हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !

हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्या पार्थिवाला अभिवादन करतांना ‘जनसुराज्य शक्ती पक्षा’चे आमदार विनय कोरे

कोल्हापूर – जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय सैन्याचे २ सैनिक हुतात्मा झाले. यात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावाचे सुपुत्र वीर सैनिक विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर १२ जून या दिवशी गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर शासकीय पद्धतीत (इतमामात) आणि साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ, ३ विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघ्या ३ वर्षांची मुलगी वीरा असा परिवार आहे.

हुतात्मा सैनिक विक्रम चव्हाण यांचे पार्थिव मूळ गावी गोंडोली येथे आणण्यात आल्यानंतर, ‘वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरमधून तालुक्यात जातांना आणि गावात असंख्य लोकांनी त्यांच्या योगदानाला अभिवादन करत पुष्पवृष्टी केली.

पार्थिव काही काळ घरी ठेवण्यात आले; त्यानंतर वारणा नदीच्या तीरावर सैन्य आणि पोलीस यांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून या वीर सुपुत्राला अंतिम सलामी दिली आणि शासकीय पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, तहसीलदार सीमा सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी, सैन्यदलाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील माजी सैनिक आणि पंचक्रोशीतील सहस्रो नागरिक या वीर सुपुत्राला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी उपस्थित होते.