येवला तालुक्यातील ३८ गावांत ‘एक गाव, एक गणपति’ !

१५० गणेशोत्सव मंडळांकडून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना !

येवला तालुक्यातील ३८ गावांनी ‘एक गाव एक गणपति’ उपक्रम राबवला.

येवला (जिल्हा नाशिक) – नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ३८ गावांमध्ये यावर्षी ‘एक गाव, एक गणपति’ची मोहीम राबवण्यात आली आहे. या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत. शहरात ९० गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव मंडळात मूर्तींची स्थापना केली आहे. गावात सामाजिक एकोपा, शांतता टिकवण्यासाठी प्रत्येक गावाने गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील १२३ पैकी ३८ गावांनी ‘एक गाव, एक गणपति’ उपक्रम राबवला आहे.

गावे तंटामुक्त होऊन उत्सवात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने ‘एक गाव, एक गणपति’ ही संकल्पना गेल्या ८ ते १० वर्षांपासून चालू आहे. तालुक्यात वर्ष २०१८ मध्ये ७२ गावांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला, तर वर्ष २०१९ मध्ये ९१ गावांनी उपक्रमात सहभाग घेतला होता. मागील वर्षी ६० गावांनी ‘एक गाव, एक गणपति’ ही संकल्पना राबवली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात ग्रामीण भागात महिला आणि मुले यांच्यासाठी प्रतिदिन विविध स्पर्धा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रंगत आहेत. मद्यबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण, आरोग्य अशा विविध विषयांद्वारे जनजागृती होत आहे. बालभोजन, कीर्तनाचे कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

धुळगाव येथे ‘एक गाव एक गणपति’ आहे. येथे छत्रपती गणेशोत्सव मित्रमंडळाने गणेशोत्सव निमित्ताने ‘श्रीमद्भागवत कथे’चे आयोजन केलेले आहे, तसेच संपूर्ण धुळगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रतिदिन सायंकाळी भागवत कथा चालू होण्याच्या पूर्वी सर्व भाविक आणि ग्रामस्थ यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. गणेशोत्सवाचे हे २५ वे वर्ष आहे.

प्रतिवर्षी ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना असल्यामुळे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत ‘श्री छत्रपती गणेशोत्सव मित्र मंडळ’ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने घेण्यात येतात. त्यामुळे गावात सामाजिक सलोखा आहे.

संपादकीय भूमिका

यातून इतर गावांतील गणेशोत्सव मंडळांनी बोध घेऊन असा उपक्रम राबवणे आवश्यक आहे !