‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी तळमळ असलेले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे) !

‘आश्विन शुक्ल चतुर्दशी (६.१०.२०२५) या दिवशी पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे साधिकेत झालेले पालट अन् तिला आलेली अनुभूती’ यांविषयी पुढे दिले आहे.

पू. शिवाजी वटकर

पू. शिवाजी वटकर यांच्या चरणी त्यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. सतत शिकण्याच्या स्थितीत असणे आणि नम्रता 

‘पू. शिवाजी वटकरकाका सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. ते संत असूनही त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक साधकाशी नम्रतेने बोलतात.

२. प्रीती

माझा अनेक वर्षे पू. वटकरकाकांशी संपर्क नव्हता. गेल्या ६ मासांपासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त जाते. तेव्हा काही वेळा माझी पू. काकांशी भेट झाली. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली. त्यांनी प्रथम भेटीतच मला आपलेसे करून घेतले. त्यांच्याशी बोलतांना ‘देवच त्यांच्या रूपातून माझ्याशी बोलत आहे’, असे मला जाणवले.

सौ. आदिती देखणे

३. ‘साधिकेची साधना चांगली व्हावी’, अशी तळमळ

३ अ. साधिकेच्या साधनेच्या स्थितीविषयी आस्थेने ऐकून घेऊन मार्गदर्शन करणे : मी त्यांना माझ्या साधनेच्या स्थितीविषयी सांगत असतांना त्यांनी माझे पूर्ण बोलणे आस्थेने ऐकून घेतले आणि मला साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. मी त्यांच्याशी बोलत असतांनाच माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. पू. काकांचे बोलणे ऐकून मला हलकेपणा जाणवला.

३ आ. स्वतःला होणार्‍या शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करून मार्गदर्शन करणे : एकदा मी पू. काकांशी बोलत असतांना ‘त्यांना तीव्र शारीरिक वेदना होत असाव्यात’, असे माझ्या लक्षात आले, तरीही ते मला ‘साधनेचे प्रयत्न कसे करायला हवेत ?’, याविषयी सांगत होते.

३ इ. साधिकेची मनःस्थिती ओळखून तिला साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणे : पू. काका त्यांच्या संपर्कात येणार्‍या साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करतात. पू. काकांमध्ये समष्टी साधनेची तीव्र तळमळ आहे. मी काही न बोलताच ते अनेक वेळा माझी मनःस्थिती जाणतात आणि माझे स्वभावदोष अन् साधनेतील अडचणी यांवर मला मार्गदर्शन करतात.

३ ई. ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी तळमळ : ‘साधकांची साधना चांगली होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि साधकांच्या अडचणी सुटून ते आनंदी व्हावेत’, अशी पू. काकांना तळमळ आहे. त्यांनी सांगितलेली सूत्रे ऐकून त्याप्रमाणे प्रयत्न करायला मला प्रोत्साहन मिळते.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

अ.  पू. वटकरकाकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अनेक कविता रचल्या आहेत. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती’ यांविषयी पू. काकांनी लेख लिहिले आहेत. त्यातून सर्व साधकांना पुष्कळ शिकायला मिळून त्यांना साधनेची दिशा मिळते.

आ. पू. काका प्रत्येक प्रसंगातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेविषयी सांगतात. त्यामुळे साधकांची भावजागृती होते आणि साधक पू. काकांनी सांगितल्यानुसार सहजतेने कृती करतात.

इ. पू. काका संत आहेत आणि ते वयाने अन् अनुभवानेही मोठे आहेत. असे असूनही ‘मी परम पूज्यांचा एक साधक आहे’, असाच पू. काकांचा भाव असतो. पू. काकांकडून ‘गुरुभक्ती कशी करावी ?’, हे साधकांना शिकायला मिळते.

५. पू. वटकरकाकांच्या मार्गदर्शनानुसार साधनेचे प्रयत्न केल्यावर साधिकेमध्ये झालेले पालट

५ अ. प्रत्येक परिस्थिती स्वीकारता येणे आणि मनाची शांतता अन् स्थिरता वाढणे : माझा परिस्थिती स्वीकारतांना संघर्ष होत असे. पू. काकांनी सांगितले, ‘‘प्रत्येक कृती करत असतांना श्रीकृष्णाला आळवायला हवे. सर्व ईश्वरेच्छेने होत असून त्यात माझे कल्याणच होणार आहे’, असा भाव ठेवायचा.’’ पू. काकांचे हे वाक्य माझ्या मनावर बिंबल्यामुळे माझ्याकडून प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याचा भाग वाढला आहे. माझ्या मनाचा अधिक संघर्ष न होता मनाची शांतता आणि स्थिरता वाढल्याची मला अनुभूती आली.

५ आ. माझ्याकडून नामजपादी उपाय नियमित होत नव्हते. पू. काकांनी सांगितल्यानुसार वेळेचे नियोजन करून मी नामजप करत आहे. आता माझा दिवसातून किमान २ घंटे नामजप होतो.

५ इ. सेवेला आरंभ करण्यापूर्वी जाणीवपूर्वक प्रार्थना करू लागल्याने ‘सेवा अधिक परिपूर्ण आणि आनंददायी होत आहे’, असे जाणवणे : पू. काकांनी सांगितले, ‘‘सेवेला आरंभ करण्यापूर्वी देवाला ‘ही सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी होऊ दे. यातून माझी साधना होऊ दे. तूच माझ्याकडून ही सेवा करून घे’, अशा प्रार्थना कराव्यात.’’ नंतर मी जाणीवपूर्वक प्रार्थना करू लागले. त्यानंतर ‘आता माझी सेवा अधिक परिपूर्ण आणि आनंददायी होत आहे’, असे मला जाणवले.

५ ई. घरातील कामे करतांना ‘आश्रमातील सेवा करत आहे’, असा भाव ठेवल्याने आनंद मिळणे : काही दिवसांपूर्वी आम्ही दुसर्‍या घरात स्थलांतर केले. त्या कालावधीत मी बसून नामजप करू शकत नव्हते. माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. याविषयी मी पू. काकांना सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘घरात रहात असतांना ‘आपण आश्रमातच आहोत’, असा भाव ठेवल्यास आपल्याकडून आश्रमाप्रमाणेच घरीही सेवा होईल. घरातील कामे करत असतांनाही देवाचे स्मरण करून त्याला आळवावे आणि सेवा म्हणून सर्व करावे.’’ पू. काकांनी सांगितल्यानुसार मी घरी असतांनाही ‘आश्रमात सेवा करत आहे’, असा भाव ठेवून घरातील कामे करू लागले. त्यातून मला आनंदही मिळतो.

(पू. वटकरकाकांनी शिकवलेले हे सूत्र सर्वच साधकांनी कृतीत आणावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२९.९.२०२५))

५ उ. सकारात्मक राहून चूक स्वीकारता येणे : माझ्यातील बहिर्मुखतेमुळे मी इतरांच्या चुकांकडे पहायचे आणि मला स्वतःच्या चुका स्वीकारता येत नसत. या संदर्भात पू. काकांनी मला सांगितले, ‘‘आपण साधना म्हणून चुका स्वीकारायला हव्यात.’’ आता मला सकारात्मक राहून चूक स्वीकारता येते आणि त्यातून मला शिकता येते.

५ ऊ. कुणी कसेही वागले, तरी स्थिर राहून त्यांच्याशी चांगले वागता येणे : पूर्वी ‘मी सर्वांशी चांगले वागते; मात्र अन्य व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाहीत. मी योग्य तेच करते, तरीही अन्य व्यक्ती मला त्रास देतात’, असे वाटत असे. याविषयी मी पू. काकांना सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘आपल्या प्रारब्धामुळे आपल्याशी कुणी कटू वागत असेल, तर ‘ही परिस्थिती माझ्या प्रगतीसाठीच आहे’, असे समजावे. आपण इतरांना विनाकारण प्रतिक्रिया दिल्या, तर आपल्याला त्रास होतो. नामजपादी उपाय करून आणि मनावर नियंत्रण ठेवून साधनेवर लक्ष केंद्रित करावे. सर्व अनावश्यक विचार सोडून द्यावेत.’’

पू. काकांनी सांगितल्यानुसार मी नामजपादी उपाय केले आणि स्वयंसूचना घेतल्या. आता माझ्याशी कुणी कसेही वागले, तरीही मला स्थिर राहून त्या व्यक्तीशी चांगले वागता येत आहे.

५ ए. मायेतील विचार न्यून होऊन अनुसंधान वाढणे : पू. काकांनी सांगितल्यानुसार माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक चांगली किंवा वाईट गोष्ट मी देवाशी जोडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझ्या मनातील मायेतील विचार न्यून होऊन माझे अनुसंधान वाढले आहे.

५ ऐ. माझी भावजागृती होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साधना आणि सेवा करतांना मला आनंद जाणवत आहे.

५ ओ. पू. काकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ‘या कालावधीत माझ्या संपूर्ण जीवनाला आणि साधनेला फार सुंदर वळण िमळत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

चल ऊठ हिंदु बांधवा धर्मरक्षण्यासी ।

‘चल ऊठ हिंदु बांधवा धर्मरक्षण्यासी ।
आता ही वेळ नसे झोपण्याची ।। धृ. ।।

आतंकवाद, भ्रष्टाचार, धर्मांधता गेली कळसाला ।
फसू नको निधर्मी अन् शत्रूला ‘भाई भाई’ म्हणणार्‍याला ।। १ ।।

आठव त्या समर्थ रामदासस्वामींच्या श्लोकांना ।
शरण जाऊनी भगवंताला सिद्ध हो धर्मासाठी लढण्याला ।। २ ।।

आठव त्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला ।
जागृत हो भवानीच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र स्थापण्याला ।। ३ ।।

आठव त्या गीता सांगणार्‍या श्रीकृष्णाच्या वचनाला ।
भिऊ नकोस तू मरणाला अन् धर्मासाठी लढण्याला ।। ४ ।।

झुगारून दे सारी बंधने संप्रदाय नि जाती-पातीची ।
संघटनेच्या बळावर पहाट होऊ दे ‘हिंदु राष्ट्रा’ची ।। ५ ।।

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

६. पू. वटकरकाकांचे बोलणे ऐकून आलेली अनुभूती

‘अंतरातील प.पू. गुरुदेवांच्या अस्तित्वाची जाणीव पुष्कळ प्रमाणात वाढली आहे’, असे जाणवणे : एकदा मी पू. काकांना एक कटू प्रसंग स्वीकारल्याविषयी सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व स्वीकारले’, हे परम पूज्यांना सूक्ष्मातून कळल्यावर त्यांना किती आनंद झाला असेल ! त्यांना तुमचे किती कौतुक वाटले असेल !’’ पू. काकांचे बोलणे ऐकून ‘माझ्या अंतरातील प.पू. गुरुदेवांच्या अस्तित्वाची जाणीव पुष्कळ प्रमाणात वाढली आहे’, असे मला जाणवले.

पू. वटकरकाकांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. वटकरकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. आदिती देखणे, विचुंबे, नवीन पनवेल, जिल्हा रायगड. (१०.१.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक