‘साधकांची साधना चांगली व्हावी’, अशी आत्यंतिक तळमळ असलेल्या पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत, वय ३७ वर्षे) !

‘श्रावण कृष्ण द्वितीया (११.८.२०२५) या दिवशी पू. दीपाली मतकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. दीपाली मतकर यांच्या चरणी त्यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. दीपाली मतकर

१. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. दीपाली मतकर यांनी साधनेच्या प्रयत्नांविषयी सांगितलेल्या सूत्राची साधक त्या आढाव्यात उपस्थित नसतांनाही त्याला मनातून जाणीव होणे आणि त्याने तसे प्रयत्न करणे

पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत, वय ३७ वर्षे) काही साधकांचा व्यष्टी साधनेचा (टीप) आढावा घेतात. एकदा पू. दीपालीताईंनी ‘साधकांचे साधनेचे प्रयत्न चांगले व्हावेत’, यासाठी त्यांना ‘प्रत्येक कृती करत असतांना त्यातून स्वतःची साधना होत आहे ना, याचे निरीक्षण करूया’, असे सांगितले होते. त्या वेळी मी त्या आढाव्यात उपस्थित नव्हतो.

श्री. दत्तात्रय पिसे

‘आढाव्यात साधनेचे कोणते प्रयत्न करायला सांगितले आहेत’, हे मी अन्य साधकांना विचारून घेतले नाही, ही माझी चूक झाली, तरीही त्यानंतरच्या आठवड्यात ‘प्रत्येक कृती करत असतांना त्यातून स्वतःची साधना होण्यासाठी प्रयत्न करूया’, अशी मला मनातूनच जाणीव झाली.

नंतरचा आढावा चालू असतांना ‘मला सुचलेले सूत्र आणि पू. दीपालीताईंनी करायला सांगितलेले साधनेचे प्रयत्न सारखेच आहेत’, हे मला अन्य साधकांकडून समजले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. दीपालीताई यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली.

(टीप – व्यष्टी साधनेचा आढावा : साधक करत असलेला नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न, कृतज्ञता, तसेच स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, या सूत्रांविषयी जाणून घेणे आणि साधकांना त्यासंदर्भात दिशा देणे)

२. पू. दीपाली मतकर साधकांना साधनेचे प्रयत्न करण्यास आध्यात्मिक बळ देत असणे 

पू. दीपालीताई साधकांना साधनेचे प्रयत्न करायला सांगत असतांना ‘सर्व साधकांनी तसे प्रयत्न करावेत’, अशी पू. ताईंना तळमळ असते. त्यामुळे साधकांना तसे प्रयत्न करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते आणि साधकांना पूर्वी अवघड वाटणारे प्रयत्नही त्यांच्याकडून सहजतेने होतात. ‘आमची साधना व्हावी’, या पू. ताईंच्या तीव्र तळमळीमुळेच त्यांनी सांगितलेल्या प्रयत्नांविषयी मला ठाऊक नसतांनाही त्यांनी सांगितलेले प्रयत्न करण्याचा विचार माझ्या मनात आला.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘साधनेचे प्रयत्न अत्यल्प आहेत’, याची जाणीव अनुभूतीच्या माध्यमातून होणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेल्या संतांचे मार्गदर्शन चैतन्याच्या स्तरावर असते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच आमची साधना होत आहे’, हे मला गुरुदेवांनीच अनुभूतीतून लक्षात आणून दिले. ‘माझ्याकडून साधनेचे प्रयत्न अत्यल्प होतात. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेल्या सूत्रांचे गांभीर्य मला अल्प आहे’, हे माझ्या लक्षात आले. आता मी पू. दीपालीताईंनी सांगितल्यानुसार साधनेचे प्रयत्न करीन.’

– श्री. दत्तात्रय पिसे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५१ वर्षे), सोलापूर (१२.६.२०२५)

साधकांशी जवळीक साधणार्‍या आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या पू. दीपाली मतकर !

पू. दीपाली मतकर

१. साधकांना साधनेत साहाय्य करणे

अ. ‘पू. दीपालीताई साधकांचा विचार करून त्यांना सेवा सांगतात आणि त्यांना सेवेत साहाय्य करतात.

आ. त्या रुग्णाईत साधकाला तत्परतेने नामजपादी उपाय सांगतात आणि त्याला औषधही घेण्यास सांगतात.

इ. ‘प्रत्येक साधकाला सेवा मिळावी आणि त्याचे साधनेचे प्रयत्न वाढावेत’, यासाठी त्या सतत प्रयत्नरत असतात.

श्री. संकेत पिसाळ

२. साधकांशी जवळीक साधणे

पू. ताई साधकांचा सत्संग घेण्यासाठी गेल्यावर तेथील साधकांच्या अडचणी जाणून घेतात आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्या साधकांच्या कुटुंबियांशीही प्रेमाने बोलतात आणि त्यांच्याशी जवळीक साधतात.

३. गुरुकार्याचा ध्यास

त्या प्रत्येक सेवा गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात. त्या सेवेचे नियोजन करतात आणि समयमर्यादा ठेवून ती सेवा पूर्ण करतात.

४. सेवाकेंद्राप्रती भाव

‘सोलापूर सेवाकेंद्रातील चैतन्य वृद्धींगत व्हावे’, अशी पू. ताईंना तळमळ आहे. त्यांनी साधकांना ‘सेवाकेंद्रातील सेवा कशा करायच्या ?’, याविषयी प्रत्यक्ष कृती करून शिकवले आहे.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव 

एकदा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राचे पूजन करत होतो. तेव्हा पू. ताईंनी मला सांगितले, ‘‘तू साक्षात् गुरुदेवांची पूजा करत आहेस. तू त्यांचे छायाचित्र हळुवार पुसायला हवे आणि गुरूंची पूजा भावपूर्ण करायला हवी.’’

– श्री. संकेत पिसाळ, सोलापूर सेवाकेंद्र (१९.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक