UN Human Rights : पाक सरकार त्याच्या अनेक प्रांतांमधील जनतेवर करत आहे अनन्वित अत्याचार !

  • संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानच्या विविध संघटनांची तक्रार

  • पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तूनख्वा, तसेच सिंध प्रांतांमधील संघटनांनी उठवला आवाज

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – येथे चालू असलेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकव्याप्त काश्मीर, तसेच पाकमधील खैबर पख्तूनख्वा आणि सिंध या प्रांतांमधील विविध मानवाधिकार संघटनांनी पाक सरकारच्या विरोधात आवाज उठवला. ‘सेंटर फॉर ह्युमन राइट्स अँड पीस ॲडवोकसी’ ने (‘मानवाधिकार आणि शांतता वकिलाती केंद्रा’ने) आयोजित केलेल्या ६० व्या अधिवेशनात ‘पाकिस्तानमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांसाठी आवाज उठवणे, त्यांना न्याय मिळवून देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाईची मागणी’ या विषयावर चर्चा झाली. या वेळी वक्त्यांनी सांगितले की, पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर लोकांचे अपहरण केले जाते, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना ठार मारले जाते किंवा कैदेत ठेवले जाते.

तब्बल ६ सहस्र ५०० पश्तुनी नागरिक बेपत्ता !

या कार्यक्रमात ‘पश्तून तहफ्फुझ चळवळ’ या संघटनेचे नेते फजल-उर-रहमान अफरीदी यांनी सांगितले की, खैबर पख्तूनख्वा प्रांतात त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक बेपत्ता होत आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत आणि त्यांचा जीव घेतला जात आहे. अलीकडेच आम्ही पश्तून समाजातील ६ सहस्र ५०० बेपत्ता प्रकरणांची नोंद संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. याखेरीज सिंधी आणि बलुची लोकांच्यासुद्धा सहस्रो तक्रारी आहेत. पाक सरकार आम्हाला ‘आतंकवादी’ ठरवून दडपशाही करत आहे.

पाकव्याप्त काश्मिरातील आंदोलकांवर गोळीबार !

परिषदेत पाकव्याप्त काश्मीरचे निर्वासित कार्यकर्ते आणि ‘युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’चे प्रवक्ते नासिर अजीज खान यांनी सांगितले की, २७ सप्टेंबरला ‘अवामी ॲक्शन कमिटी’च्या शांततामय आंदोलनावर पाक सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेकजण ठार झाले. २९ सप्टेंबरपासून १० हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. शेकडो लोकांना अटक करून कारागृहात त्यांचा छळ करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांना मी आवाहन करीन की, त्यांनी तेथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करावा.

सिंधी लोकांनीह आवाज उठवला !

या बैठकीत ‘विश्व सिंधी काँग्रेस’चे कार्यकर्ते कमरान जटोई यांनी सांगितले की, सिंधमध्ये जे लोक सरकारच्या विरोधात आवाज उठवतात, त्यांनाही बळजोरीने कारागृहात डांबले जाते. आतंकवादविरोधी न्यायालयांचा गैरवापर होत असल्याचा त्यांनी आरोप केला.

संपादकीय भूमिका

काश्मीरवर अधिकार सांगणार्‍या पाकिस्तानला घरचा अहेर ! अर्थात् आता भारताने पाकिस्तानमधील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बलुचिस्तानसमवेतच पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तूनख्वा, सिंध या प्रांतांना पाकपासून वेगळे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव बनवणे आवश्यक !