शाळांनी प्रतिदिन १५ मिनिटे विद्यार्थ्यांकडून योगासने करून घ्यावीत ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्यात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

पणजी, २१ जून (वार्ता.) – आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने प्रतिदिन सकाळी वेळ काढून योगासने केल्यास प्रत्येकाला उत्तम आरोग्य प्राप्त होईल, तसेच राज्यातील शाळांनीही यासाठी पुढाकार घेऊन प्रतिदिन १५ मिनिटे विद्यार्थ्यांकडून योगासने करून घ्यावीत. यामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रता साध्य करता येईल, तसेच त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बळकट होईल. ‘विकसित भारत-२०४७’ च्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी इतर मंत्रीगण, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, पोलीस महासंचालक अलोक कुमार, सरकारी अधिकारी आणि युवा-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही योगासने केली.

भारताला समृद्ध बनवणारी परंपरा !

डॉ. प्रमोद सावंत

  डॉ. सावंत पुढे म्हणाले,
‘‘आपण आपल्या आयुष्यात आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब केला, तर आपले कुटुंब आनंदी आणि निरोगी बनू शकते. प्रत्येक कुटुंबाने योगासने करावीत. यामुळे मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार नियंत्रणात राहू शकतात. कुटुंबाचा शारीरिक आणि मानसिक समतोल रहाण्यासाठी योगासने अत्यावश्यक आहेत. ही केवळ प्राचीन परंपरा नाही, तर आजच्या काळातील आवश्यकता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म, देश, भाषा या सर्व सीमा पार करून योगासनांचे महत्त्व जगभर पोचवले आहे. जगातील सर्व देश आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करतात.’’

योगसाधना आवश्यक ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

विश्वजीत राणे

याप्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘योगासनांमधून ऊर्जा, शिस्त आणि आनंद मिळतो. आज योग ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण साधना बनली आहे.


योग हा केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातील आरोग्य आणि एकता यांची एक शक्ती बनली आहे.’’