ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव कराचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग

माध्यम संवाद परिषद २०२५ मध्ये ‘ट्रम्प, टॅरिफ आणि मिडिया’ यावर मार्गदर्शन !

‘ट्रम्प, टॅरिफ आणि मिडिया’ या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तसेच अन्य

कोल्हापूर, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प हा विक्षिप्त मनुष्य असून भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद न करणे, तसेच अन्य कारणे यांमुळे  त्यांचा अहंकार दुखावला गेला आहे. यामुळे त्यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात कर लावला आहे. असे असले, तरी भारताची अर्थव्यवस्था ही निर्यातीवर अवलंबून नसून भारत देशांतर्गत होणार्‍या व्यापारावर अवलंबून आहे. भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून जगात ६.९ टक्के उत्पादन वाढीचा दर असणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव कराचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही, असे ठाम मत राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मांडले.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

शिवाजी विद्यापीठ, विद्यापीठ विकास मंच, वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभाग, विश्व संवाद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माध्यम संवाद परिषद २०२५’मध्ये ‘ट्रम्प, टॅरिफ आणि मिडिया’ (टॅरिफ म्हणजे आयातशुल्क) यावर शिवाजी विद्यापिठात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, ‘विद्यापीठ विकास मंच’चे निमंत्रक श्री. स्वागत परूळेकर, विद्यापिठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे यांसह अन्य उपस्थित होते.

१. अनेक देशांमध्ये आता अतीउजव्या विचारधारेची सरकारे येत आहेत, जी केवळ त्यांच्या राष्ट्रांचा विचार करतात. अशा स्थितीत जागतिक स्थितीचा समन्वय ठेवणारी संयुक्त राष्ट्रे, ‘जागतिक शांतता परिषद’ यांसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्था कमकुवत होत चालल्या आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या अगोदर जी स्थिती होती, तीच स्थिती आताही आहे. अशा स्थितीत भारताने अधिकाधिक स्वयंपूर्ण होत स्वदेशीकडे वळणे आवश्यक आहे. संरक्षणक्षेत्रातही आपल्याला स्वयंपूर्ण व्हावे लागेल.

२. ट्रम्प यांच्या पहिल्या कारकीर्दीत ते चीनला शत्रू मानत असल्याने त्यांचे ‘धोरण हे भारतियांना जवळ करणे’, असे होते. आता अमेरिका चीनला केवळ व्यापारी स्तरावरील शत्रू मानते. त्यामुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणात पालट झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

अन्य काही क्षेत्रांवर आयात शुल्क वाढण्याची शक्यता असल्याने त्याची सिद्धता ठेवावी लागेल !

‘भारत झुकत नाही’, हे लक्षात आल्यावर येणार्‍या काळात ट्रम्प यांनी अन्य क्षेत्रांवर आयात शुल्क वाढवू शकतात. त्यासाठी भारतियांनी मनाची सिद्धता ठेवली पाहिजे. अमेरिका जी-७ राष्ट्रांना (कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या ७ विकसित देशांना) ‘भारताकडून वस्तू खरेदी करू नका’, असे सांगू शकते, तसेच सेवा क्षेत्रावर कर लादू शकते.

अमेरिकेचे दुटप्पी धोरण !

जी अमेरिका भारताला ‘रशियाकडून तेल खरेदी करू नका’, असे सांगते, तीच अमेरिका आणि अन्य युरोपीय देश अब्जावधी रुपयांच्या विविध वस्तू रशियाकडून खरेदी करतात. अब्जावधी रुपयांच्या वस्तू खरेदी करणार्‍या युरोपियन देशांवर अमेरिका कसलाही कर लावत नाही. याउलट भारतावर तो लादते. यावरून अमेरिकेचे दुटप्पी धोरण लक्षात येते.

३. ट्रम्प हे जर खरोखर सक्षम असते, तर त्यांनी त्यांच्या देशातील १० लाख सरकारी कर्मचार्‍यांना घरी पाठवले नसते. त्यामुळे ज्यांना स्वत:ची अर्थव्यवस्था वाचवता येत नाही, ते इतरांना काय साहाय्य करणार ?

४. या संदर्भात माध्यमांनी जनतेचे सकारात्मकरितीने प्रबोधन करावे. सध्या मोठ्या प्रमाणात भारतात परकीय गुंतवणूक वाढत असून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहेत. आपल्याला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून स्वदेशीवर भर द्यावा लागेल. श्रीलंका, नेपाळ इथे जे झाले तसे भारतात होणार नाही; कारण भारत हा लोकशाही चांगल्या प्रकारे रूजलेला देश आहे.