
शूरविरांचा जिल्हा म्हणून ओळख असणार्या सातारा जिल्ह्याने शिवकाळामध्ये स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांतीसाठी अनेक मावळे अन् क्रांतीकारक निर्माण केले. शिवछत्रपतींनी सह्याद्रीच्या या पावन भूमीमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाचा वध करून भीमपराक्रम केला. याची नोंद संपूर्ण जगाला घ्यावी लागली. आज त्याच प्रतापगडाजवळ असणार्या महाबळेश्वरमध्ये अक्षरशः अनैतिकतेच्या बाजार मांडला गेला आहे. पर्यटननगरी महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे ‘नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. येथील निसर्गसौंदर्य, शांतता आणि सुरक्षित पर्यटन म्हणून भारतामध्ये महाबळेश्वरची वेगळी ओळख आहे; मात्र गत काही वर्षांपासून शहरांमध्ये मोठ्या संख्येने फोफावलेल्या ‘स्पा सेंटर’च्या (‘मसाज केंद्रां’च्या) संशयास्पद कार्यपद्धतीमुळे महाबळेश्वरच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे.

महाबळेश्वरच्या कानाकोपर्यात ‘स्पा सेंटर’ची संख्या वेगाने वाढत आहे; मात्र यातील बहुतांश केंद्रांकडे आवश्यक अधिकृत अनुमतीपत्र नाहीत. ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली भलतेच ‘उद्योग’ राजरोसपणे चालू आहेत, अशी शंका स्थानिक नागरिकांना आहे. वाढत्या ‘स्पा सेंटर’च्या अनियंत्रित व्यवसायामुळे महाबळेश्वरची सामाजिक आणि सांस्कृतिक वीण उसवत आहे, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. या उद्योगामुळे स्थानिक युवती, महिला आणि माता-भगिनींचे सामान्य जीवन असुरक्षित झाले आहे. महाबळेश्वरमधील सुरक्षेमुळे रात्री-अपरात्री महिला पर्यटक किंवा कुटुंबे निश्चिंतपणे फिरत असतात; मात्र वाढत्या ‘स्पा सेंटर’च्या संख्यांमुळे पर्यटकांच्या मनामध्ये अनाहूत भीती निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस आणि प्रशासन यावर कोणतीही कारवाई करतांना दिसत नाहीत. पोलीस आणि प्रशासन यांच्यातील कुणाच्या वरदहस्ताने ‘स्पा सेंटर’ जोमाने चालू आहेत, याची पडताळणी होणे आवश्यक आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांचे ‘स्पा सेंटर’वाल्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत का ? असा संशय निर्माण होतो.
स्वराज्य स्थापनेमध्ये योगदान देणार्या सातारा-महाबळेश्वरची प्रतिष्ठा जपण्यासाठी का होईना, पोलीस आणि प्रशासन यांना ‘स्पा सेंटर’वर कठोर कारवाई करावीच लागेल. यासाठी पोलीस, नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन यांनी तातडीने संयुक्त पथक निर्माण करावे. शहरातील अनियंत्रित आणि अनधिकृत ‘स्पा सेंटर’ची अनुमतीपत्रे अन् प्रत्यक्ष कार्यपद्धत यांची सखोल चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करून त्याचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, हीच स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !