मोदी यांच्या कार्यकाळात गोव्याचा सर्वांगीण विकास झाल्याचेही उद्गार

पणजी, १२ जून (वार्ता.) – कलम ३७० रहित करून अखंड भारताचे स्वप्न साकार करणे, अयोध्येत भव्य श्रीराममंदिराची उभारणी करणे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महान कार्ये आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात गोव्याचा सर्वांगीण विकास झाला असून याचा गोमंतकियांना पुष्कळ मोठा लाभ मिळाला आहे, असे प्रशंसनीय उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षांचा सत्ताकाळ पूर्ण केल्यानिमित्त ‘१२ साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के’ या मोहिमेच्याअंतर्गत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर, तसेच माहिती अन् प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर हेदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडसी निर्णय घेत कलम ३७० रहित केले आणि जम्मू-काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणले. अयोध्येत भव्य अशा श्रीराममंदिराची उभारणी करून कोट्यवधी जनतेचे स्वप्न साकार केले. त्याचप्रमाणे देशातील नक्षलवाद आणि आतंकवाद मोडीत काढला. गेल्या १२ वर्षांत देशात ७० लाख कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. विमानतळांची संख्या दुप्पट झाली असून वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८४२ वरून २ सहस्र १०० वर पोचली आहे. गोवा राज्यात २९९ किलोमीटर महामार्गाच्या उभारणीसाठी ९९९ कोटी रुपयांचा निधी संमत झाला असून दळणवळणाच्या सुलभतेसाठी मोपाला जोडणार्या रस्त्यावर १ सहस्र १८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रेल्वे विकासांतर्गत २४ किलोमीटर मार्गाचे यशस्वी विद्युतीकरण पूर्ण झाले असून मडगाव-मंगळुरू आणि मडगाव-मुंबई या २ नव्या वन्दे भारत एक्सप्रेस गाड्या चालू झाल्या आहेत.’’
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, ‘‘भाजपमध्ये धर्माचे राजकारण केले जात नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक देतो. याच सर्व समावेशक धोरणामुळे ईशान्येकडील ख्रिस्तीबहुल राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले आहे.’’
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !