Munir  Another Laden : पाकिस्तानचे असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन !

अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांचे विधान

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानचे असीम मुनीर हे सैनिकी पोषाख घातलेले ओसामा बिन लादेन आहेत. पाकिस्तानला कितीही सूट दिली, तरी त्याच्या विचारांत पालट होणार नाही, अशा शब्दांत अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या ‘पेंटागॉन’चे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी मुनीर यांच्याविषयी संताप व्यक्त केला. मुनीर यांनी भारतावर अण्वस्त्र आक्रमण करण्याच्या अमेरिकेच्या भूमीवरून दिलेल्या धमकीनंतर रुबिन यांनी हे विधान केले.

रुबिन पुढे म्हणाले, ‘‘मुनीर यांनी अणवस्त्र आक्रमणाची धमकी दिल्यानंतर खरेतर अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना लगेचच हाकलून द्यायला हवे होते. अमेरिकेने पाकिस्तानला ‘आतंकवादाचा प्रायोजक देश’ म्हणून घोषित केले पाहिजे. मुनीर यांना ‘पर्सन नॉन ग्राटा’ (अप्रिय व्यक्ती) घोषित करावे आणि अमेरिकेचा व्हिसा देऊ नये. डॉनल्ड ट्रम्प हे एक व्यापारी असून त्यांना खरेदी-विक्रीची सवय आहे. त्यांना हे समजत नाही की, ‘वाईट शांतता करार’ युद्धाला निमंत्रण देऊ शकतो. त्यांना ‘नोबेल शांतता पुरस्कार’ जिंकायचा आहे.’’