वर्ष १९५१ पासून २०११ पर्यंतच्या हिंदु आणि मुसलमान यांच्या लोकसंख्येचे आकडे ‍वाचून दाखवले. ते म्हणाले की, भारतात वर्ष १९५१ मध्ये ८४.१ टक्के हिंदु, तर ९.८ टक्के मुसलमान होते. वर्ष १९७१ मध्ये हे आकडे अनुक्रमे ८२.७२ टक्के आणि ११ टक्के, वर्ष १९९१ मध्ये ८१ टक्के आणि १२.१२ टक्के, तर वर्ष २०११ मध्ये हिंदूंची लोकसंख्या घटून ७९ टक्के, तर मुसलमानांची लोकसंख्या वाढून १४.२ टक्के इतकी झाली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. भारतात मुसलमानांची संख्या वाढण्याचे प्रमाण २४.६ टक्के राहिले. दुसरीकडे हिंदु ४.५ टक्क्यांनी अल्प झाले.

२. दुसरीकडे पाकिस्तानात वर्ष १९४७ मध्ये हिंदूंची लोकसंख्या १३ टक्के होती. आज अन्य अल्पसंख्यांकांसमवेत हिंदूंची संख्या मात्र १.७३ टक्के उरली आहे. तसेच बांगलादेशातही २२ टक्क्यांवरून ७.९ टक्क्यांवर हिंदु घसरले आहेत. त्यामुळे मला म्हणावेसे वाटते की, भारतावर एक हिंदु म्हणून जेवढा माझा अधिकार आहे, तेवढाच अधिकार पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचाही आहे.

३. घुसखोरीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. त्यांना राजकीय संरक्षण दिले जाऊ नये. आम्ही घुसखोरांना शोधून देशाबाहेर हाकलून लावू. आमचा देश काही धर्मशाळा नाही की, जगातील सर्व लोकांना आम्ही आत घेऊ. याने देश चालू शकणार नाही.

४. भाजपने (तत्कालीन भारतीय जन संघाने) वर्ष १९५० पासून ‘घुसखोरांना शोधा, हटवा आणि हद्दपार करा’, हे सूत्र स्वीकारले. आम्ही घुसखोरांना शोधू, त्यांना मतदारसूचीतून वगळू आणि या देशातून हाकलून लावू.

५. ‘घुसखोर कोण आहेत ?’, यावर प्रकाश टाकतांना ते म्हणाले की, ज्यांना धार्मिक छळ सहन करावा लागला नसतांनाही जे आर्थिक किंवा इतर कारणांमुळे अवैधपणे भारतात घुसले, ते घुसखोर होत.

६. घुसखोरी, तसेच निवडणूक आयोगाची मतदारसूची अद्ययावत करण्याच्या ‘विशेष गहन सुधारणा मोहिमे’कडे (मतदार सूची पडताळणीच्या प्रक्रियेकडे) राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. ही राष्ट्रीय सूत्रे आहेत. या प्रक्रियेत कुणीही हस्तक्षेप करू नये. ते निवडणूक आयोगाचे घटनात्मक दायित्व आहे.

७. मतदारसूचीत नाव समाविष्ट असलेल्या घुसखोरांना देशाच्या राजकीय प्रक्रियेचा भाग बनू देणे, हे राज्यघटनेच्या आत्म्याला भ्रष्ट करण्यासारखे आहे. मतदानाचा अधिकार केवळ त्यांनाच दिला पाहिजे, जे या देशाचे नागरिक आहेत.

मतपेटी नष्ट होत असल्यानेच काँग्रेसचा विरोध ! – शहा

काँग्रेसवर टीका करतांना गृहमंत्री शहा म्हणाले की, काँग्रेस मनमानी पद्धतीने वागत आहे. याचे कारण त्याची मतपेटी नष्ट होत आहे. जर तुम्हाला काही समस्या असेल, तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. मी देशातील सर्व नागरिकांना विचारू इच्छितो की, देशाचा पंतप्रधान कोण असेल ?, मुख्यमंत्री कोण असेल ?, हे ठरवण्याचा अधिकार देशातील नागरिकांव्यतिरिक्त इतर कुणालाही असावा का ?

संपादकीय भूमिका

अमित शहा यांच्या सडेतोड भूमिकेविषयी त्यांचे अभिनंदन ! देशात असलेल्या कोट्यवधी घुसखोरांना शोधून काढून त्यांना परत पाठवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू करावेत. यासाठी जनताही साहाय्य करील आणि देश घुसखोरमुक्त होईल !