
सध्या तरुण वयापासून मुलांना अपचन, आम्लपित्त, ग्रहणी (पोटाचा एक रोग) पासून गंभीर निदान असलेले कोलयटिस (आतड्यांना सूज येणे), क्रोअन्स डिसीज (लहान आतड्यांना हानी पोचवणारा एक आजार) यांसारखे वेगवेगळे आजार होतांना दिसतात. यामागे शरिरात दाह वाढवणारे पाकिटबंद अन्नपदार्थ, कृत्रिम पेये आणि कर्करोग वाढवणार्या अनेक गोष्टी आहेत. त्यासह जागरण, चिंता, सकस भाज्या आणि धान्य नसणे, तसेच नीट दिनचर्या नसल्याने न्यून झालेली शरिराची क्षमता या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत.

चांगले पचन होण्यासाठी चांगला अग्नी आवश्यक आहे. अग्नी ही आयुर्वेदात वर्णन केलेली बरीच मोठी संकल्पना आहे. ‘वारंवार भूक लागणे, म्हणजे अग्नी चांगला आहे’, असे नाही. ढोबळ भाषेत ‘अग्नी’ म्हणजे शरिराची अन्न पचवायची शक्ती, शरीरधातू बनवण्याची शक्ती, पोषक भाग योग्य ठिकाणी पोचवणे, मलभाग योग्य वेळी बाहेर टाकणे या गोष्टी अपेक्षित आहेत.
पचनशक्ती कशी सांभाळाल ?
१. पुष्कळ अधिक किंवा पुष्कळ अल्प प्रमाणात खाऊ नये. आवश्यकतेपेक्षा अधिक किंवा न्यून खाणे पचनशक्ती न्यून करते.
२. सावकाश चावून खावे. घाईघाईने खाण्याने अन्न नीट चावले जात नाही. लाळ आणि पाचक रस नीट मिसळेपर्यंत पुढचे अन्न पटपट पोटात जात रहाते, अशाने पचन मंदावते.
३. नियमित व्यायाम आणि झोप असावी. प्रतिदिन किमान अर्धा घंटा किंवा आठवड्यात ४ वेळा तासभर व्यायाम करायला हवा. जेवण झाल्यावर लगेच कामाला लागू नये. रात्रीच्या वेळी व्यायाम करू नये.

४. दुपारचे जेवण १२ ते २ या वेळेत आणि रात्रीचे ७.३० ते ८.३० या वेळेत करावे. रात्री उशिराचे जेवण पचन बिघडवते.
५. जेवणाच्या मध्ये-मध्ये पाणी आवश्यकतेप्रमाणे प्यावे. जेवणाच्या आधी, नंतर किंवा सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी पिणे पचनाला मारक ठरते.
६. जेवणात गोड तर गोड, तिखट तर तिखट अशी एक प्रकारची चव नसावी. जेवणात ताक असावे. जेवण गरम, ताजे, शिजवलेले असावे.
७. शिळे, आंबवलेले आणि पाकिटबंद अन्नपदार्थ टाळावेत; वारंवार ‘अॅन्टिबायोटिक’ (प्रतिजैविके) खाण्याने पचनाला उपयोगी असलेले चांगले जीवाणूही नष्ट होतात.
८. चांगले पचन, हे चांगल्या आरोग्याचे मूळ असते. पालटती हवा, पाणी, अन्न बघता आपण थोडी काळजी घेतली, तर शक्यतो रोग होणार नाहीत आणि झालेच, तरी आटोक्यात असतील, हे नक्की !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
अन्न-औषध विभागाकडून राज्यभरात गुटखामाफियांवर धाडी !
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन