योग आणि त्याद्वारे आत्मोन्नती !

‘आजकाल योग केवळ शारीरिक व्याधी किंवा शरीरसौष्ठव यांकरता अधिक प्रमाणात केला जातो; परंतु योग हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर लाभदायक आहे. मानवी मन हे चंचल असून ते सदैव विषयासक्त असते. त्याला नियंत्रित आणि एकाग्र करण्याकरता आचार्य पातंजलींनी ‘अष्टांगयोग’ सांगितला आहे. अष्टांगयोगाच्या सतत अभ्यासामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होऊन शेवटी कैवल्यप्राप्ती (मोक्षप्राप्ती) होते. योग साधनेसाठी पुढील ८ अंगांचा क्रमाने अभ्यास करणे आवश्यक आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांना ‘अष्टांग’ म्हणतात. यातील प्रथम ५ अंगांना ‘बहिरंग’ योग, तर उर्वरित ३ अंगांना ‘अंतरंग’ योग असे म्हणतात.

प्रतीकात्मक चित्र

१. यम

यांचे पालन केल्याने मनाचे रज आणि तम दोष दूर होऊन ते सात्त्विक गुणांनी युक्त होते. नैतिक आणि सामाजिक आरोग्यासाठी हे उपयुक्त आहे. यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (संचय न करणे) इत्यादींचा समावेश होतो. वरील आचरणाने व्यक्ती सात्त्विक व्हायला लागते. आचरण हे व्यवहारात आणि समाजात स्थैर्य निर्माण करणारे होते.

२. नियम

स्वतःचे जीवन अनुशासनबद्ध करणारी आणि आरोग्यास पूरक अशी कर्तव्ये अन् भावना यांना नियम म्हणतात. पातंजलींनी पुढील ५ नियम वर्णन केले आहेत.

अ. शौच : यामध्ये शारीरिक आणि मानसिक शुद्धी समाविष्ट होतात. पंचकर्मासारखे उपचार, तसेच यौगिक क्रिया (धौती, नेती, नौत्वी, त्राटक इत्यादी) यांमुळे शारीरिक शुद्धी होते, तर सत्याचे आचरण, षड्रिपूंचा त्याग यांमुळे मनाची शुद्धी होते.

आ. संतोष : सुख-दुःख, लाभ, हानी, अनुकूलता-प्रतिकूलता या द्वंद्वांच्या स्थितीत नेहमी संतुष्ट रहाणे, म्हणजे संतोष होय. मनामध्ये समत्वाची भावना बाळगणे, म्हणजे संतोष होय.

इ. तप : मंत्र-जप, अनुष्ठान, व्रत-वैकल्य, उपासना इत्यादी करणे; परंतु हे करतांना स्वतःचे आचरण मात्र शुद्ध हवे. मनात सद्भावना असावी.

मानसन्मान या उद्देशाने किंवा ढोंगीपणाने केलेले तप, तसेच विधीरहित, दुसर्‍यांचा नाश होण्याच्या उद्देशाने केलेले तप राजसिक आणि तामसिक असते. महर्षि व्यास यांच्यानुसार तपरहित मनुष्याला योग सिद्ध होत नाही.

ई. स्वाध्याय : इष्टदेवतेची उपासना करणे, नामस्मरण करणे, स्तोत्रांचे पठण करणे इत्यादी स्वाध्यायाची सिद्धी झाल्यास इष्टदेवता प्रसन्न होऊन दर्शन देते. साधकाला तशा अनुभूतीही येतात.

उ. ईश्वरप्रणिधान : कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता ईश्वराला अर्पण करणे, म्हणजे कर्ता करवता ईश्वर आहे, अशी भावना असणे, म्हणजे ईश्वरप्रणिधान.

३. आसन

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

स्थिरत्व आणि सुखानुभूती हे आसनाचे खरे स्वरूप आहे. व्याधीप्रतिबंधनासाठी आसनांचे विशेष महत्त्व आहे. आसनांचा अभ्यास तज्ञ व्यक्तींकडून शिकूनच करावा.

४. प्राणायाम

श्वासोच्छ्वास ही शरिरातील महत्त्वाची क्रिया असून तिच्या योग्यायोग्यतेवरच आरोग्य टिकून असते. भोजन, निद्रा, चालणे, परिश्रम इत्यादींचा आपल्या श्वसनावर परिणाम होत असतो. या क्रियांच्या वेळी प्राणशक्तीचा अपव्यय होत असतो. तो अपव्यय टाळण्यासाठी प्राणायाम ही उत्तम यौगिक क्रिया आहे. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवून प्राणशक्ती वश करता येते आणि ते प्राणायामाने साध्य होते; म्हणून आसनांच्या जोडीला प्राणायामाचा सराव अवश्य करावा.

५. प्रत्याहार

इंद्रियांना (ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये) आपल्या विषयांपासून अलिप्त ठेवून चित्ताच्या स्वरूपाला अनुसरून रहाणे, म्हणजे प्रत्याहार होय. प्रत्याहारामुळे मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची विविध विषयांतील आसक्ती न्यून होऊ लागते. मनाची चंचलता नष्ट होते. आवड-निवड नष्ट होते. सत्त्वगुणांची वाढ झाल्याने मानसिक व्याधी हळूहळू नष्ट होतात.

६. धारणा

चित्ताला विशिष्ट स्थानावर स्थिर करणे, म्हणजे धारणा होय. देवतेचे चित्र किंवा भ्रूमध्याच्या ठिकाणी नासाग्रांवर चित्त एकाग्र करत नामजप करणे. हे करतांना साधक देहभान विसरून तल्लीन होऊन जातो. त्यामुळे मनातील विचारांवर नियंत्रण येते आणि मन एकाग्र होते.

७. ध्यान

एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करून चित्त एकाग्र केल्यास त्याच ठिकाणी त्याची एकतानता होणे, म्हणजे सारखे त्याच वस्तूचे चिंतन करत रहाणे, याला ‘ध्यान’ म्हणतात. ईश्वराचे सतत नामस्मरण करण्याचा ध्यास लागणे म्हणजे ‘ध्यान’ होय.

८. समाधी

ज्याचे ध्यान करत आहोत, त्यात तल्लीन होऊन साधकाला स्वतःच्या अस्तित्वाचेही भान रहात नाही, त्या स्थितीला ‘समाधी’ म्हणतात. मन अात्म्यामध्ये स्थिर होऊ लागते आणि मनाला सुख-दुःखाची जाणीव होत नाही. आनंदाची परमावस्था समाधीमुळे प्राप्त होते. यानंतर मनुष्य मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करू लागतो.

अशा प्रकारे योग, प्राणायाम हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकरता उपयुक्त आहेतच; परंतु जिवाची आध्यात्मिक उन्नती होण्याच्या दृष्टीनेही अष्टांगयोगात विविध उपाय सांगितले आहेत. प्रत्येक जिवाची धडपड ही आनंदाकरता असते. आनंदप्राप्तीसाठी केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असून चालणार नाही, तर त्याला अध्यात्म्याची जोड देणेही आवश्यक आहे.’

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (१७.६.२०२५)

योग म्हणजे जीवनशैली !

जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून योग स्वीकारतांना योगाचार धर्माचा, म्हणजेच योगानुकूल आहार, विहार, आचार, विचार आणि उच्चार या पंचांग साधनेचा प्रकर्षाने विचार व्हायला हवा.

– सौ. अपर्णा एलकुंचवार     

यम-नियम पालन करण्यानेच योगाभ्यासाचे यश मिळेल !

यम आणि नियम यांवरच योगाभ्यासातील यश अवलंबून आहे. योगातील अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी रज-तम गुण क्षीण करून सत्त्वगुणांची वृद्धी आवश्यक आहे आणि त्यापुढे त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यावरच अंतिम ध्येयापर्यंत पोचता येते. तेव्हा रिकाम्या वेळात आपण आळस आणि चंचलता न्यून करून सात्त्विक मनोवृत्ती होईल, अशा गोष्टी जर केल्या, तरच तो योगानुकूल विहार होईल.

– डॉ. मुकुंद रामचंद्र भिडे   

योगाभ्यासात मन शांत करून मनोविकार दूर करणे आवश्यक !

योगाभ्यासात शास्त्रशुद्ध शवासन, योगनिद्रा यांची जोड दिली, तर मन आणि विचार शांत होतात. ‘शशांकासन’ करणे आवश्यक आहे. या आसनात मेंदूत शुद्ध रक्तप्रवाह वाढून मन शांत आणि बुद्धी प्रगल्भ होत जाते. मनातील अशुद्ध विचारांना ‘रोगट’ म्हणणेच योग्य आहे आणि हे मनोविकार दूर होण्यासाठी शास्त्रशुद्ध उपाय करायला हवेत. मानवीय व्यवहारावर त्रिगुणांची दाट छाया आहे. त्यामुळे आपले विचार सत्त्वप्रधान असावयास हवेत.

– श्री. सतीश एलकुंचवार

(सर्व साभार : मासिक ‘योगप्रकाश’, दीपावली विशेषांक)

यम-नियमांचे लाभ केवळ वैयक्तिक नव्हे, तर समाजालाही !

भगवान पातंजलीनी अष्टांगयोगाची जी रचना केली आहे, त्या अष्टांगयोगातील पहिले अंग ‘यम’ आहे. पातंजलीमुनींनी यमाच्या आचरणाला ‘सार्वभौम महाव्रत’ असे म्हटले आहे. यम, नियमांच्या पालनाचे लाभ केवळ वैयक्तिक नसून त्याचे परिणाम समाजावरसुद्धा होतात. योगशास्त्राचा ग्रंथ असणार्‍या श्रीमद्भगवद्गीतेत १६ व्या अध्यायात ‘दैवासुरसंपद्विभागयोग’ भागात ज्या दैवी गुणांचे वर्णन भगवंतांनी केले आहे, तेच आचार रसायन आणि यम-नियमांत आढळते.

– डॉ. (सौ.) मेघा कुळकर्णी                                                                         

(साभार : मासिक ‘योगप्रकाश’, दीपावली विशेषांक)

 

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.