Bareilly Violence : उत्तरप्रदेशात कुणाचे शासन आहे ?, हे मौलाना विसरल्याने त्यांना असा धडा शिकवू की, त्यांच्या पिढ्या दंगल करायच्या विसरून जातील ! – योगी आदित्यनाथ

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांनी हिंसाचार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे प्रकरण

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व मौलाना तौकीर रझा

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सत्तेत कोण आहे ?, हे मौलाना विसरले आहेत. त्यांना असे वाटले होते की, ते धमकावतील आणि बलपूर्वक रस्ते अडवतील. आम्ही म्हटले होते की, नाकेबंदी होणार नाही किंवा संचारबंदीही लावली जाणार नाही. आम्ही तुम्हाला असा धडा शिकवू की, तुमच्या भावी पिढ्या दंगल करणे विसरतील, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेली येथे ‘आय लव्ह महंमद’ वरून केलेल्या हिंसाचारावर मुसलमानांना खडसावले. येथे हिंसाचार करणार्‍यांवर पोलिसांनी लाठीमार करत त्यांना हाकलवून लावले होते. या प्रकरणात आतापर्यंत इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचा अभ्यासक) तौकीर रझा यांच्यासह ८ जणांना अटक केली आहे, तर ६० हून अधिक जणांची कह्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. आरोपींकडून एक पिस्तूल, पेट्रोल बाँब, दगड, विटा जप्त करण्यात आल्या. या हिंसाचारात २२ पोलीस घायाळ झाले होते. मौलाना तौकीर रझा यांच्या आवाहनावरूनच मुसलमान येथे आंदोलनासाठी गोळा झाले होते आणि दुपारच्या नमाजपठणानंतर हिंसाचार चालू केला होता.

बुलडोझर वापरणे चालूच रहाणार !

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आधी दंगलखोरांना मुख्यमंत्री निवासात आमंत्रित करून त्यांचा गौरव केला जात होता, गुन्हेगारांना सत्ताधारी ‘सलाम’ करत होते; पण काळ पालटाला आहे. आम्ही जो धडा शिकवला आहे, त्यावरून येणार्‍या पिढ्या दंगली करण्यापूर्वी दोनदा विचार करतील. धार्मिक द्वेष वाढवणार्‍यांच्या विरोधात बुलडोझर वापरणे चालूच आहे. जे लोक धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवतात, त्यांच्या विरोधात बुलडोझर वापरला जाणार आहे.

बाराबंकी येथे तणाव !

उत्तरप्रदेशातील बाराबंकीमध्ये २६ सप्टेंबरच्या रात्री उशिरा ‘आय लव्ह महंमद’ लिहिण्यात आलेले फलक फाडून टाकल्यानंतर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

लक्ष्मणपुरी येथे ‘आय लव्ह बुलडोझर’चे फलक

उत्तरप्रदेशाची राजधानी लक्ष्मणपुरीच्या रस्त्यांवर नवीन फलक लावण्यात आले आहेत. त्यावर, ‘आय लव्ह श्री योगी आदित्यनाथ जी’ आणि ‘आय लव्ह बुलडोझर !’, असे लिहिण्यात आले आहे.

‘आय लव्ह महंमद’ एक षड्यंत्र ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

पुरीच्या श्री गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी  अलीगडमध्ये म्हटले की, लोक येतात आणि जातात. महंमदही आले आणि गेले. तथापि अशा मोहिमांमागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामागे एखादा सूत्रधार असू शकतो, जो देशातील लोकांना भडकवण्याचे काम करत आहे.

कायदा हातात घेऊ नका ! – मौलाना शहाबुद्दीन

अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी म्हणाले की, बरेली येथे नमाजपठणानंतर घडलेली घटना दुर्दैवी आहे. अशा घटना कोणत्याही बाजूने घडू नयेत. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. पैगंबर-ए-इस्लामवर प्रेम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणालाही दुखापत करू नये. प्रेषित महंमद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला; म्हणून मी सर्व मुसलमानांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कुणाशीही भांडू नका – ना पोलिसांशी ना प्रशासनाशी ! पैगंबरांनी सांगितलेल्या गोष्टींचे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे पालन करा. हेच सर्वांत मोठे प्रेम आहे.

वाराणसीमध्ये ४ जणांना अटक

वाराणसीमध्ये पोलिसांनी अनुमतीविना ‘आय लव्ह महंमद’ असे फलक हातात धरून मिरवणूक काढल्याबद्दल ४ जणांना अटक केली. राज्यातील लोहटा परिसरात, ‘आय लव्ह महमंद’ लिहिलेले फलक घेऊन मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे) अशा घोषणा दिल्याबद्दल पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

कानपूरपासून चालू झाले प्रकरण

कानपूरमध्ये ४ सप्टेंबर या दिवशी ‘बरवाफत’ (ईद मिलाद-उन-नबी) मिरवणुकीच्या वेळी मिरवणुकीच्या मार्गावर ‘आय लव्ह महंमद’ असे लिहिलेले फलक लावले. स्थानिक हिंदु संघटनांनी निषेध केल्यानंतर पोलिसांनी फलक काढून टाकले आणि ९ जणांविरुद्ध तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. याच्या निषेधार्थ मुसलमान देशभरात ‘आय लव्ह महंमद’चे समर्थन करणारे मोर्च काढत आहेत, तसेच फलक लावत आहेत. याला हिंदूंनी ‘आय लव्ह महादेव’  लिहिलेले फलक लावून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात कुणाचे शासन आहे ?, हे भारतियांना आणि पाकिस्तान्यांनाही  ठाऊक झाले आहे; मात्र तसे शासन देशातील अन्य राज्यांत का दिसून येत नाही ? असा प्रश्नही हिंदूंना पडला आहे !