झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्‍या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !

सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

सिंधुदुर्ग – कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वेस्थानाकावरून अवैधरित्या सहस्रो टन खनिजसदृश मातीची रेल्वेने वास्को (गोवा) येथे वाहतूक केली जात आहे. त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैधरित्या उत्खनन केले जात आहे. यावर कडक कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर अन् सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे यांना अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारीच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले.

निवेदनात उपस्थित करण्यात आलेली सूत्रे …

१. जनसुनावणी न घेता खाण उद्योग कसा काय चालू करण्यात आला ? संबंधितांनी उत्खनन आणि वाहतूक यांसाठी आवश्यक असणार्‍या शासकीय अनुमती घेतल्या आहेत का ? कारण जिल्ह्यात मोठा खनिज घोटाळा होत आहे.

२. गेले दोन आठवडे झाराप रेल्वेस्थानकावरून पुष्कळ मोठ्या प्रमाणावर खनिजसदृश मातीची वाहतूक वास्को येथे होत आहे. गेल्या दोन आठवड्यांत १० ते १२ रेल्वेंतून प्रतिदिन माती भरून ती गोवा येथे नेली जात आहे.

३. दिवसाला ५००-६०० डंपर भरून आणण्यात येणार्‍या खनिजसदृश मातीच्या वाहतुकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदूषणाचा आणि अपघाताच्या भयाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

४. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक विकास क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेल्या खनिजसदृश मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहे. असे असतांना झाराप रेल्वेस्थानकावरून नेण्यात आलेली सहस्रो टन खनिजसदृश माती ही कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली आहे, हे जनतेला कळले पाहिजे. अशाच प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या अवैध उत्खननाच्या विरोधातदेखील कडक कारवाई करावी.