बसून कामे करणार्‍यांच्या आरोग्यासाठी डोळ्यांचे प्रभावी ठरलेले ५ मिनिटांचे व्यायाम !

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक क्र. ८४

‘दिवसभर शेतात अतिश्रम करून घर चालवणारा मनुष्य आधुनिक प्रगतीमुळे आजकाल दिवसभर अनेक घंटे एकाच जागी बसून कामे करू लागला आहे. पूर्ण जग संगणक आणि भ्रमणभाष यांमध्ये सामावल्याने त्यातच मनुष्याचा अधिकांश वेळ जात आहे. अशा या बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक आिण मानसिक आरोग्यावर कळत-नकळत विपरीत परिणाम होतो. आताच्या काळात संगणकाची आवश्यकता अटळ असली, तरी त्याच्या सततच्या वापरामुळे निर्माण होणार्‍या शारीरिक समस्याही तितक्याच घातक आहेत. यांमध्ये सांधे आणि स्नायू यांच्या समस्या, हृदय अन् रक्तवाहिन्या यांसंबंधी रोग, डोळ्यांच्या समस्या, इतकेच नाही, तर पोटाचे विकार आणि मानसिक थकवा यांचाही समावेश आहे. हे धोके न्यून करण्यासाठी कामाच्या अतिव्यस्ततेतही नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः प्रत्येक दोन घंट्यांनी केवळ ५ मिनिटांचे व्यायाम केल्याने आरोग्यदृष्ट्या लक्षणीय लाभ होतात.

सलग एकाच स्थितीत बसून निर्माण झालेला स्नायूंवरील अनावश्यक ताण व्यायाम केल्याने दूर होऊन स्नायू शिथिल होतात, तसेच स्नायूंमधील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे अनेक शारीरिक दुष्परिणाम टाळता येतात. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पाच मिनिटांच्या व्यायामाचे गांभीर्य लक्षात घ्या, पाच मिनिटांचे व्यायाम करण्याच्या संदर्भातील सूचना, उभे राहून करायचे व्यायाम प्रकार आणि आसंदीवर बसून करायचे व्यायाम प्रकार’, हे वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.   (भाग ३)

सौ. अक्षता रेडकर

४ उ. डोळ्यांचे व्यायाम प्रकार

४ उ १. वर-खाली पहाणे (Up Down Movement Exercise) (चित्र : १० अ)  : वर आणि खाली प्रत्येकी ५ वेळा पहावे.

४ उ २. उजवीकडे आणि डावीकडे पहाणे (Right Left Eye Movement) (चित्र : १० आ) : दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५ वेळा पहावे.

४ उ ३. वरच्या दिशेने डाव्या कोपर्‍याकडे पहाणे आणि खालच्या दिशेने उजव्या कोपर्‍याकडे पहाणे (Diagonal Eye Movement) (चित्र : १० इ) : दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५ वेळा पहावे.

 

४ उ ४. वरच्या दिशेने उजव्या कोपर्‍याकडे पहाणे आणि खालच्या दिशेने डाव्या कोपर्‍याकडे पहाणे (Diagonal Eye Movement) (चित्र : १० ई) : दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५ वेळा पहावे.

 

४ उ ५. घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने आणि काट्यांच्या विरुद्ध दिशेने डोळे फिरवणे (Clockwise and Anticlockwise Rotation Exercise) (चित्र : १० उ): दोन्ही दिशांना प्रत्येकी ५ वेळा डोळे फिरवावेत.

४ उ ६. डोळे घट्ट मिटून पुन्हा उघडणे (Eye Blinking Exercises) (चित्र : १० ऊ) : हा प्रकार ५ वेळा करावा.

४ उ ६. पामिंग (Palming Exercise) : डोळे बंद करावेत. दोन्ही हात एकमेकांवर घासावेत. त्यामुळे हातांमध्ये उष्णता निर्माण होईल. नंतर हात बंद डोळ्यांवर ठेवावेत. (तेव्हा डोळे बंद असावेत) असे केल्याने डोळ्यांच्या सभोवतालच्या भागात रक्ताभिसरण चांगले होते. त्यानंतर डोळे उघडून १० – १५ सेकंद तळहातांतील अंधाराकडे पहावे.

४ उ ७. ‘२०-२०-२०’ चा नियम पाळा, म्हणजे प्रत्येक २० मिनिटांनी २० फूट दूर अंतरावर २० सेकंद पहा.

‘बसून काम करणार्‍या सर्वांनी या व्यायाम प्रकारांचा लाभ करून घ्यावा’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !

(समाप्त)

– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (२५.७.२०२४)

व्यायामाच्या वरील सर्व कृतींची चलचित्रे (व्हिडिओ) पहाण्यासाठी क्यू.आर्.कोड आणि लिंक

https://youtu.be/lzRrfJ-ElL0?feature=shared

🪷 व्यायाम या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷