होमिओपॅथी डॉक्‍टरांना आधुनिक वैद्यांचा विरोध का आणि कशासाठी ?

नुकताच महाराष्‍ट्र शासनाने एक आदेश काढला असून त्‍या आदेशाप्रमाणे ‘होमिओपॅथी डॉक्‍टरांना १ वर्षाचा ‘फार्मसी’चा कोर्स दिला जाईल आणि तो कोर्स केल्‍यानंतर ते त्‍यांच्‍या उपचारपद्धतीमध्‍ये आधुनिक औषधांचा उपयोग करू शकतील.’ हा आदेश कार्यवाहीत आल्‍यानंतर आधुनिक वैद्यांनी त्‍या विरोधात निषेध नोंदवून तो आदेश रहित करावा, यासाठी आंदोलन केले. हा निषेध का आणि कशासाठी ? हे लक्षात येत नाही. या पाठीमागे ‘असुया’ हे एकच कारण असू शकते, असे मला वाटते.

१. खासगी रुग्‍णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्‍हणून होमिओपॅथी  डॉक्‍टर किंवा आयुर्वेद वैद्य कसे चालतात ?

आपण जर पाहिले, तर आज होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपॅथी या दोन्‍ही अभ्‍यासक्रमांमध्‍ये सर्व विषय सारखेच आहेत आणि केवळ ‘फार्मोकॉलॉजी’ (औषधनिर्माणशास्‍त्र) हा विषय होमिओपॅथीमध्‍ये शिकवला जात नाही; परंतु त्‍याऐवजी होमिओपॅथीमध्‍ये ‘ऑरगॅनॉन’ आणि ‘मटेरिया मेडिका’ हे दोन विषय शिकवले जातात, म्‍हणजे मूलभूत ज्ञानामध्‍ये कोणताही भेद नाही. होमिओपॅथी डॉक्‍टरांना ‘फार्मोकॉलॉजी’ हा विषय शिकवला असता तो अभ्‍यासक्रम साडेसहा वर्षांचा होतो; परंतु अ‍ॅलोपॅथी डॉक्‍टरांना केवळ साडेपाच वर्षेच लागतात.

आज खेडेगावामध्‍ये बहुतांश डॉक्‍टर हे होमिओपॅथी अथवा आयुर्वेद शिकलेलेच आहेत. बहुतेक खासगी रुग्‍णालयांमध्‍ये निवासी वैद्यकीय अधिकारी हे होमिओपॅथी डॉक्‍टर किंवा आयुर्वेद वैद्यच आहेत. जर त्‍यांना त्‍यांच्‍या रुग्‍णालयामध्‍ये होमिओपॅथी डॉॅक्‍टर चालतात, तर मग त्‍यांचा होमिओपॅथी डॉक्‍टरांनी ‘फार्मोकॉलॉजी’ विषय शिकण्‍याला विरोध का ?

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

२. होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपॅथी असा मिश्र अभ्‍यासक्रम असेल, तर रुग्‍णांना लाभच होणार !

आज काही आजार असे आहेत की, ज्‍यांना अ‍ॅलोपॅथीमध्‍ये आजार मुळापासून जाण्‍यासाठी औषध नाही. ते आजार होमिओपॅथीने पूर्णपणे बरे होऊ शकतात, तसेच काही शल्‍यकर्म होमिओपॅथी औषधाने टळू शकतात, म्‍हणजे एकप्रकारे ही परिपूर्ण अशी उपचारपद्धत आहे, असे लक्षात येते. अ‍ॅलोपॅथीच्‍या मर्यादा लक्षात आल्‍यामुळे आज मोठ्या प्रमाणात अ‍ॅलोपॅथी डॉॅक्‍टर होमिओपॅथी उपचार देत आहेत. आज काही मानसोपचार तज्ञ ज्‍यांना अ‍ॅलोपॅथीच्‍या मर्यादा लक्षात आल्‍या, ते पूर्णपणे होमिओपॅथी औषधे देत आहेत. एवढेच नाही, तर ते होमिओपॅथीमध्‍ये तज्ञ म्‍हणूनही ओळखले जातात. होमिओपॅथी डॉक्‍टर अ‍ॅलोपॅथी डॉक्‍टरांना विरोध करत नाहीत, तर जे चांगल्‍या प्रकारे होमिओपॅथी उपचार करत आहेत, त्‍यांच्‍याकडून शिकतही आहेत. डॉ. कुमार ढवळे हे अ‍ॅलोपॅथी डॉक्‍टर असूनसुद्धा त्‍यांची होमिओपॅथी शिक्षण देणारी एक संस्‍था आहे. डॉ. महेश गांधी हे एक अ‍ॅलापॅथी मानसोपचार तज्ञ असूनसुद्धा आज जगभरात होमिओपॅथीचे वेबिनार (ऑनलाईन चर्चासत्र) घेत आहेत. उलटपक्षी होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपॅथी असा मिश्र अभ्‍यासक्रम असेल, तर त्‍यामुळे रुग्‍णाला त्‍याचा लाभच होणार आहे.

३. औषधे निर्मिती करणार्‍या आस्‍थापनांकडूनच विरोध होत नसेल कशावरून ?

होमिओपॅथी औषधे स्‍वस्‍त असून घेण्‍यासही सुलभ आहेत. त्‍यामुळे एकप्रकारे लहान मुले आणि गरीब यांच्‍यासाठी ती एक संजीवनीच आहे. ही औषधे स्‍वस्‍त असल्‍यामुळे औषधे निर्मिती करणार्‍या आस्‍थापनांचा तोटा होऊ शकतो. त्‍यामुळे मला असे वाटते की, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्‍या माध्‍यमातून कदाचित् ती आस्‍थापनेच विरोध करत असतील. आज खेडेगावामध्‍ये वैद्यकीय व्‍यवसाय करणारे ६० ते ७० टक्‍के डॉक्‍टर हे होमिओपॅथी किंवा आयुर्वेदाचे डॉक्‍टर आहेत.

– होमिओपॅथी वैद्य श्री. प्रवीण मेहता, पुणे (१.८.२०२५)