राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या विरोधात कठोर प्रावधानांची आवश्यकता !

राष्ट्रध्वज

१. राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍याला ३ वर्षांची शिक्षा

‘इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. त्यांनी त्यांच्या ‘जॅक’ या झेंड्याला देशभराची मान्यता देण्यासाठी बलपूर्वक प्रवृत्त केले. जे स्वातंत्र्यसैनिक भारतीय झेंडा हातात घेऊन स्वातंत्र्याची मागणी करायचे, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे लावायचे. त्यांना अनेक दिवस कारागृहात टाकले जायचे. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांचा राष्ट्रध्वज उतरवला जाऊन त्या ठिकाणी भारताचा तिरंगा झेंडा चढवला गेला. प्रत्येक भारतियाला त्याच्या राष्ट्रध्वजाविषयी आदर असून स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलीदानाचे स्मरण आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, तसेच १७ सप्टेंबर या दिवशी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी, तसेच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्ये त्यांच्या दिनाला झेंडावंदन करतात.

‘प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ॲक्ट १९७१’ आणि वर्ष २००३ मध्ये त्यात करण्यात आलेली दुरुस्तीनुसार राष्ट्रीय ध्वज, राष्ट्र्रगीत आणि देशासाठी ज्या गोष्टी सन्माननीय ठरवलेले प्रतीके आहेत, त्यांचा आदर करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या गोष्टींचा अनादर करणार्‍यांना कलम ३ अंतर्गत ३ वर्षापर्यंत सक्त मजुरी होऊ शकते. वर्ष २००३ मध्ये झालेल्या कायद्यातील घटना दुरुस्तीनुसार एखाद्या नागरिकाने एकाहून अधिक वेळा वेळा किंवा प्रसंगी राष्ट्रीय प्रतीकाविषयी अनादर व्यक्त केला, तर त्याच्या शिक्षेत आणि दंडातही वाढ होईल.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

२. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील वासिक त्यागीला अटक

एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजाचे महत्त्व असतांना उत्तरप्रदेशातील मुजफ्फर जिल्ह्यात वासिक त्यागी याने फेसबुकवर एक लिखाण प्रसारित केले. त्यात त्याने पाकिस्तानी कलाकार कामरान भट्टीविषयी आदर व्यक्त करून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यासमवेतच त्याने भारतीय राष्ट्र्रध्वजावर एक कुत्रा लघवी करत असल्याचे दाखवले आणि त्या खाली ‘अब तो कुत्ते भी मुत रहे है’, असे लिखाण केले. अशा प्रकारे त्याने देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या राष्ट्रद्रोही कृतीमुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. हे लक्षात घेऊन त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला.

३. उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून जामीन असंमत

गुन्हा नोंद झाल्यानंतर वासिक याला पोलिसांनी शोधून काढले आणि कारागृहात डांबले. त्या वेळी त्याने अधिवक्त्यांच्या माध्यमातून जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. राष्ट्र्रध्वजाचा अवमान गंभीर असल्यामुळे सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज असंमत केला. त्यानंतर जामीन मिळवण्यासाठी तो उत्तरप्रदेशच्या उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने अतिशय चांगल्या प्रकारे कारणे देऊन जामीन असंमत केला.

या वेळी उच्च न्यायालय म्हणाले, ‘जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करणे आणि इतक्या खालच्या स्तरावर जाऊन सामाजिक माध्यमावर लिखाण प्रसारित करणे, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही.’ पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राच्या गौरवार्थ घोषणा देणे, हे राष्ट्राप्रती अनादर व्यक्त करणे आहे. यासमवेतच राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, ही देशात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारी कृती आहे. लोकांच्या भावना दुखावून समाजात विद्वेष निर्माण करणे, हे भारतीय एकात्मता आणि अखंडता यांच्या विरोधात आहे.’ त्यामुळे त्याचा जामीन अर्ज असंमत करण्यात आला.

वास्तविक अशा व्यक्तींविरुद्ध केवळ फौजदारी गुन्हा लावून त्याला कारागृहात डांबणे एवढे पुरेसे नाही, त्यांच्या विरुद्ध सामाजिक बहिष्कार टाकणे योग्य होईल, असे राष्ट्रप्रेमींना वाटू शकते. यासमवेतच भारत सरकारने वर्ष १९७१ चा कायदा आणि वर्ष २००३ ची राज्यघटना दुरुस्ती यांच्यात आणखी सुधारणा करून आजन्म कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान (तरतूद) ठेवावे, तसेच हा गुन्हा अजामीन पात्र करावा. त्यामुळे कुणाचेही राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचे धाडस होणार नाही.’ (१५.९.२०२५)

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय