नवरात्र व्रतामागील इतिहास, महत्त्व आणि शास्त्र !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा करतात. एक म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमीपर्यंतच्या काळात आराधना करतात, तिला ‘वासंतिक नवरात्र’ म्हणतात, तर आश्विन शुक्ल प्रतिपदा ते आश्विन शुक्ल  नवमीपर्यंतच्या काळात केलेल्या आराधनेला ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित असल्यामुळे येथे तिच्याविषयी विवेचन केले आहे.

सनातननिर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र

१. नवरात्र (देवीचे व्रत)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले ३ दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे ३ दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे ३ दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

२. नवरात्रीमागील शास्त्र

‘रात्री’ म्हणजे होत असलेला पालट. देवीचे एक नाव ‘कालरात्री’ असे आहे.‘कालरात्री’ म्हणजे कालपुरुषात पालट घडवणारी. फिरणे हा पृथ्वीचा गुणधर्म आहे. पृथ्वीच्या फिरण्यामुळे पालट होत असतात, म्हणजे रात्र आणि दिवस होतात. अशा पालटांना सहन करण्याची क्षमता शरिरात असावी म्हणून व्रत करतात.

३. ऐतिहासिक महत्त्व

सौ. भक्ती डाफळे

आश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी या काळातील नवरात्रीला ऐतिहासिक महत्त्व आहे. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदमुनींनी श्रीरामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर श्रीरामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे ९ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणू लागले.

४. नवरात्रोत्सवाचे महत्त्व

जगात जेव्हा तामसी, आसुरी लोक प्रबळ होऊन सात्त्विक अन् धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुनःपुन्हा अवतार घेते. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटींनी कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादैव्ये नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करतात.

५. व्रत करण्याची पद्धत

अ. अनेक घराण्यांमध्ये या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुक्ल प्रतिपदेला घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी.

आ. नवरात्रोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (५ किंवा ७) धान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत.

इ. मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने वा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.

ई. सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोचेल अशी बांधावी.

उ. ९ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत शक्ती अधिक असते.

ऊ. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठण (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललितापूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण आदी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रीमहोत्सव साजरा करावा.

ए. उपवास असला, तरी देवतेला नेहमीप्रमाणे अन्नाचा नैवेद्य दाखवावा लागतो.

ऐ. या काळात उत्कृष्ट आचाराचे एक अंग म्हणून श्मश्रू न करणे (दाढी-मिशीचे आणि डोक्यावरील केस न कापणे), कडक ब्रह्मचर्य, पलंगावर अन् गादीवर न झोपणे, सीमा न उल्लंघणे, पादत्राणे न वापरणे, अशा विविध गोष्टींचे पालन केले जाते.

ओ. नवरात्रीच्या संख्येवर भर देऊन काही जण शेवटच्या दिवशीही नवरात्र ठेवतात; पण शास्त्राप्रमाणे शेवटच्या दिवशी नवरात्र उठणे आवश्यक आहे. त्या दिवशी समाराधना (भोजनप्रसाद) झाल्यावर वेळ उरल्यास त्याच दिवशी सर्व देव काढून अभिषेक आणि षोडशोपचार पूजा करावी. वेळ नसल्यास दुसर्‍या दिवशी सर्व देवांवर पूजाभिषेक करावा.

औ. देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी पेरलेल्या धान्याची झालेली रोपे देवीला वहातात. त्या रोपांना ‘शाकंभरीदेवी’ म्हणून स्त्रिया डोक्यावर धारण करून विसर्जनाला घेऊन जातात.

अं. नवरात्र बसतांना आणि उठतांना देवांचे उद्वार्चन अवश्य करावे. उद्वार्चनासाठी नेहमीप्रमाणे लिंबू, भस्म इत्यादी वस्तू वापराव्यात. रांगोळी किंवा भांडी घासायचे चूर्ण वापरू नये.

क. शेवटी स्थापित घट आणि देवी यांचे उत्थापन (विसर्जन) करावे.

ख. नवरात्र किंवा इतर धार्मिक विधींमध्ये दिवा अखंड तेवत रहाणे, हा पूजाविधीचा भाग असतांना तो वारा, तेल अल्प पडणे, काजळी धरणे इत्यादी कारणांमुळे विझल्यास ती कारणे दूर करून दिवा परत प्रज्वलित करावा आणि प्रायश्चित्त म्हणून अधिष्ठात्या देवतेचा १०८ किंवा १००८ इतका नामजप करावा.

ग. पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी, ‘हे देवी, आम्ही शक्तीहीन झालो आहोत, अमर्याद भोग भोगून मायासक्त झालो आहोत. हे माते, तू आम्हाला बळ देणारी हो. तुझ्या शक्तीने आम्ही आसुरी वृत्तींचा नाश करू शकू.’

घ. घागरी फुंकणे : अष्टमीला स्त्रिया श्री महालक्ष्मीदेवीची पूजा करतात आणि घागरी फुंकतात.

६. नवरात्रोत्सवामागील भावार्थ

असुर शब्दाची व्युत्पत्ती आहे, ‘असुषु रमन्ते इति असुरः ।’ म्हणजे प्राणातच, भोगातच रममाण होतात ते असुर होत. अशा महिषासुराचा आज प्रत्येक मनुष्याच्या हृदयात अल्प वा अधिक प्रमाणात वास असून त्याने मनुष्याच्या आंतरिक दैवीवृत्तींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या महिषासुराची माया ओळखून त्याच्या आसुरी विळख्यातून मुक्त होण्यासाठी शक्तीच्या उपासनेची आवश्यकता आहे. यासाठी नवरात्रीतील ९ दिवस शक्तीची उपासना करावी. दशमीला विजयोत्सव साजरा करावा. त्याला ‘दसरा’ म्हणतात.

७. गरबा

गर्भ किंवा गरबा : अनेक छिद्रांचे मातीचे मडके

(प्रांतभेद : गुजरातमध्ये मातृशक्तीचे प्रतीक म्हणून नवरात्रात अनेक छिद्रांच्या मडक्यात ठेवलेला दीप किंवा दिवा पूजला जातो. स्त्रीच्या सृजनात्मकतेचे प्रतीक म्हणून ९ दिवस पुजल्या जाणार्‍या ‘दीपगर्भ’मधील ‘दीप’ शब्दाचा लोप होऊन ‘गर्भ-गरभो गरबो’ किंवा ‘गरबा’ असा शब्द प्रचलित झाला.)

नवरात्री उत्सवात गरबा किंवा दांडिया खेळल्या जातात याविषयीची सद्य:स्थिती पहाता गरबा खेळण्याचा नेमका उद्देश किंवा शास्त्र काय आहे ? आणि यामध्ये गैरप्रकार  वाढले आहेत, याविषयी समजून घेऊया.

अ. ‘गरबा खेळणे’ म्हणजे काय ? : ‘गरबा खेळणे’ यालाच हिंदु धर्मात टाळ्यांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे’, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय.

नवरात्रीमध्ये कलेकलेने श्री दुर्गादेवीचे मारक तत्त्व जागृत होत असते. ब्रह्मा, श्रीविष्णु आणि महेश या ईश्वराच्या ३ प्रमुख कला आहेत. देवीचे मारक रूप या तीनही कलांच्या स्तरावर जागृत होण्यासाठी ३ वेळा टाळ्या वाजवून ब्रह्मांडातील देवीची शक्तीरूपी संकल्पशक्ती कार्यरत केली जाते; म्हणून ३ टाळ्यांच्या लयबद्ध हालचालीतून देवीचे गुणगान करणे अधिक इष्ट आणि फलदायी ठरते. ‘टाळ्या वाजवणे’, हे तेजाच्या आराधनेचे दर्शक आहे. टाळ्या वाजवून गोलाकार फेर धरून मंडल करून देवीतत्त्वाला आवाहन करणारी भक्तीयुक्त भजने म्हटल्याने देवीप्रती भाव जागृत होण्यास साहाय्य होते.

(क्रमशः)

– सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती, सातारा.