सद्यःस्थितीत शहरी नक्षलवाद ही राष्ट्रीय; पण देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने समस्या होत चालली आहे. ही समस्या नेमकी काय आहे ? त्यावरची उपाययोजना, कायद्याची आवश्यकता, नागरिकांनी सजग रहाण्यासाठी कोणती सूत्रे विचारात घ्यावीत, या आणि अशा विविध विषयांवर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रोहन माळवदकर यांच्याशी केलेल्या वार्तालापाविषयीचे लिखाण लेखस्वरूपात येथे देत आहोत.

१. सुशिक्षित वर्गाला सरकार आणि देश विरोधी विचारांकडे वळवणारे शहरी नक्षलवादी !
नक्षलवाद हे आपल्या देशासाठी गंभीर आव्हान आहे. देशांतर्गत अस्थिरता, दंगल, अराजकता आणि समाजात फूट पाडण्याचे कट नक्षलवादी गट सातत्याने करत असतात आणि करतही आहेत. माओवादी, नक्षलवादी चळवळीमुळे भारताच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट लाभ भारताचे वैर असलेला पाकिस्तान, चीन आणि इतर देश यांना होत आहे.
शहरी नक्षलवाद हा नक्षलवादाचाच एक भाग असून तो वेगळा नाही. जंगलातील नक्षलवादी बंदुका घेऊन लढतात, तर शहरी नक्षलवादी हे शहरांमध्ये राहून शस्त्र न वापरता विचारसरणीच्या माध्यमातून देशविरोधी कारवाया करतात. ते विविध सामाजिक संघटना, आंदोलने, चुकीचा इतिहास, अपप्रचार यांद्वारे सरकार आणि देशविरोधी विचार पसरवतात. शहरी नक्षलवाद ओळखणे कठीण असते; कारण या लोकांचा वावर सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, प्राध्यापक, अधिवक्ते अशा प्रतिष्ठित मुखवट्यांखाली असतो. ते आपल्या विचारांद्वारे सुशिक्षित वर्गाला सरकार आणि देश विरोधी विचारांकडे वळवतात. या विचारांतूनच शहरी माओवाद किंवा शहरी नक्षलवाद जन्माला आला.

२. ‘शहरी नक्षलवाद’ आणि ‘माओवाद’ यांचा एकच उद्देश
‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद आणि माओवाद ही नावे जरी वेगळी असली, तरी त्यांचा मूळ उद्देश एकच आहे, ‘भारतात अराजकता माजवणे आणि देशाचे तुकडे करणे.’ या विचारसरणीतील लोक देशात अंतर्गत अस्थिरता निर्माण करून आपल्या लोकशाही व्यवस्थेवर आघात करतात. त्यामुळे ही नावे भिन्न असली, तरी दोघांचा हेतू आणि धोका सारखाच आहे.
३. ‘तथाकथित सुधारणावादी’ देशविरोधी मानसिकता पोसणारे !
नक्षलवादी किंवा माओवादी विचारसरणीचे लोक सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, लेखक, अधिवक्ते आणि उच्चशिक्षित विचारवंत या स्वरूपात समाजात वावरतात. त्यांची प्रतिमा समाजात प्रतिष्ठित म्हणून सिद्ध केली जाते. त्यामुळे सामान्य नागरिक त्यांच्या विचारांवर सहज विश्वास ठेवतात. हे लोक अपप्रचार, चुकीची माहिती, इतिहासाचे विकृतीकरण यांच्या माध्यमातून समाजात विष पसरवतात. ते स्वतःला ‘मानवाधिकार रक्षक’ म्हणवतात; पण प्रत्यक्षात ‘देशविरोधी मानसिकता’ पोसत असतात.
शहरी नक्षलवाद्यांवर कारवाईसाठी ‘जनसुरक्षा कायदा’ !

सद्यःस्थितीत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत ‘जनसुरक्षा कायदा’ संमत झाला आहे. या कायद्यामुळे नक्षलवादी आणि माओवादी विचारांना, समाजविरोधी मानसिकतेला आळा बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही लोक या कायद्यावर टीका करत आहेत, चुकीची माहिती पसरवत आहेत; परंतु हा कायदा समाज आणि देश यांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. या अंतर्गत पुरावे सादर करून देशविरोधी विचार आणि कृत्य करणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करता येते. नागरिकांनी या कायद्याचा अभ्यास करावा, त्याचे महत्त्व ओळखावे आणि अधिकाधिक प्रचार करावा.
– अधिवक्ता रोहन माळवदकर
४. देशाला धोका निर्माण न होण्यासाठी देशद्रोही लोकांवर कठोर कारवाई होणे महत्त्वाचे !
एखाद्याला नक्षलवादी ठरवण्यासाठी कायदेशीर पुरावे असणे आवश्यक असते. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आधारावर एखादी व्यक्ती सरकारविरोधी बोलत असेल, तरी त्याला नक्षलवादी ठरवता येत नाही; परंतु जर ती व्यक्ती खरोखरच देशविरोधी कट कारस्थानात सहभागी असेल, शस्त्रसज्ज असेल, आर्थिक साहाय्य परदेशी शत्रूंकडून घेत असेल, तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होते. जंगलात बंदूक घेऊन सैनिकांवर आक्रमण करणार्या नक्षलवाद्याला सुरक्षायंत्रणा जागेवरच ठार करू शकतात. माझ्या मते अशा देशद्रोही विचारांनी भारलेल्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात देशाला धोका निर्माण होणार नाही.
अंनिसचे दुटप्पी धोरण ‘अर्बन’ नक्षलवादाशी सुसंगत !

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ही संस्था हिंदु धर्मातील परंपरांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत आली आहे; मात्र ती इतर धर्मातील अंधश्रद्धांविषयी मौन बाळगते. हे दुटप्पी धोरण ‘अर्बन’ नक्षलवादाशी सुसंगत आहे. अंनिसच्या अनेक कृती केवळ ‘स्टंट’बाजीसाठी (लक्ष वेधण्यासाठी) असतात; परंतु त्यामागे देशद्रोही मानसिकता लपलेली असते. अशा संस्थांची कार्यपद्धत केवळ हिंदु धर्माच्या विरोधात केंद्रित असून त्यांच्या कथित सामाजिक कार्याच्या मागे देशविरोधी विचार असू शकतो.
– अधिवक्ता रोहन माळवदकर
५. प्रसारमाध्यमांनी ‘अर्बन’ नक्षलवादा’चे समर्थन करण्याऐवजी तो उघड करायला हवा !
सध्याच्या स्थितीत प्रसारमाध्यमांनी ‘अर्बन’ नक्षलवादाच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करून अनेकदा वायफळ चर्चा केल्या आहेत. उदाहरणार्थ ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी पुण्यातील शनिवारवाडा येथे ‘एल्गार परिषद’ या कार्यक्रमात प्रक्षोभक भाषणे, देशविरोधी घोषणा आणि गाणी सादर झाली. यानंतरच १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला. या परिषदेला माओवादी संघटनांकडून निधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली; पण काही पत्रकार आणि पुरोगामी विचारवंत यांनी या कारवाईविरोधात आवाज उठवत पोलिसांवर टीका केली, तसेच हे नक्षलवादी अन् माओवादी विचारसरणीचे व्यक्तीच राष्ट्रहितकारी असल्याचा कांगावा केला. हे ‘अर्बन’ नक्षलवादाचे खरे स्वरूप समोर आणणारे ठळक उदाहरण आहे.
६. नक्षलवादाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर होणारा परिणाम
नक्षलवादामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक राज्यांत नक्षलवादी आक्रमणांमध्ये सहस्रो सैनिक हुतात्मा झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारे या समस्येला गांभीर्याने घेत असून वेळोवेळी प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वर्ष २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णतः नष्ट करण्याची घोषणा केली आहे. असे असले, तरी शहरी नक्षलवाद अजूनही विष कालवत आहेत. सुशिक्षित लोकांमध्ये देशविरोधी विचार पसरवण्याचे प्रयत्न चालू आहेत. जनतेने जागरूक राहून अशा विचारांचा निषेध करणे आवश्यक आहे.
नक्षलवादाविषयीची काही महत्त्वाची सूत्रे

अ. नक्षलवादी आणि माओवादी नेहमी सांगतात, ‘ते आदिवासींच्या न्यायहक्कांसाठी आणि हुकूमशाहीविरुद्ध लढत आहेत’; मात्र वस्तूस्थिती वेगळी आहे. हे लोक प्रत्यक्षात ‘आदिवासींच्या न्यायहक्कांसाठी नव्हे, तर भारतात माओवादी हुकूमशाही कशी येईल’, यासाठी लढा देत आहेत.
आ. माओवाद्यांनी आदिवासीबहुल वासवळ भागांतील सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा लाभ घेतला. ही परिस्थिती मुळात माओवाद्यांनी निर्माण केलेली नव्हती; पण त्यांना त्यांच्या योजनांसाठी ती लाभदायी वाटली. त्यांनी प्रारंभीला माओवादाची प्रतिमा गरीब, दुर्बळ, आदिवासी घटक यांच्या न्यायासाठी लढणारी चळवळ, अशी उभी केली. ‘आदिवासींना त्यांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर हक्क मिळावा, यासाठी ते कार्य करतात’, असा भास निर्माण करण्यात आला; मात्र हे सर्व केवळ जनतेसमोर मुखवटा घालण्यासाठी होते. त्यांचा खरा हेतू ‘देशात अशांतता माजवणे, देशाचे तुकडे करणे आणि संवैधानिक लोकशाही व्यवस्था उलथवून टाकणे’, हाच होता. या संघटनांची विचारसरणी अत्यंत घातक असून त्यांचा उद्देश भारताच्या एकतेचा आणि अखंडतेचा नाश करणे, हाच आहे.
इ. आज नक्षलवाद आणि माओवाद हे केवळ अंतर्गत सुरक्षेलाच नव्हे, तर भारताच्या लोकशाही व्यवस्थेलाही सर्वांत मोठे आव्हान बनले आहेत. या विचारांनी भारलेल्या लोकांचा उद्देश हिंसाचाराच्या माध्यमातून देशाची सत्ता हस्तगत करणे आणि लाल किल्ल्यावरील ‘तिरंग्या’च्या ऐवजी माओवादी हुकूमशाहीचे ‘लाल निशाण’ फडकवणे, हाच आहे.
ई. ही चळवळ आदिवासी समाजाच्या हितासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सनदशीर मार्गाने चाललेली नाही. उलट ही माओवादी विचारसरणीने प्रेरित शहरी सुखवस्तू उपभोगणार्या लोकांनी चालवलेली चळवळ आहे. ती हिंसक, तसेच लोकशाही आणि राज्यघटना विरोधी आहे.
उ. वर्ष २०१४ पूर्वी देशातील अनुमाने १५० जिल्हे नक्षलग्रस्त होते. वर्ष २०२० पर्यंत ही संख्या घसरून ९० जिल्ह्यांवर आली आहे. या ९० जिल्ह्यांपैकी ७ जिल्हे अतीप्रमाणात प्रभावित, ३७ जिल्हे मध्यम प्रमाणात, तर ४६ जिल्हे किरकोळ प्रमाणात प्रभावित आहेत.
या जिल्ह्यांमध्ये झारखंड (१९), बिहार (१६), ओडिशा (१५), छत्तीसगड (१४), तेलंगाणा (८), आंध्रप्रदेश (६), महाराष्ट्र, केरळ आणि उत्तरप्रदेश (प्रत्येकी ३), मध्यप्रदेश (२) अन् बंगाल (१) या राज्यांचा समावेश होतो.
– अधिवक्ता रोहन माळवदकर
७. उपाययोजना
अ. नक्षलवादाच्या विरुद्ध जनजागृती करणे, कुणालाही न घाबरता अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उपयोग करून जनतेमध्ये जागरूकता आणणे.
आ. ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्या’सारख्या कायद्याची प्रभावी कार्यवाही करून कारवाई करणे.
इ. प्रसारमाध्यमांनी दायित्वाने भूमिका घेणे महत्त्वाचे, जेणेकरून समाजाला सत्य आणि अचूक माहिती मिळू शकते.
ई. शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रनिष्ठ शिक्षणावर भर देणे.
उ. आदिवासी भागात मूलभूत सुविधा आणि विकास करून या माध्यमांतून नक्षलवाद्यांचा अन् साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव न्यून करणे.
ऊ. देशविरोधी विचार करणार्या व्यक्तींना कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा करून त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करणे.
ए. समाजात विवेकपूर्ण आणि राष्ट्रहिताकडे झुकणारे, सत्य माहिती असणारे अन् निर्भीड वैचारिक नेतृत्व सिद्ध करणे.
ऐ. शहरी भागांत पसरत असलेल्या विचारवंतांच्या आडून चालणार्या देशद्रोही कारवायांवर सतर्क रहाणे आणि तसे आढळल्यास कठोर कारवाई करणे.
ओ. प्रत्येक नागरिकाने सजग रहाणे आणि संशयास्पद व्यक्तींविषयी प्रशासनाला, तसेच योग्य व्यक्तीला पुराव्यानिशी माहिती देणे.
८. प्रत्येकाने साम्यवादी विचारांविषयी सजग रहाणे महत्त्वाचे !
हे सर्व पहाता केंद्र आणि राज्य सरकारे यांनी संयुक्तपणे नक्षलवाद संपवण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले आहेत, हे समजते. वर्ष २०१८ मध्ये नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांच्या सूचीतून तब्बल ४० जिल्हे वगळले गेले, हे यशाचे निदर्शक आहे; मात्र अजूनही धोका पूर्णतः टळलेला नाही. देशाची एकता, अखंडता, लोकशाही आणि राज्यघटना यांचे रक्षण करणे, हे केवळ शासनकर्ते, न्यायव्यवस्था आणि सुरक्षायंत्रणा यांचे काम नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाने याविषयी जागरूक रहाणे, शहरी साम्यवादी विचारांना वेळीच ओळखून विरोध करणे, हीच काळाची आवश्यकता आहे.
– अधिवक्ता रोहन माळवदकर, पुणे. (१६.७.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !