थोडक्यात महत्त्वाचे : १३.०६.२०२६

‘नेस्को’च्या २ अधिकार्‍यांना जामीन !

मुंबई – गोरेगावमधील ‘नेस्को’ येथे आयोजित पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या दोघांना जामीन संमत झाला. कार्यक्रमाचे वरिष्ठ व्यवस्थापक सनी जैन आणि बाळकृष्ण कुरूप अशी त्यांची नावे आहेत. १ लाख रुपयांची हमी देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.


नवी मुंबईत मेट्रो विस्तारास शासनमान्यता !

नवी मुंबई – नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासाला चालन देण्यासाठी मेट्रोच्या विस्तार प्रकल्पाला राज्यशासनाने संमती दिली. २ मेट्रो मार्गांमुळे पनवेल, तळोजा, कळंबोली आणि विमानतळ परिसरातील नागरिक यांना जलद, सुरक्षित अन् आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.


कोयता टोळी सक्रीय !

बदलापूर – येथे काही तरुण मध्यरात्री हातात कोयते घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

संपादकीय भूमिका : असे आहे, तर पोलीस काय बघ्याची भूमिका घेतात का ?


सुरक्षारक्षकाला धडक; चालक अटकेत !

मुंबई – येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे वाहनचालकाच्या धडकेत सुरक्षारक्षक गणेश पवार (वय ३५ वर्षे) गंभीर घायाळ झाले असून चालक विनोद सिंग (वय ३५ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.


बैलजोडीच्या खर्चापायी शेतकर्‍याने मुलांना जोखडाला जुंपले

जळगाव – बैलजोडीचा खर्च परवडत नसल्याने पाचोरा तालुक्यातील शेतकरी ज्ञानेश्वर शहाणे यांनी स्वतःच्या २ मुलांना जोखडाला जुंपले आणि शेतात कपाशी लागवडीसाठी सर्‍या (लांबट उंच खोल पट्टे) पाडल्या. बाजारात बैलजोडीसाठी ८० सहस्र ते १ लाख रुपये खर्च येतो. तो परवडत नसल्याने शेतकर्‍याने वरीलप्रमाणे केले.


लाचखोर मोटार वाहन निरीक्षक अटकेत !

नागपूर – राज्य परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक आणि त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५०० रुपयांची लाच घेतांना अटक केली. साजन शेंडे आणि प्रवीण गायधने अशी त्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका : अशांना कठोर शिक्षा कधी होणार ?