मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित

कारवाई करण्याची मागणी

फोंडा, १२ जून (वार्ता.) – बेळगाव येथून गोव्यात येणारी वाहने मोले तपासणीनाक्यावरून गोव्यात प्रवेश करतात. अशा वाहनचालकांकडून गोवा पोलिसांचे एक पथक अवैधपणे पैसे घेत असल्याचे प्रसारमाध्यमाच्या कॅमेर्‍यामध्ये चित्रीकरण झालेले आहे. यासंबंधीचे वृत्त ‘प्रूडंट’ वृत्तवाहिनीने प्रसारित केलेले आहे. सरकारने हा प्रकार रोखून परराज्यांतून गोव्यात येणार्‍या वाहनचालकांची होत असलेली फसवणूक त्वरित रोखण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

मोले तपासणीनाक्यावर शासनाने कॅमेरे बसवलेले आहेत आणि या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येक वाहनाची ऑनलाईन पडताळणी होते अन् वाहनाची आवश्यक कागदपत्रे नसल्यास वाहनाच्या मालकाला थेट चलन पाठवले जाते. ही सर्व यंत्रणा कार्यान्वित असतांना गोवा पोलिसांचे एक पथक तपासणीनाक्यापासून २०० मीटर अंतरावर परराज्यांतून येणारे प्रत्येक वाहन अडवते. त्यानंतर पथकातील काही पोलीस वाहनचालकांकडून कोणतीही पोचपावती न देता पैसे घेत असल्याचे वृत्तवाहिनीच्या कॅमेर्‍यात चित्रीकरण झालेले आहे. या ठिकाणी पोलिसांचे पथक २४ घंटे आळीपाळीने थांबतात आणि ही लूटमार गेली अडीच मास चालू आहे. आंतरराज्य वाहनचालकांना यांमुळे त्रास होत आहे. शासनाने ऑनलाईन दंड ठोठावण्याची यंत्रणा कार्यान्वित केलेली असतांना पोलिसांचे पथक अशा प्रकारे वाहनचालकांकडून पैसे वसूल का करतात ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

तपासणीनाक्यावरील भ्रष्टाचारामध्ये अनेक मंत्र्यांचा सहभाग ! – युरी आलेमाव, काँग्रेस

पणजी – मोले तपासणीनाक्यावर भ्रष्टाचार चालू आहे आणि यामध्ये राज्यातील अनेक मंत्र्यांचा सहभाग आहे. या प्रकरणी केवळ पोलिसांनाच दोष देऊन चालणार नाही, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. (मंत्र्यांचा हात आहे, हे युरी आलेमांव यांना ठाऊक होते, तर प्रूडंटने बातमी प्रसारित करण्यापूर्वी आलेमाव यांनी तक्रार का केली नाही ? प्रत्येक गोष्टीचे राजकारण कसे करायचे ते काँग्रेसवाल्यांकडून शिकावे ! – संपादक)