कार्ला (पुणे) येथील आई श्री एकविरा देवस्थानात वस्त्रसंहिता लागू !

तोकडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून गेल्यास प्रवेश बंदी !

श्री एकविरा देवस्थान

कार्ला (ता. मावळ, जिल्हा पुणे) – येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने आई श्री एकविरादेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी वस्त्रसंहिता (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना वापरायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियम) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान, तसेच आगरी आणि कोळी समाजाचे कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई एकवीरादेवी मंदिरात येणार्‍या भाविकांसाठी अर्थात् महिला आणि पुरुष यांसाठी ७ जुलैपासून पोषाखाविषयी ही नियमावली लागू असणार आहे. दुकानदार आणि स्थानिक यांच्यासाठीही हा नियम लागू असणार आहे. ‘या निर्णयानुसार मंदिरात येणार्‍या भाविकांनी भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करावा. तोकडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून आल्यास भाविकाला मंदिरात प्रवेश देणार नाहीत’, असे देवस्थानकडून स्पष्ट केले आहे. २७ जून या दिवशी देवस्थान ट्रस्टची याविषयी बैठक झाली. त्यात सर्व सदस्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला. मंदिरातील धार्मिक वातावरणाची पवित्रता टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वस्त्रसंहितेविषयी घेण्यात आलेल्या बैठकीस ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, प्रमुख विश्‍वस्त खासदार सुरेश उपाख्य बाळ्या मामा म्हात्रे, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वस्त्रसंहितेची माहिती देणारा फलक

वस्त्रसंहितेचे नियम

महिलांसाठी : साडी, सलवार-कुर्ता किंवा अन्य भारतीय पारंपरिक पोशाख
पुरुषांसाठी : धोतर-कुर्ता, कुर्ता-पायजमा, पँट-शर्ट किंवा पूर्ण अंग झाकलेले असेल, असे भारतीय पारंपरिक पोशाख

बंदी असलेले पोषाख

मंदिरात येतांना पाश्‍चात्य पोषाख, शॉर्टस्, मिनी स्कर्ट्स, हाफ पँट, फाटलेली जीन्स यांसारखे पोशाख वर्ज्य करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

श्री एकविरा देवस्थानाचा अभिनंदनीय निर्णय ! राज्यात अशा प्रकारे बहुतेक मंदिरे निर्णय घेऊ लागले आहेत. आता याच प्रमाणे मंदिरांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न चालू करावेत. जेणेकरून हिंदूंना त्यांच्या धर्माचे महत्त्व, धार्मिक विधींमागील कारण, अध्यात्मशास्त्र आदींची माहिती मिळेल आणि त्यांच्या श्रद्धेत आणखी वाढ होईल !