Advocate Rakesh Kishore : सरन्यायाधिशांवर बूट फेकण्यामागे त्यांचे श्री विष्णूच्या संदर्भातील विधान कारणीभूत !

  • सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे अधिवक्ता राकेश किशोर यांचे स्पष्टीकरण

  • कृतीचा पश्चात्ताप नसल्याचेही विधान

सरन्यायाधीश भूषण गवई आणि अधिवक्ता राकेश किशोर (उजवीकडे)

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयात ६ ऑक्टोबरला सुनावणीच्या वेळी ७१ वर्षीय अधिवक्ता राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांची ३ घंटे चौकशी केली, तसेच त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा न नोंदवता त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेच्या संदर्भात अधिवक्ता राकेश किशोर यांनी ‘ए.एन्.आय.’ (एशियन न्यूज इंटरनॅशनल) या वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना स्वतःच्या कृतीचे समर्थन केले. त्यांनी, ‘सरन्यायाधिशांनी भगवान विष्णूविषयी केलेल्या विधानामुळे मला वाईट वाटले. त्यावर माझी ही प्रतिक्रिया होती. मी नशेत नव्हतो. जे घडले त्याचा मला पश्चात्ताप नाही आणि मी कुणाला घाबरत नाही’, असे स्पष्ट केले.

सरन्यायाधीश गवई यांनी खजुराहो येथील वामन मंदिरातील खंडित झालेली श्री विष्णूची मूर्ती पालटून दुसरी बसवण्याच्या मागणीवरील याचिकेवर सुनावणी करतांना याचिकाकर्त्याला ‘याविषयी देवालाच जाऊन सांग’, असे विधान करत याचिका फेटाळली होती. यामुळे समाजात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

अधिवक्ता राकेश किशोर यांनी मुलाखतीत व्यक्त केलेल्या भावना !

सरन्यायाधीश अन्य धर्मियांच्या संदर्भात मोठे निर्णय घेतात !

सरन्यायाधिशांनी १६ सप्टेंबर या दिवशी वामन मंदिरात खंडित मूर्तीच्या प्रकरणात सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्याला म्हटले, ‘तुम्ही जाऊन मूर्तीला प्रार्थना करा. देवाच्या मूर्तीला सांगा की, त्याने स्वतःचे डोके स्वतःच आधीच्या स्थितीत आणावे.’ त्यांच्या या वक्तव्यांमुळे मी दुखावलो गेलो. आपण पहातो की, हेच सरन्यायाधीश अन्य धर्मांच्या विरोधात, एखादे प्रकरण येते, तेव्हा मोठे (त्यांच्या बाजूने) निर्णय देतात. याचे उदाहरण म्हणजे हल्दवानी (उत्तराखंड) येथे रेल्वेच्या भूमीवर एका विशिष्ट समाजाचे (मुसलमानांचे) नियंत्रण आहे. जेव्हा ते हटवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली आणि ती आजपर्यंत आहे.

सनातन धर्मासंबंधी निर्णय देतांना सर्वाेच्च न्यायालय भेदभाव करते !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याचे जेव्हा प्रकरण सर्वाेच्च न्यायालयासमोर आले, तेव्हा न्यायालयाने त्यांना म्हटले, ‘तुम्ही वातावरण बिघडवले.’ जेव्हा सनातन धर्माशी संबंधित एखादे प्रकरण येते, मग ते जलिकट्टू (तमिळनाडूतील बैलाला पकडण्याचा पारंपरिक खेळ) असेल किंवा दहीहंडीची उंची निश्चित करायची असेल, त्यावर सर्वोच्च न्यायालय असा आदेश देत आले आहे की, ज्यामुळे मी फार दुःखी आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे करू नये. त्या व्यक्तीला दिलासा द्यायचा नसेल, तर नका देऊ; पण मग त्याची थट्टाही करू नका. मूर्तीच्या संदर्भातील याचिका करणार्‍याला सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, ‘त्या मंदिरातील मूर्तीसमोर ध्यान करा.’ ती याचिकाही फेटाळून लावली, हा अन्याय आहे. या सर्व गोष्टींमुळे मी फार दुःखी झालो.

मी कोणत्याही गटाचा भाग नाही !

मी हिंसेच्या विरोधात आहे; पण तुम्ही हेही पहा की, एक अहिंसक व्यक्ती, जिच्याविरुद्ध आजवर कोणताही गुन्हा नोंद नाही, जी कोणत्याही गटाची नाही, तिला हे सर्व का करावे लागले ? ही निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मीही कमी शिकलेलो नाही. माझे एम्.एस्सी., पीएच्.डी, एल्.एल्.बी. असे शिक्षण झाले असून मी सुवर्णपदक विजेता आहे.

दैवी शक्ती मला म्हणत होती, ‘देश जळत आहे आणि तू झोपला आहेस ?’

वामन मंदिरातील खंडित मूर्तीविषयी १६ सप्टेंबरनंतर निकाल लागल्यानंतर मला झोप लागली नाही. कोणतीतरी दैवी शक्ती मला झोपेतून जागे करून म्हणत होती, ‘हे तू काय करत आहेस ? देश जळत आहे आणि तू झोपला आहेस ?’ त्यामुळे हे मला करावे लागले.

सरकारच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवलेल्यांवर बुलडोझर चालवले जात आहेत !

घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या सरन्यायाधिशांनी ‘माय लॉर्ड’चा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. तुम्ही एखाद्याला भीक देऊ शकत नसाल, तर किमान त्याचे भांडे तरी फोडू नका. त्याचा इतका अपमान तरी करू नका. त्याच्यापुढे तुम्ही (सरन्यायाधीश) मॉरिशससारख्या देशात जाता आणि म्हणता, ‘देश बुलडोझरने चालणार नाही.’ माझा सरन्यायाधीश आणि मला विरोध करणारे यांना प्रश्न आहे की, ज्या लोकांच्या विरोधात बुलडोझर चालवले जात आहेत, त्यांनी सरकारच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी अतिक्रमण करून त्या भूमीवर मोठे महल आणि हॉटेल बांधली आहेत. त्यांच्या विरोधात योगीजी (योगी आदित्यनाथ) बुलडोझर चालवत आहेत, ती कारवाई चुकीची आहे का ?

हिंदु धर्मातून बाहेर पडून बौद्ध धर्म स्वीकारल्याने सरन्यायाधीश दलित राहिलेले नाहीत !

दलित सरन्यायाधिशांवर आक्रमण झाल्यावरून निषेध होत आहे. यावर राकेश  किशोर म्हणाले की, माझे नाव डॉ. राकेश किशोर आहे. कुणी माझी जात सांगू शकतो का ? मी दलितही असू शकतो. तुम्ही या गोष्टीचा लाभ उचलत आहात की, सरन्यायाधीश दलित आहेत. ते दलित नाहीत. ते सर्वांत आधी सनातनी हिंदु होते. ते हिंदु दलित होते आणि त्यानंतर त्यांनी सर्व सोडून बौद्ध धर्म स्वीकारला, हेही मला ठाऊक आहे. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जर त्यांना ‘हिंदु धर्मातून बाहेर पडलो’, असे वाटत असेल, तर मग आता ते दलित कुठे राहिले ? ही मानसिकतेची गोष्ट आहे. जे सरन्यायाधिशांना ‘दलित’ म्हणत आहेत, ते सर्व लोक सरकार पडून देश पुन्हा गुलाम व्हावा, अशी इच्छा बाळगून आहेत, हे तर त्यांचे राजकारण आहे.

परमात्म्याने जे करवून घेतले, ते मी केले असल्याने क्षमा मागणार नाही !

मला कसलाही पश्चात्ताप नाही आणि मी क्षमाही मागणार नाही. मी काहीच केले नाही. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करत आहात. परमात्म्याने जे करवून घेतले ते मी केले.  त्याची इच्छा असेल की, मी कारागृहामध्ये जावे किंवा मला फाशी दिली जावी, तर ती परमात्म्याची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी.

राकेश किशोर यांचा परवाना रहित

सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने अधिवक्ता राकेश किशोर यांचा वकिली करण्याचा परवाना रहित केला आहे. त्यांची नोंदणी वर्ष २०११ पासूनची आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियानेही त्यांना तात्काळ निलंबित केले. निलंबनाच्या काळात किशोर कुठेही वकिली करू शकणार नाही. १५ दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीसही बजावली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केला होता निषेध !

सरन्यायाधीश यांच्यावरील बूट फेकण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिखाण करून निषेध केला होता. त्यांनी लिहिले की, प्रत्येक भारतीय सरन्यायाधिशांवर झालेल्या आक्रमणामुळे संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. अशा परिस्थितीत सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेल्या संयमाचे मी कौतुक करतो. त्यांचा संयम न्याय आणि राज्यघटना यांच्या मूलभूत तत्त्वांना बळकटी देण्यासाठी त्यांची पूर्ण वचनबद्धता दर्शवते.

↓ सविस्तर वृत्त वाचा ↓

Shoe Hurled On CJI : सरन्यायाधीश गवई यांच्यावर अधिवक्त्याकडून बूट फेकण्याचा प्रयत्न

संपादकीय : …पण ही वेळच का यावी ?