Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता

भारताने केला निषेध

तेहरान (इराण) – ‘जीएफ्एस् गॅलेक्सी’ या भारतीय व्यापारी नौकेवर ओमानच्या किनारपट्टीजवळ आक्रमण करण्यात आले. या नौकेवर ११ भारतीय होते, त्यांपैकी १० जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर १ जण बेपत्ता आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. तसेच या संकट काळात सहकार्य केल्यासां भारताने ओमानच्या अधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.

नौकांवरील आक्रमणे थांबलीच पाहिजेत ! – भारत

भारताने म्हटले आहे की, या भागातील व्यापारी, तेलवाहू नौका आणि नागरी पायाभूत सुविधा यांवर आक्रमणे करण्याची ही मालिका आता कोणत्याही परिस्थितीत थांबलीच पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या तत्त्वांना अनुसरून सर्व आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून मुक्त आणि विनाअडथळा जल वाहतूक, तसेच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत केला पाहिजे.