
कोल्हापूर – गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी दान केलेला दीड किलो सोन्यापासून सिद्ध केलेला सुवर्ण कळस श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराच्या शिखरावर बसवण्यात आला. १२ जूनच्या पहाटे ४ वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाली. सध्या मंदिरात जतन-संवर्धनाचे काम चालू आहे. त्यामुळे काम पूर्णत्वास गेल्यानंतर योग्य मुहूर्त पाहून त्याची विधीवत् प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, असे ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’चे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

१. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या शिखरावर पावसाचे पाणी झिरपत असल्याने दगडी भागावर झुडपे आणि गवत उगवू लागले होते. शतकानुशतके इतिहास जपणार्या या प्राचीन शिखराचे संरक्षण कसे करायचे ? यावर चर्चा चालू झाली. त्यातून शिखराच्या आकाराचे तांब्याचे संरक्षक आवरण बसवण्याची संकल्पना पुढे आली. शिखराची मोजमापे घेऊन आराखडे सिद्ध झाले. याच कालावधीत गोवा येथील प्रतापसिंह राणे हे कोल्हापूर येथे आले असता त्यांनी मुख्य कळसावर सुवर्ण कळस बसवण्याची मनीषा व्यक्त केली. त्यानंतर राणे यांनी हा कळस सिद्ध करून तो देवीला अर्पण केला.

२. देवीच्या मंदिराचे मूळ शिखर ६ फूट उंच असून त्यावरील गोलाकार डेरा साडेसात फूट व्यासाचा आहे. काळ्या दगडातील या शिखराचा बारकाईने अभ्यास करून त्याला साजेसा कळस सिद्ध करण्याचे काम हाती घेण्यात आले. प्राचीन वास्तूच्या मूळ सौंदर्याला धक्का न लावता तिचे वैभव अधिक खुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळस निर्मितीचे दायित्व कर्नाटक राज्यातील मंगलोरमधील कुशल कारागिरांकडे सोपवण्यात आले. मंदिर स्थापत्यातील पारंपरिक शैली आणि आधुनिक तांत्रिक अचूकतेचा संगम साधत दीड किलो सोन्याचा कळस साकारण्यात आला.
३. शिखराचा आकार, उंची, वार्याचा दाब आणि हवामानाचा परिणाम लक्षात घेऊन हा कळस सिद्ध करण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने २०० किलोचे तांब्याचे आवरण आणि इतर साहित्य शिखरापर्यंत पोचवण्यात आले.
४. पावसाचे पाणी झिरपणार नाही, यासाठी कळसाच्या भोवतीच्या गोलाकार डेर्याला तांब्याचे २०० किलो वजनाचे आवरण बनवण्यात आले आहे. कासव मंडपावरील कळसावर पहिले आवरण बसवण्यात आले, यानंतर मंदिराच्या मुख्य शिखरावरील कळसाचे काम पूर्ण करण्यात आले.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.