वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार करत असतांना आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०२५ मध्ये सनातन संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गुरुपौर्णिमा वर्ष २०२५

१. सौ. कल्पना केतन शेंडे, खोपोली, रायगड.

१ अ. एका जिज्ञासूच्या घरी गेल्यावर प्रथम नकारात्मकता जाणवणे आणि त्यांना साधनेविषयी सांगितल्यानंतर हलकेपणा जाणवणे : ‘आम्ही एका जिज्ञासूच्या घरी गुरुपौर्णिमेचे आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. आम्ही त्यांच्या घरात जात असतांना आम्हाला दारातच नकारात्मकता जाणवली. आम्ही त्यांना साधनेविषयी सांगू लागलो. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य उमटले. आम्हाला त्यांच्या चेहर्‍याकडे पाहून प्रसन्न वाटू लागले. त्यांना साधनेविषयी सांगून त्यांच्या घरातून बाहेर पडल्यावर आम्हाला हलकेपणा जाणवत होता.’

२. श्री. शंकर भोईर  (वय ६८ वर्षे), नवीन पनवेल, रायगड.

२ अ. एका महिलेकडे गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मागितल्यावर त्यांनी प्रथम नकार देणे : ‘मी एका साधकासह एका ताईंकडे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाराला गेलो होतो. त्यांचे यजमानही तेथे होते. त्यांच्या यजमानांकडे पाहून ‘त्यांची अर्पण देण्याची इच्छा आहे’, असे मला जाणवले. त्या ताई स्वामी समर्थांची उपासना करत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही तुम्हाला अर्पण देणार नाही. आमचीही गुरुपौर्णिमा असते. मी स्वामी समर्थांच्या गुरुपौर्णिमेला अर्पण देते.’’ आम्ही त्यांना ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची माहिती दिली अन् काही ग्रंथ दाखवले. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्याकडेही हे सर्व असतेच.’’

२ आ. महिलेला साधकांमध्ये गुरुरूप दिसणे आणि त्यांनी स्वतःहून अर्पण देणे : नंतर आम्ही अन्य ४ – ५ घरांत जाऊन त्यांना गुरुपौर्णिमेविषयी सांगितले. हे सर्व त्या ताई पहात होत्या. त्या लगेच आमच्या मागून आल्या आणि म्हणाल्या, ‘‘काका, मला अर्पण द्यायचे आहे.’’ मी म्हणालो, ‘‘ठीक आहे. देऊ शकता. ताई, तुम्ही प्रथम ‘अर्पण द्यायचे नाही’, असे म्हणालात आणि आता तुम्ही अर्पण देण्यासाठी कशा सिद्ध झालात ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही ज्या घरांत जात होता, तिथे तिथे मला तुमच्या रूपात सूक्ष्मातून स्वामी समर्थ झोळी घेऊन जात आहेत’, असे दिसत होते. त्यामुळे मला अर्पण देण्याची इच्छा झाली. ‘तुम्ही माझे स्वामी समर्थच आहात’, असा विचार करून मी तुम्हाला अर्पण द्यायला सिद्ध झाले.’’ त्यांनी आम्हाला अर्पण दिले. मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त केली.’

३. सौ. नीला गडकरी (वय ६४ वर्षे), नवीन पनवेल, रायगड.

३ अ. ‘ईश्वरच त्याचे कार्य करून घेत असतो’, याची प्रचीती येणे : ‘एक मान्यवर गुरुपौर्णिमेसाठी अर्पण स्वरूपात सभागृह देतात. मी त्या मान्यवरांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे त्यांचा मुलगा उपस्थित होता. त्यांच्या मुलाची आणि माझी यापूर्वी कधीच भेट झाली नव्हती. त्यामुळे मी ‘सभागृह अर्पण स्वरूपात मिळेल का ?’, याविषयी थोडी साशंक होते. मी देवाला प्रार्थना केली आणि कार्यालयात गेले. मी त्यांना सनातन संस्थेचे कार्य आणि नुकत्याच झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’विषयी सांगितले. त्यांना हे सर्व एवढे आवडले की, ते म्हणाले, ‘‘सनातनचे कार्यक्रम पुष्कळ छान असतात. ‘तुम्हाला गुरुपौर्णिमेसाठी हे सभागृह नेहमीसाठीच दिले आहे’, असे समजा. आम्ही तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही.’’ तेव्हा मला ईश्वरचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘ईश्वरच त्याचे कार्य करून घेत असतो’, याची मला प्रचीती आली.’

४. सौ. सुवर्णा साळुंखे, खांदा कॉलनी, रायगड.

४ अ. ‘भावपूर्ण सेवा केल्यास ती देवाच्या चरणी रुजू होते आणि देव आपल्याला पुष्कळ अनुभूती देतो’, असे लक्षात येणे : एकदा आम्ही आदई, नवीन पनवेल येथे प्रसारानिमित्त गेलो होतो. तेव्हा आम्ही इमारतीचा जिना चढत असतांना ‘आश्रमाच्या पायर्‍या चढत आहोत’, असा भाव ठेवला. त्या वेळी आम्ही ज्या साधकांना संपर्क केला, ते युवा सत्संगांना उपस्थित रहातात. काही जिज्ञासूंनी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने घेतली. तेव्हा ‘ते जणू काही चैतन्याचा खजिनाच घेत आहेत’, असे मला वाटले. एका कुटुंबातील सर्व जण सत्संगाला उपस्थित रहातात. त्यांची मुले युवा सत्संग आणि बालसंस्कार वर्ग यांना उपस्थित असतात. ते जिज्ञासू साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले. तेव्हा ‘आपण भावपूर्ण सेवा केल्यास ती देवाच्या चरणी रुजू होते आणि देव आपल्याला पुष्कळ अनुभूती देतो’, असे माझ्या लक्षात आले.’

५. कु. संगम शेंडे (वय १६ वर्षे ), खोपोली, रायगड

अ. ‘घरोघरी प्रसार करतांना ‘समोरच्या व्यक्तीचे निरीक्षण कसे करायचे ? ती व्यक्ती ऐकण्याच्या स्थितीत आहे का ? प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार विषय कसा मांडायचा ?’, ही सूत्रे माझ्या लक्षात आली.

आ. आमचे एखाद्या जिज्ञासूंकडे जाण्याचे नियोजन असायचे; पण भगवंत आम्हाला दुसर्‍याच जिज्ञासूकडे घेऊन जात असे आणि तेथे पुष्कळ सात्त्विक व्यक्ती आम्हाला भेटत असत. तेव्हा माझा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव जागृत होत असे.

इ. प्रतिदिन प्रसारसेवा करतांना ‘दिवस कसा संपतो ?’, हे माझ्या लक्षात येत नसे. मी सतत भगवंताच्या अनुसंधानात रहात असे. तेव्हा ‘भगवंत समवेत आहे’, असे मला जाणवत असे.

ई. काही वेळा जिज्ञासूंना साधना, हिंदु राष्ट्र आणि धर्म यांविषयी सांगत असतांना ‘गुरुदेवच माझ्याकडून बोलून घेत आहेत’, असे जाणवून गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत असे.’

६. सौ. पल्लवी म्हात्रे, कामोठे, जिल्हा रायगड.

६ अ. गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे वर्ष २०२५मधील गुरुपौर्णिमा पुष्कळच अद्भुत होती. गुरुपौर्णिमेच्या २ दिवस आधी मला स्वप्नात ‘सभागृह पूर्ण भरले आहे’, असे दिसले. प्रत्यक्षातही गुरुपौर्णिमेच्या वेळी सभागृह पूर्ण भरले होते.

६ आ. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशीच धर्मप्रेमींना संतांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजणे आणि ‘मनातील प्रत्येक विचार भगवंतापर्यंत पोचतो’, असे लक्षात येणे : एकदा साधकांशी बोलतांना माझ्या लक्षात आले, ‘जे धर्मप्रेमी जोडले गेले आहेत, त्यांना संतांचा सत्संग मिळाल्यास पुष्कळ लाभ होईल.’ त्यानंतर मला त्याच दिवशी सायंकाळी समजले, ‘खोपोली आणि जांभूळपाडा या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत, वय ५६ वर्षे) येणार आहेत.’ तेव्हा ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशीच धर्मप्रेमींना संतांचा सत्संग लाभणार आहे’, हे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि ‘आपल्या मनातील प्रत्येक विचार भगवंतापर्यंत पोचतो’, असे माझ्या लक्षात आले.

६ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवणे : आम्ही वेलवली, जिल्हा रायगड येथे जात असतांना गाडीत भजने लावली होती. तेव्हा मला सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन माझी भावजागृती होत होती. अचानक मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवू लागले. एका दिव्य प्रकाशातून मला शब्द ऐकू आले, ‘तुला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रमाणे साधकांवर प्रीती करायची आहे.’ मी त्या दिव्य प्रकाशाला नमस्कार करून ‘मी प्रयत्न करीन’, असे सांगितले. अशा प्रकारे मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे तत्त्व अनुभवण्यास मिळाले.

६ ई. आकाशात ‘श्रीकृष्ण बासरी वाजवत आहे’, अशी ढगांची रचना दिसणे : गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी (९.७.२०२५ या दिवशी) आम्ही सभागृहात सेवा करत होतो. तेव्हा एका धर्मप्रेमीने सभागृहाच्या वरच्या बाजूने आकाशाचे छायाचित्र काढले. तेव्हा मला आकाशात ‘श्रीकृष्ण बासरी वाजवत आहे’, अशी ढगांची रचना झालेली दिसली. तेव्हा जणू ‘भगवान श्रीकृष्ण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे’, असे मला वाटत होते.

६ उ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या अनुभूती

१. गुरुपूजन चालू होण्यापूर्वी पू. (सौ.) संगीता जाधव यांचा मला भ्रमणभाष आला आणि त्यांनी ‘काही अडचण नाही ना ?’, असे विचारले. ‘त्यांचा आवाज ऐकून चैतन्य मिळाले’, असे मला जाणवले.

२. गुरुपूजन चालू झाल्यावर माझी संपूर्ण वेळ भावजागृती होत होती. भावाश्रू थांबतच नव्हते. ‘प्रोजेक्टर’वर (पडद्यावर) दिसणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये मला जिवंतपणा जाणवत होता.

३. सद्गुरूंच्या आरतीच्या वेळी ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य प.पू. डॉ. आठवले व्यासपिठावर उपस्थित आहेत अन् ते सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवत होते.’

७. श्री. किशोर पडवळ, चिंचवली, जिल्हा रायगड. 

७ अ. ‘सभागृह चैतन्यमय झाले आहे’, असे जाणवणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन चालू असतांना व्यासपिठावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान आहेत’, असे मला जाणवले. पूजा चालू असतांना ‘पूजेतील सर्व कृती मीच करत आहे’, असे मला वाटत होते. या वेळी ‘गुरुदेव सर्वांना चैतन्य देत आहेत आणि सर्व सभागृह चैतन्यमय झाले आहे’, असे मला जाणवत होते.

७ आ. संपूर्ण वातावरणात आनंद जाणवणे आणि सभागृहात प्रकाश जाणवणे : श्री गुरूंचे पूजन होत असतांना एका बाजूला श्रीसतशक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि दुसर्‍या बाजूला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसल्या आहेत अन् त्या दोघी श्री गुरुचरणांचे पूजन करत आहेत’, असे मला वाटत होते. पूजा चालू असतांना माझे हृदय भरून येत होते. मला संपूर्ण वातावरणात आनंद जाणवत होता. मला सभागृहात प्रकाश दिसत होता. ‘गुरुदेव सर्वांना भरभरून आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवत होते.’

(लेखातील सर्व सूत्रांसाठी दिनांक : १९.७.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.