Malegaon Blast Verdict : मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर राजकारण्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया 

(डावीकडून) मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार

काँग्रेसने माफी मागितली पाहिजे ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

तत्कालीन काँग्रेस सरकारने मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांना अडकवले. आता त्यांची निर्दाेष सुटका झाली आहे. या प्रकरणी काँग्रेसने माफी मागायला हवी ! त्या कालावधीत भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण काँग्रेसचा प्रचार खोटा होता, हे आता न्यायालयाच्या माध्यमातून उघड झाले.

भगव्या आतंकवादाचे नॅरेटिव्ह (कथानक) अयशस्वी झाले. तत्कालीन सरकारने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी कृती केली. त्यामुळे पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. पोलीस यंत्रणांवर दबावच टाकण्यात आला होता. ‘इस्लामी आतंकवाद उघड केला जात असतांना त्याला उत्तर म्हणून भगवा आतंकवाद आणायचा’, असा काँग्रेसप्रणित सरकारचा डाव होता. मतपेढीसाठी हिंदु आतंकवादाचे राजकारण करण्यात आले.

हिंदुत्वनिष्ठांना आरोपी म्हणून अडकवणार्‍यांनी हिंदु समाजाची क्षमा मागायला हवी ! – नीतेश राणे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री, भाजप

‘हिंदु आतंकवाद’ म्हणणार्‍यांचे तोंड आता काळे झाले. त्यांना आता चेहरा दाखवण्यासाठी जागाच उरली नाही. हिंदू कधीही धर्मांतर करून धर्म वाढवत नाहीत किंवा धार्मिक स्थळे तोडून, त्यांच्यावर आक्रमण करून स्वतःचे धार्मिक स्थळ उभारत नाहीत. हिंदु समाजाची अपकीर्ती करणार्‍यांच्या तोंडावर चपराक बसली आहे. यापुढे कुणीही हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याची हिंमत करू नये. आतंकवाद किंवा जिहाद यांचा रंग हिरवाच आहे, हे आता स्पष्ट झाले. आतापर्यंत अनेक खटल्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना खोट्या प्रकरणांत अडकवण्यात आले. आता हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना हे शक्य नाही. आमच्या हिंदु राष्ट्रात हिंदू सुरक्षितच रहातील. हिंदुत्वनिष्ठांना जाणीवपूर्वक अडकवणार्‍यांनी हिंदु समाजाची माफी मागायला हवी !

तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण केले ! – सुधीर मुनगंटीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री

अपराध्यांना त्रास झाला तरी चालेल; पण निर्दाेषांना त्रास नको. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात केवळ मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण केले जात होते. विशिष्ट धर्माच्या माध्यमातून आतंकवादी पुढे येत होते. आता देशाचा विकास होत आहे. हिंदु आतंकवाद किंवा भगवा आतंकवादी असा आरोप करण्यात आला होता; पण भगवा याचा अर्थ समजून घ्या ! ‘भ’ म्हणजे भयविरहित, ‘ग’ म्हणजे गर्वरहित आणि ‘वा’ म्हणजे वासनारहित होय ! त्यामुळे असा भगवा आतंकवाद असूच शकत नाही.

न्यायालयाचा निर्णय म्हणजे काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक ! – केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

या प्रकरणात कुठलाच पुरावा सादर करता आलेला नाही. न्यायालयाचा निर्णय म्हणजे काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराकच होय. केवळ तोकड्या माहितीवर ओढून ताणून हिंदूंना अपकीर्त करण्याचा डाव रचण्यात आला. तत्कालीन काँग्रेस सरकारने या प्रकरणी हिंदूंची क्षमा मागायला हवी.

किरीट सोमय्या, भाजप

भाजपचे नेते किरीट सोमय्या

हिंदूंनी जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे केवळ मतांच्या राजकारणासाठी केले गेले.

मग आरोपी गेले कुठे ? – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ

७ आरोपी निर्दाेष सुटले; पण मग आरोपी गेले कुठे ? जे दोषी असतील, त्यांना पकडले जावे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. वर्ष २००८ मधील मुंबईवरील आतंकवादी आक्रमणात ठार झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांनी मालेगाव प्रकरणाचे पुष्कळ धागेदोरे शोधले होते. त्यांचे काय झाले ? आता आरोपींना शोधणे हे सरकारचे दायित्व आहे.

खोटे पुरावे सादर करणार्‍यांवर न्यायालय कोणती कारवाई करणार ? – इम्तियाज जलील, एम्.आय.एम्. प्रदेशाध्यक्ष

एम्.आय.एम्. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील

७ आरोपी निर्दाेष सुटले असतील, तर मग हा बाँबस्फोट कुणी घडवून आणला ? या प्रकरणात साध्वी किंवा सैन्यदलातील अधिकारी यांना अडकवण्यात आले होते. त्यांना जर निर्दाेष सोडले असेल, तर मग न्याययंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. या प्रकरणात पुरावेच नव्हते, तर मग खोटे पुरावे सादर करणार्‍यांवर न्यायालय कोणती कारवाई करणार ?

(म्हणे) ‘मालेगावचा निकाल म्हणजे अन्वेषण यंत्रणांचे अपयश !’ – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण

पहिली आतंकवादी घटना नथुराम गोडसे प्रकरणात झाली. आतंकवादाला कोणताही धर्म, जात, पंथ नसतो. आतंकवादी केवळ गुन्हेगार असतो. कृपया तुम्ही ‘भगवा’ आतंकवाद हा शब्द वापरू नका. तो शब्द पवित्र आहे. मालेगावचा निकाल म्हणजे अन्वेषण यंत्रणांचे अपयश आहे. (हे केवळ अन्वेषण यंत्रणांचे नव्हे, तर त्याच्यावर दबाव आणणार्‍या तत्कालीन काँग्रेस सरकारचेही अपयश आहे, हे चव्हाण येथे लपवत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)