विशिष्ट निगा अथवा खास शेती न करता उगवलेल्या भाज्यांना ‘रानभाज्या’ म्हणतात. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात, लागवड न करता निसर्गतः या वाढत असतात. या वनस्पतींमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, उपयोगी रसायने, औषधी गुणधर्म असतात. अशा रानभाज्यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाकडून चालू केलेली मालिका येथे दिली आहे.
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/938800.html
(भाग २)
१. भारंगी भाजीची माहिती
ताप किंवा कफ असलेल्या रोगांमध्ये भारंगीचे मूळ दिले जाते. कफ अधिक वाढल्याने होणार्या दमा, खोकला या विकारात भारंगमूळ प्रामुख्याने वापरले जाते. सर्दी आणि घशातील दोष यांवर सुंठ अथवा वेखंडासमवेत भारंगमूळ दिले जाते. दम्यावर भारंग मूळ, ज्येष्ठमध, बेहडा आणि अडुळशाची पाने यांचा काढा करून देतात. दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात भारंगीच्या पानांची भाजी वापरतात. कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत ही भाजी गुणकारी ठरते.
पोटात कृमी (जंत) झाल्यास पाने शिजवून त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त आहे. भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.

अ. भाजी करण्याची पद्धत : देठ काढून टाकून भारंगीची कोवळी पाने चिरून घ्यावीत. कढईत तेल टाकून त्यावर मोहरी तडतडू द्यावी. त्यावर अर्धी वाटी चिरलेला कांदा परतून घ्यावा. यात लसणाच्या ४-५ पाकळ्याही ठेचून घालाव्यात. त्यावर चिरलेली भारंगीची पाने घालावीत. झाकण ठेवून वाफ काढावी. पाण्याचा थोडा त्यावर हबका मारावा (पाणी शिंपडावे). तिखट, मीठ, हळद, थोडा गुळ आणि हिंग घालून शिजवून उतरावी. भारंगीची भाजी कडू असल्याने बर्याच वेळा पाणी काढूनही ती केली जाते.
आ. भारंगीच्या फुलांची भाजी करण्याची पद्धत : कडवटपणा काढण्यासाठी भारंगीची फुले २-३ वेळा पाण्यातून पिळून घ्यावीत. त्यानंतर ती चिरून घ्यावीत. तेलाच्या फोडणीत मोहरीसह एक वाटी चिरलेला कांदा परतून घ्यावा. मूग डाळ धुवून घालावी. त्यानंतर चिरलेली फुले घालावीत. परतून तिखट घालावे. मंद आचेवर ही भाजी परतावी. चवीनुसार मीठ, गुळ घालून भाजी पुन्हा परतून घ्यावी. भाजलेल्या डाळीचा कूट, भाजलेल्या तिळाची पूड, खसखस, खिसलेले खोबरे घालूनही भाजी अधिक चविष्ट बनवता येते.
तोंडाची चव गुळचट असणे, पोट जड असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित् सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या पालटाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे अशा वेळी लसणाची फोडणी देऊन भारंगीच्या पानांची भाजी बाजरीच्या भाकरीसह खावी.
वाचक हो…, चला तर मग भारंगीची भाजी मिळवून ती करून तिचा आस्वाद मनसोक्त घ्या आणि हो ती कशी झाली, हे आम्हाला सांगायला मात्र विसरू नका. यापेक्षा अधिक नवीन कृती कुठे केली जात असेल, तर ती समाजमाध्यमांवर प्रसारित करा.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/939883.html

मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मंदिरांचे सरकारीकरण टाळण्यासाठी उपाययोजना !