लेखांक क्रमांक ७९
‘आतापर्यंत आपल्याला ‘व्यायाम हे शरिराचे बळ, लवचिकता आणि कार्यक्षमता वाढवणे यांसाठी असते’, हे ठाऊक झाले आहे. ‘शरिराला घाम काढायला लावणारा व्यायाम हा केवळ हृदयासाठी किंवा वजनासाठी नाही, तर तुमच्या त्वचेसाठी एक अद्भुत औषध कसा आहे ? व्यायामामुळे त्वचा कशी सुधारते ? काय वैज्ञानिक आधार आहे आणि कोणत्या सवयी त्वचेचे रक्षण करतील ?’, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात ‘व्यायामामुळे त्वचेचे संरक्षण आणि शरिराचे सौंदर्यवर्धन होणे’ यांविषयी जाणून घेऊया.
२० ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘व्यायामामुळे चेहरा उजळ आणि तेजस्वी होणे, व्यायाम केल्यामुळे त्वचेचे शुद्धीकरण होणे, व्यायामामुळे त्वचारोग न्यून होणे अन् व्यायामामुळे त्वचा घट्ट, लवचिक आणि तजेलदार रहाणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/947890.html

५. व्यायामामुळे शरिरातील ‘अँटीऑक्सिडंट एन्झाईम्स’ वाढून त्वचेच्या पेशींचे संरक्षण होणे
मध्यम स्वरूपाचा नियमित व्यायाम शरिरातील ‘अँटीऑक्सिडंट एन्झाईम्स’ (विशिष्ट प्रकारचे सजीव रसायन) सक्रीय करतो. त्यामुळे प्रदूषण, प्रखर ऊन यांमुळे होणारी त्वचेची हानी न्यून होते. त्यासह शरिरात निर्माण झालेली उष्णता न्यून करून त्वचेच्या पेशींचे संरक्षण होते.
६. व्यायामामुळे झोप चांगली लागून त्वचा ताजी, तणावरहित आणि पुनरुज्जीवित होणे
व्यायामामुळे झोपेची गुणवत्ता वाढते. आपण झोपलेलो असतांना त्वचेच्या नवीन पेशी निर्माण होतात आणि हानीग्रस्त पेशी दुरुस्त होतात. यामुळे डोळ्यांभोवतालची काळी वर्तुळे (डार्क सर्कल्स) आणि त्वचेचा फिका रंग यांमध्ये सुधारणा होते अन् त्वचा ताजी, तणावरहित आणि पुनरुज्जीवित होते.

७. व्यायामामुळे ‘अॅक्ने’, ‘सोरायसिस’ यांसारखे त्वचारोग नियंत्रणात येणे
व्यायामामुळे संपूर्ण शरिरातील दाह किंवा सूज न्यून होते. यासह पचनही सुधारते. हे दोन्ही त्वचेसाठी आवश्यक असतात. यामुळे अॅक्ने (मुरूम), सोरायसिस (त्वचा जाडसर, खवलेदार आणि खाजयुक्त होणे) यांसारखे विकार नियंत्रणात येतात.
८. व्यायामामुळे शरिरातील लसिका प्रणाली (एक प्रकारचा द्रव) कार्यरत होऊन शरिराचे स्नायू घट्ट, बळकट आणि सुडौल होणे
शरिरातील बरेचसे विषारी घटक वाहून नेण्याचे आणि शरिराबाहेर फेकण्याचे कार्य ‘लसिका वाहिनी’ करतात. व्यायामामुळे शरिरातील लसिका प्रणाली कार्यरत होते. त्यामुळे डोळ्याखालची सूज किंवा पाणी धरून ठेवणे अल्प होते. यासह शरिराचे स्नायू घट्ट, बळकट आणि सुडौल होतात. त्याचा सौम्य परिणाम चेहर्यावरही दिसून येतो. चेहर्याची काळजी घेण्यासाठी काही आवश्यक सूत्रे पुढे दिली आहेत.
अ. व्यायामानंतर चेहरा सौम्य ‘फेसवॉश’ने (चेहरा स्वच्छ करण्याच्या द्रवाने) स्वच्छ धुवावा.
आ. व्यायाम करतांना शक्यतो चेहर्याला हात लावणे टाळावे.
इ. चेहर्यावर वारंवार येणारा घाम स्वच्छ कपड्याने टिपून घ्यावा.
‘त्वचा’ हा आरोग्याचा आरसा आहे. महागड्या सौंदर्यप्रसाधनांपेक्षा व्यायाम हे सौंदर्याचे सर्वांत स्वस्त आणि नैसर्गिक साधन आहे. त्यासाठी प्रतिदिन ३० मिनिटे व्यायाम करावा.’
(समाप्त)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२५.६.२०२५)
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !