सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा करतात. एक म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमीपर्यंतच्या काळात आराधना करतात, तिला ‘वासंतिक नवरात्र’ म्हणतात, तर आश्विन शुक्ल प्रतिपदा ते आश्विन शुक्ल नवमीपर्यंतच्या काळात केलेल्या आराधनेला ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित असल्यामुळे येथे तिच्याविषयी विवेचन केले आहे. २५ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नवरात्र, ऐतिहासिक महत्त्व आणि व्रत करण्याची पद्धत’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग २)
या लेखाचा आधीचा/मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/960320.html
७. गरबा

(प्रांतभेद : गुजरातमध्ये मातृशक्तीचे प्रतीक म्हणून नवरात्रात अनेक छिद्रांच्या मडक्यात ठेवलेला दीप किंवा दिवा पुजला जातो. स्त्रीच्या सृजनात्मकतेचे प्रतीक म्हणून ९ दिवस पुजल्या जाणार्या ‘दीपगर्भ’ मधल्या ‘दीप’ शब्दाचा लोप होऊन गर्भ-गरभो गरबो किंवा गरबा असा शब्द प्रचलित झाला.)
नवरात्री उत्सवात गरबा किंवा दांडिया खेळला जातो. याविषयीची सद्य:स्थिती पहाता गरबा खेळण्याचा नेमका उद्देश किंवा शास्त्र काय आहे ? आणि यामध्ये गैरप्रकार वाढले आहेत याविषयी समजून घेऊया.
आ. गरबा खेळणे हे घटाचे प्रतीक : गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

इ. गरबोत्सवातील अनुचित प्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा ! : पूर्वी ‘गरबा’ या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत. नवरात्रोत्सवातील गरबा, म्हणजे श्री देवीची सामूहिक नृत्योपासना होय. आज भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. ‘रिमिक्स’, पाश्चात्त्य संगीत किंवा चित्रपटगीते यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करत गरब्याच्या नावाखाली ‘डिस्को-दांडिया’ खेळला जातो. या वेळी अनैतिकतेला उत्तेजन देणारी उत्तेजक वेशभूषा आणि स्त्री-पुरुषांचे नृत्य, तसेच व्यभिचारही होतो. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण आदी प्रकारही घडतात. हे अपप्रकार, म्हणजे धर्म आणि संस्कृती यांची हानी होय. हे अपप्रकार रोखणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच आहे.
(सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या गेल्या काही वर्षांपासून या अपप्रकारांविरुद्ध जनजागृती चळवळ राबवतात. यात आपणही सहभागी व्हा !)
८. सार्वजनिक धार्मिक उत्सवांत काय असावे ? आणि काय नसावे ?
अ. भव्य मंडप, डॉल्बी ध्वनीवर्धक, कृत्रिम अन् विद्युत् सजावट यांवर अनाठायी व्यय (खर्च) टाळा !
आ. आरत्या कर्णकर्कश आवाजात नव्हे, तर एक सुरात आणि सुस्पष्ट म्हणा ! वाद्ये हळू वाजवा !
इ. विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा अतिरेक, ध्वनीवर्धकांद्वारे ध्वनीप्रदूषण, हिडीस नाच, फटाके, महिलांशी असभ्य वर्तन आणि मद्यपान आदी अधर्माचरण करू नका !
९. कलियुगातील असुर (दुष्प्रवृत्ती)

अ. अत्याचारी महिषासुराच्या वधासाठी श्री दुर्गादेवीने अवतार घेऊन ९ दिवस केलेल्या युद्धाचे प्रतीक म्हणजे नवरात्र ! आज कलियुगातही काही असुर विविध रूपांनी जनतेला त्रास देत आहेत. आतंकवाद, भ्रष्टाचार, व्यभिचार, धर्मांतर आदी विविध रूपांतून ते कार्यरत आहेत. आज कायद्याचा धाकच न उरल्याने भगिनींची छेडछाड, तसेच विनयभंग, बलात्कार यांसारखे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. आपल्या हिंदु भगिनींना आपण या गैरप्रकारांच्या विरोधात लढण्यासाठी साक्षात् दुर्गास्वरूप बनवले पाहिजे.
आ. आज हिंदूंच्या सणांवर धर्मविरोधकांचे अनेक आक्षेप असतात. त्यांना संधी मिळू नये यासाठी आणि आपला उत्सव हा धार्मिकतेने होण्यासाठी आपणच प्रयत्न केल्यास इतरांना आपल्याकडे बोट दाखवताच येणार नाही. यासाठी बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे, या प्रकारांसह नवरात्रोत्सवात मद्यपान करणे, आधुनिक चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, अश्लील अंगविक्षेप करत नाचणे आदी उत्सवाचे पावित्र्य नष्ट करणारे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
इ. नवरात्रोत्सवाच्या काळात होणार्या अनैतिक प्रकारांमुळे गर्भपाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याची वृत्ते अनेक दैनिकांत प्रसिद्ध झाली आहेत. अनेक वृत्तांमध्ये या काळात गर्भनिरोधक ‘कंडोम’ची विक्री अनेक पटींनी वाढत असल्याचे, तसेच नवरात्रीनंतरच्या काळात मुलींचे गर्भपाताचे प्रमाणही वाढले असल्याचे अनेक डॉक्टरांचे निरीक्षण असल्याचे लक्षात आले आहे. असे आहे का आपल्या उत्सवांचे स्वरूप ?
ई. हा आपल्या धार्मिक उत्सवांचा उद्देश तर नाहीच, यामुळे समाजाची पर्यायाने स्वधर्माची आणि राष्ट्राची हानीच होत आहे. त्यातच देशावरील आतंकावादाचे सावट, हिंदु सणांच्या वेळीच होणार्या दंगली या पार्श्वभूमीवर सतर्कताही आवश्यक आहे. नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी अशा समाजकंटक व्यक्ती घुसण्याची शक्यता आहे.
उ. या अत्याचारांचेच एक मायावी रूप म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! प्रेमाच्या नावाखाली हिंदु युवतींना स्वतःच्या जाळ्यात फसवून त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवणे, धर्मांतर करणे, आतंकवादी कारवायांत साहाय्य करण्यास भाग पाडणे, असे या ‘लव्ह जिहाद’चे भयंकर स्वरूप आहे. अनेक धर्मांध तरुण हिंदु असल्याचे भासवून गरब्यामध्ये सहभागी होतात, हिंदु मुलींना आकर्षित करतात, त्यांच्यासह उशिरापर्यंत थांबून वा रात्री घरी सोडण्याच्या निमित्ताने जवळीक निर्माण करतात. शीतपेये वा खाद्य पदार्थांच्या माध्यमातून गुंगीचे औषध देऊन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या अनेक घटना घडतात. यातून एका षड्यंत्राद्वारे हिंदु संस्कृती संपवण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत.
ऊ. हिंदु भगिनींना याविषयी जागृत करून, त्यांचे प्रबोधन करून हिंदु संस्कृती वाचवणे, हे या नवरात्रातील श्री दुर्गादेवीची कृपा प्राप्त करण्याचे साधन आहे. हिंदु जनजागृती समिती आणि ‘रणरागिणी’ शाखा यासाठी प्रयत्नशील आहेत. असे होऊ नये, यासाठी नवरात्रोत्सव काळात आपल्या परिसरातील सार्वजनिक मंडळांना भेटून याविषयी जागृती करून त्यांना त्यांच्या त्यांच्या स्तरावर पुढील उपाययोजना राबवण्यास सांगू शकतो –
ऊ १. दांडिया आणि नवरात्रोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणी ओळखपत्र समवेत आणण्याची सक्ती करणे
ऊ २. कार्यक्रमाच्या ठिकाणी कपाळाला टिळा-कुंकू लावूनच प्रवेश देणे.
ऊ ३. मुलींची छेड काढणार्यांना प्रतिरोध करणारे प्रशिक्षित युवक कार्यकर्ते ठेवणे.
ऊ ४. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी येतांना कुटुंबातील व्यक्तीला समवेत आणण्याची विनंती करणे.
ए. देवीचे विडंबन रोखणे : सध्या देवतांचे विविध प्रकारे विडंबन होते, उदा. हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढून ती खुल्या (जाहीर) विक्रीसाठी ठेवली होती; व्याख्याने, पुस्तके आदींच्या माध्यमातून देवतांवर टीका केली जाते; व्यापारी हेतूने विज्ञापनांमध्ये देवतांचा ‘मॉडेल’ म्हणून वापर केला जातो; देवतांची वेशभूषा करून भीक मागितली जाते, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका राजकीय पक्षाचे नेते प्रचारार्थ रस्त्यावर भित्तीपत्रक लावतात. यामध्ये महिला उमेदवाराला देवीच्या रूपात दाखवले जाते.
ए १. देवतांचे विडंबन रोखणे, ही समष्टी स्तराची उपासना देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालते. यामुळे ही धर्महानी ठरते. धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे, ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे. ही उपासना केल्याविना देवतेची उपासना पूर्ण होऊच शकत नाही. यास्तव देवीभक्तांनीही याविषयी जागरूक होऊन धर्महानी रोखायला हवी.
ए २. देवतांचे विडंबन रोखण्यासाठी हे करा !

अ. देवतांची नग्न/अश्लील चित्रे काढून प्रदर्शन भरवणार्यांच्या आणि त्या चित्रांची विक्री करणार्यांचा निषेध करावा !
आ. देवतांचे विडंबन करणारी विज्ञापने, उत्पादने, वृत्तपत्रे आणि कार्यक्रम (नाटक इत्यादी) यांवर बहिष्कार टाकावा !
इ. देवतांची वेशभूषा करून भीक मागणार्यांना रोखावे !
ई. देवतांच्या विडंबनामुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून पोलिसांकडे तक्रार करावी !
उ. हिंदु जनजागृती समितीला याविषयी कळवावे, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवून त्याविषयी वृत्त पाठवावे.
(सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती गेली २३ वर्षे उत्सवांतील अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी प्रबोधन आणि देवतांचे विडंबन रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रबोधनामुळे देशभरातील अनेक मंडळांनी चांगले प्रयत्न केले आहेत. हे जनहिताचे कार्य अधिक व्यापक होण्यासाठी या मोहिमेत धर्माभिमानी हिंदूंनी सक्रीयपणे सहभागी होणे आवश्यक आहे. आपण आदर्श नवरात्रोत्सव साजरा करून श्री दुर्गादेवीचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊया.)
(क्रमशः)
– सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती, सातारा.
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
#Boycott_Amazon : हिंदु जनजागृती समितीकडून ‘ॲमेझॉन इंडिया’ला कायदेशीर नोटीस !