AL Qaeda Terrorist : ‘अल् कायदा’च्या आतंकवादी महिलेला बेंगळुरूतून अटक

महिला आतंकवादी शमा परवीन

कर्णावती (गुजरात) – गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अल् कायदाच्या भारतीय गटातील महिला आतंकवादी शमा परवीन (वय ३० वर्षे) हिला बेंगळुरूतील हेब्बाळा भागातून अटक केली. २३ जुलै या दिवशी या पथकाने उत्तरप्रदेश, देहली आणि गुजरात येथून ४ आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून शमा हिच्याविषयी माहिती मिळाली. शमा परवीनच्या अटकेवरून असेही दिसून येते की, आतंकवादी संघटना आता महिलांनाही आतंकवादी कारवायांमध्ये सक्रीय करत आहेत. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पकडण्यात आलेली महिला पाकिस्तानच्या थेट संपर्कात असल्याची माहिती दिली.

पथकाचे उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी सांगितले की, परवीन सामाजिक माध्यमांद्वारे अल् कायदाशी जोडली गेली होती. याद्वारे भारतविरोधी कारवायांमध्ये तरुणांना सहभागी करून घेण्याचे दायित्व तिच्यावर सोपवण्यात आले होते. सध्या या गटातील इतर आतंकवादी आणि त्यांचे षड्यंत्र यांची माहिती जाणून घेण्यासाठी तिची चौकशी केली जात आहे.

‘गजवा-ए-हिंद’चा (भारताचे इस्लामीकरण करण्यासाठीच्या युद्धाचा) प्रसार

अटक करण्यात आलेले आतंकवादी ‘इन्स्टाग्राम’ सारख्या सामाजिक माध्यमाद्वारे  ‘गजवा-ए-हिंद’चा प्रसार करत असल्याचे समोर आले आहे. भारतातील तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांना अल् कायद्याच्या प्रवाहात ओढण्याचे काम परवीन करत होती. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचा आतंकवाद्यांचा प्रयत्न होता. जिहादी विचार पसरवण्यासाठी परवीन ५ इन्स्टाग्राम खाती चालवत होती. त्यात ती तरुणांना जिहादी विचारासाठी प्रवृत्त करत होती. ‘जिहादसाठी बाँबची नाही, तर केवळ एका चाकूचीच आवश्यकता आहे’, असे चिथावणीखोर विचार ती पसरवत होती. तिच्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत किती तरुण तिच्या संपर्कात आले ?, याचे अन्वेषण केले जात आहे.

संपादकीय भूमिका

अशांना आता पोसत बसण्यापेक्षा जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा !