‘गर्वसे कहो हम हिन्दू है’, असे म्हणणारे हिंदु श्री गणेशमूर्तीविषयी धर्मशास्त्राचा आदर करतात का ?

सध्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची (‘पीओपी’ची) गणेशमूर्ती, कथित पर्यावरणवादी, सरकार आणि न्यायपालिका यांच्यामध्ये वादविवाद चालू आहे. याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. हिंदूंचा होत असलेला वैचारिक गोंधळ

गणेशोत्सव जवळ आल्याने सरकार, न्यायपालिका आणि कथित पर्यावरणवादी यांचा श्री गणेशमूर्ती बनवण्याच्या विषयावरून वादविवादाला आरंभ झाला आहे. ‘प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरू नये’, असे पर्यावरणवादी म्हणतात. त्यावर सरकार अहवाल देते, ‘पीओपी’ने जलप्रदूषण होत नाही.’ यात खरे तर हिंदूंचाच वैचारिक गोंधळ उडाला आहे. ‘श्री गणेशमूर्ती कोणती वापरावी ?’, हा धर्मशास्त्राचा विषय आहे. प्रत्यक्षात हा विषय कुणाच्या आवडीचा, निवडीचा किंवा कायद्याचा असू शकत नाही.

२. श्री गणेशमूर्तीविषयी धर्मशास्त्र आणि त्याचे अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण 

डॉ. हेमंत चाळके

अ. गणपतीची मूर्ती शाडूमातीचीच का हवी ? याचे धर्मशास्त्रीय विवेचन आक्षेप : ‘धर्मसिंधू’ ग्रंथामध्ये श्री गणेशचतुर्थीला गणपतीची मूर्ती कशी असावी ? याविषयी पुढील नियम दिला आहे.

तत्र मृन्मयादिमूर्तौ प्राणप्रतिष्ठापूर्वकं विनायकं षोडशोपचारैः सम्पूज्य । – धर्मसिन्धु, परिच्छेद २

अर्थ : या दिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थीला) श्री गणेशाच्या माती इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करून षोडशोपचार पूजा करावी.

येथे ‘मृन्मय इत्यादी’ असा शब्द असल्याने ‘इत्यादी’ या शब्दाच्या आधारे कुणी नारळांपासून, पैशांच्या नाण्यांपासून अथवा अन्य गोष्टींपासून मूर्ती बनवल्यास त्याला सनातनचा आक्षेप का ?

खंडण : ‘धर्मसिंधू’ हा ग्रंथ विविध स्मृतीग्रंथांचे संकलन करून बनवलेला आहे. कोणत्याही ग्रंथामध्ये आदी, इत्यादी यांसारखे शब्द एखादी माहिती संक्षिप्तपणे सांगण्यास वापरतात. या आदी, इत्यादी यांसारख्या शब्दांचा अर्थ योग्य संदर्भ पाहून लावावा लागतो. ‘धर्मसिंधू’च्या वरील उदाहरणातील आदी या शब्दाचा अर्थ नारळ, पैशांची नाणी इत्यादी होऊच शकत नाही. याचे कारण पुढीलप्रमाणे आहे.

वेदमूर्ती केतन शहाणे

‘स्कंद पुराणा’मध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले आहे. या वेळी ‘मूर्ती कशी असावी ?’, याचे सविस्तर वर्णन आले आहे.

स्वशक्त्या गणनाथस्य स्वर्णरौप्यमयाकृतिम् ।
अथवा मृन्मयी कार्या वित्तशाठ्यं न कारयेत् ।। – स्मृतिकौस्तुभ

(मूळ संदर्भ : स्कंदपुराण, सिद्धिविनायक कथा आणि पूजा)

अर्थ : या (सिद्धिविनायकाच्या) पूजेसाठी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे सोने, रूपे (चांदी) अथवा माती यांची मूर्ती बनवावी. यामध्ये कंजूषपणा करू नये.

यामध्ये ‘सोने, चांदी अथवा माती यांपासूनच मूर्ती बनवावी’, असा स्पष्ट उल्लेख असल्याने यांव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे. ‘धर्मसिंधू’च्या वरील सूत्रात ‘मृन्मयादि’ या शब्दावरून मृन्मय म्हणजे मातीच्या मूर्तीलाच प्राधान्य आहे, हे स्पष्ट होते; कारण व्याकरणाच्या नियमांनुसारही प्राधान्याच्या गोष्टींचा उल्लेख करून अन्य गौण गोष्टींसंदर्भात ‘आदी’ हा शब्द वापरला जातो.

३. शाडूमातीचीच श्री गणेशमूर्ती योग्य होय !

येथे पूजेसाठी श्री गणेशमूर्ती कोणती वापरावी ? हे स्पष्ट असतांना हिंदूंनी मातीच्या (शाडूमातीच्या) मूर्तीचा वापरण्याऐवजी ‘पीओपी’च्या मूर्तीचा आग्रह धरणे, हे धर्मविरोधी नाही का ? धर्मशास्त्राला हरताळ फासून ‘गर्वसे कहो हम हिन्दू है’, म्हणण्यात काय अर्थ आहे !

– डॉ. हेमंत चाळके, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी आणि वेदमूर्ती केतन शहाणे, अध्यापक, रत्नागिरी. (३.८.२०२५)