Ladakh Protest : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी लेहमधील आंदोलन हिंसक

  • आंदोलकांनी भाजपच्या कार्यालयाला लावली आग

  • पर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर

लेह (लडाख) – लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आणि राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करण्याची मागणी करत पर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषण करत आहेत. वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

या वेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गाडीसह अन्य वाहनांनाही आग लावण्यात आली. अन्य सार्वजनिक संपत्तींची हानी करण्यात आली. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आणि लाठीमार करत आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे.

पर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक

विद्यार्थ्यांकडून लडाखमध्ये लोकसभेसाठी २ जागा आणि लडाखच्या आदिवासी समाजाला ‘आदिवासी’ असा दर्जा देणे याही मागण्या करण्यात आल्या आहेत.

५ ऑगस्ट २०१९ या दिवशी कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. आता लडाखला पूर्ण राज्याचे दर्जा देण्याची मागणी होत आहे.

संपादकीय भूमिका

अशा आंदोलनांना खतपाणी घालून भारताला अस्थिर करण्याचे षड्यंत्र तर नाही ना, याची सुरक्षायंत्रणांनी चौकशी करणे आवश्यक !