(म्हणे) ‘गणेशोत्सव, छठपूजा, नवरात्रोत्सव, कुंभमेळा यांमुळे प्रदूषण होते !’ – सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक

सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचा प्रचार !

सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक

मुंबई – गणेशोत्सव, छठपूजा, नवरात्रोत्सव या काळात मूर्ती विसर्जन करून आपण समुद्र आणि अन्य नैसर्गिक स्रोत यांची हानी करत नाही का ? कोणता धर्म या सगळ्यांचे समर्थन करतो ? असा प्रश्न मी नेहमीच स्वत:ला विचारतो. नद्या आणि समुद्रकिनारे प्रदूषित करणे, हे धार्मिक स्वातंत्र्य म्हणून कधीही न्याय्य ठरू शकते का ? धर्माच्या नावाखाली आपण पर्यावरणाची हानी करत आहोत. कुंभपर्व हे याचे ताजे उदाहरण आहे, अशा प्रकारे वक्तव्य करून सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी जलस्रोतांचे प्रदूषण हे हिंदूंच्या सण-उत्सवांमुळेच होत असल्याचा प्रचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दैनिक ‘लोकसत्ता’च्या २७ जुलैच्या अंकामध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले, ‘‘किती कोटी नागरिक कुंभपर्वात स्नानासाठी गेले ? आपण नदीचे पाणी प्रदूषित करत नाही का ? याविषयी कुणीतरी प्रश्न विचारला पाहिजे. प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मूलभूत अधिकार आहे, हे मी नेहमीच निकालांमध्ये सातत्याने मांडले. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्‍हास हा थेट या अधिकाराचे उल्लंघन करतो. अजानसाठी ध्वनीक्षेपकाचा उपयोग हे घटनेच्या अनुच्छेद २५ अंतर्गत इस्लामचा अविभाज्य भाग नाही.’’

संपादकीय भूमिका 

संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचा विचार हिंदु धर्म करतो. काळानुसार उत्सवात होणारे अपप्रकार रोखायलाच हवेत; मात्र वर्षातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दिवशी असलेल्या हिंदूंच्या सण-उत्सवांमुळे प्रदूषण होत असल्याचा बागुलबुवा निर्माण केला जात आहे. हिंदूंचे सण-उत्सव आल्यावर प्रदूषणाच्या नावाने टाहो फोडणार्‍यांना वर्षभर कारखाने, पशूवधगृहे आदींमुळे होणारे प्रदूषण का दिसत नाही ? यालाच पर्यावरणप्रेम म्हणायचे का ?