(म्हणे) ‘अंधश्रद्धा निर्मूलनानंतरच वैज्ञानिक दृष्टीकोन येतो !’ – माजी न्यायमूर्ती अभय ओक

  • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ व्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम !

  • ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर व्याख्यान

पुणे – सुशिक्षित समाजालाच वैज्ञानिक दृष्टीकोनाची अधिक आवश्यकता आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन झाल्याविना वैज्ञानिक दृष्टीकोन येत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी अंधश्रद्धेचे उच्चाटन आवश्यक आहे, अशी भूमिका माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २० ऑगस्ट या दिवशी झालेल्या १२ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर न्या. ओक यांनी मत मांडले.

या वेळी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ‘युवक क्रांती दला’चे अन्वर राजन, ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’चे डॉ. शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ आय.पी.एस्. अधिकारी अशोक धीवरे, प्रा. नितीश नावसागरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर आदी उपस्थित होते.

पक्षपात करणारे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले !

माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले

या वेळी माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी सांगितले की, आजकालच्या काळात अल्पसंख्य समाजाला होणारा त्रास हा पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या विरोधात आहे. कारण वैज्ञानिक दृष्टीकोनाने समजूतदार असलेला समाज समतेचा पाठीराखा असतो. (आजकालच्या काळात अल्पसंख्य समाजाला नव्हे, तर बहुसंख्य हिंदूंनाच अल्पसंख्यांक समाजातील काही प्रवृत्तींमुळे सर्वाधिक त्रास होत आहे. मंदिरांवरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहादसारखे प्रकार आणि हिंदूंच्या मिरवणुकांवर होणारी आक्रमणे यांकडे माजी न्यायमूर्ती गोखले डोळेझाक करत आहेत. पक्षपात करणे, हा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव नाही का ? ‘असा पक्षपात करून माननीय माजी न्यायमूर्तींनी त्यांच्या कार्यकाळात किती निर्णय दिले असतील ?’, असा अल्पसंख्यांकांकडून मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांनी प्रश्‍न उपस्थित केला, तर त्यात काय चुकीचे ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • माजी माननीय न्यायमूर्ती यांचे हे विधान १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. हिंदु धर्म हा विज्ञानाधिष्ठित आहे, असे अनेक महान पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांनी सांगितले असतांना एखादे न्यायमूर्ती त्या धर्माच्या श्रद्धांवरच लांच्छन लावत असतील, तर हे अस्वीकारार्ह आहे. अशांच्या विरुद्ध हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारला पाहिजे !
  • वैज्ञानिक दृष्टीकोन हा शिक्षण, संशोधन, तर्कशुद्ध विचार आणि संवाद यांतून विकसित होतो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली केवळ हिंदु धर्मियांच्या परंपरा आणि सण यांवरच टीका केली जाते, तर इतर धर्मांतील प्रथांवर मौन पाळले जाते. त्यामुळे हा दृष्टीकोन खरोखर वैज्ञानिक आहे कि पक्षपाती, तसेच राजकीय कार्यसूचीचा भाग ? असा प्रश्‍न निर्माण होतो !
  • राज्यघटनेच्या नावाखाली समाजात संभ्रम निर्माण करून श्रद्धा-परंपरा उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. ही चळवळ अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नसून वैज्ञानिकतेचा मुखवटा घेऊन हिंदु धर्मावर आक्रमण करण्यासाठीचे षड्यंत्र आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !