पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विषारी मद्य प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये गावठी मद्य सिद्ध केले जाते, अशी गावे निश्चित केली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा जिल्ह्यांतील १८८ गावांच्या ग्रामपंचायतींना नोटिसा दिल्या आहेत. ‘गावाच्या परिसरात अनधिकृत गावठी मद्य धंदे, मद्य सिद्ध (तयार) करणार्‍या लोकांची माहिती विभागाला द्यावी’, अशी सूचना नोटिसीद्वारे केली आहे. (इतकी वर्षे हे का केले नाही ? – संपादक)

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात असलेल्या गावांमध्ये भट्ट्या पेटवून गावठी मद्य निर्मिती केली जाते. गावातील निर्जन भाग, शासकीय भूमींच्या परिसरातील झाडीत मद्यभट्ट्या उभ्या केल्या जातात, असे दिसून आले. पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी, कुंजीरवाडी, नांदूर, राजेवाडी, भोसलेवाडी, आपटी (शिरूर) या गावांसह १८८ गावांना नोटीस पाठवली आहे.

स्थानिक नागरिकांना धमकी

अनधिकृत मद्यधंद्यांची माहिती पोलिसांना देणार्‍या नागरिकांना मद्यनिर्मिती करणारे धमकी देतात. अशा लोकांना अनेकांचे ‘पाठबळ’ असते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीतील सदस्य उघडपणे तक्रार देण्यास घाबरतात, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत.