‘मी आणली भाजी, ताजी ताजी भाजी..’
‘आजी गं आजी.. कर ना गं भाजी..’
या बडबड गीतातील आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जातांना दिसत आहेत. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृद्ध करणारी घरातील आजी, तिचा ‘औषधी गुणकारी बटवा’ आणि मानवी आरोग्य समृद्ध करणारी तिची ‘रानभाजी’ या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे.
विशिष्ट निगा अथवा खास शेती न करता उगवलेल्या भाज्यांना ‘रानभाज्या’ म्हणतात. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात, लागवड न करता निसर्गतः या वाढत असतात. या वनस्पतींमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, अत्यंत उपयोगी रसायने, अनेक औषधी गुणधर्म असतात. ऋतूनुसार या भाज्या सहज उपलब्ध होत असतात. जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून या रानभाज्यांचा आहारात वापर करतात.
अशा रानभाज्यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाने आजपासून चालू केलेली मालिका येथे दिली आहे.
(भाग १)
१. मधुमेहींसाठी गुणकारी करटोली…
गोल मटोल हिरवी पिवळसर ‘करटोली’ ही खास करून पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला पहायला मिळते. याला काटोली, रानकारली, काटवल या स्थानिक नावानेही ओळखले जाते. करटोलीची पाने ताप, दमा, दाह, उचकी, मूळव्याध यांत गुणकारी आहेत. मधुमेहामध्ये गुणकारी असलेल्या या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर न्यून होते.
अ. भाजी करण्याची पद्धत : हिरवी कोवळी करटोली प्रथम अर्धी चिरून त्यातील बिया आणि गर काढावा. बटाट्याचे काप केल्याप्रमाणे ती चिरून घ्यावी. कढईत तेल गरम करून हिंग, मोहरी आणि थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी. त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. नंतर कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट आणि हळद घालून परतावे. चिरलेली करटोली त्यात घालून पुन्हा परतावीत. कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर झाकण काढून मंद आचेवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी. वरून ओले खोबरे आणि आवश्यकतेनुसार चवीपुरती साखर घालावी. तयार भाजीचा मस्तपैकी आस्वाद घ्यावा अन् समाधानाची ढेकर द्यावी.
मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतोच. यामध्ये या गुणकारी करटोलींचा मिळेल तेव्हा अधिकाधिक समावेश करायला हरकत नाही. त्या निमित्ताने नव्या पिढीलाही या रानभाजीची गोडी लागण्यास साहाय्यच होईल.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/939125.html

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?