आज आंतरराष्ट्रीय योगदिन आहे. त्या निमित्ताने…
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस ! अनेक जण योगासने करतांनाची स्वतःची छायाचित्रे, व्हिडिओ प्रसारित करत आहेत, हे आनंदाचे आहे. योग्य गोष्टींचा असाच प्रचार-प्रसार व्हायला हवा; पण ‘केवळ आसन-प्राणायाम, म्हणजेच योग किंवा योग हा व्यायामप्रकार आहे’, ही अत्यंत चुकीची धारणा रूढ होऊ पहात आहे. याकरताच ज्यांना आपण ‘योगेश्वर’ म्हणतो, ते भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, ते पहाणे महत्त्वाचे आहे.

खरा ‘योग’ !
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४८
गीतेतील या श्लोकावरील भाष्यात आद्यशंकराचार्य म्हणतात, ‘योगात स्थित होऊन कर्म करावीत. ही कर्म ईश्वरार्थ असली पाहिजेत. त्यातही ईश्वराने मला काही द्यावे, अशी फलासक्ती असू नये. ‘माझे कर्म ईश्वराप्रती आहे’, इतकीच भावना त्यात असावी. विशुद्ध अंत:करणाने आणि फलतृष्णारहित भावनेने कर्म केल्यास होणार्या ज्ञानप्राप्तीला ‘सिद्धि’ असे म्हणतात. याविपरित असते ती असिद्धि ! तर अशी ही सिद्धि आणि असिद्धि यांकडेही समत्वाच्या भावनेने पहाणे, हाच खरा ‘योग’ होय !’ पुढे ५० व्या श्लोकात आलेली ‘योगः कर्मसु कौशलम् ।’
(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०), ही व्याख्यासुद्धा याच संकल्पनेला धरून आहे.

वैद्य म्हणून योगाविषयीची भावना
योग ही किती सखोल संकल्पना आहे पहा ! एक वैद्य म्हणून आलेल्या रुग्णाचे परीक्षण करून त्याला चिकित्सा देतांना हीच ईश्वराप्रती कर्तव्य आणि सिद्धि-असिद्धि समत्वाची भावनाच तर लागते.
व्याधेस्तत्त्वपरिज्ञानं वेदनायाश्च निग्रह:।
एतद् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषः ।।
‘रोगाचे ज्ञान आणि त्यापासून मुक्तीसाठी प्रयत्न हेच वैद्याचे वैद्यत्व ! वैद्य हा आयुष्याचा परमेश्वर नव्हे’, असे सांगतांना आमच्या पूर्वजांचा हाच तर दृष्टीकोन होता. ‘I treat, HE cures’ (मी उपचार करते, तो बरा करतो.), ही आमची भावना याच योगातून आली आहे. बहुसंख्य वैद्यांच्या ‘पोस्ट्स’ (लिखाण) वाचा. आपण बर्या केलेल्या रुग्णांविषयी ‘हे आयुर्वेदाने केले’, असे शब्द वाचायला मिळणे, हाही ‘योग’च नव्हे का ? सगळे वैद्य योगी वगैरे आहेत का ? नाहीच मुळी; पण हीच वैचारिक बैठक, तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी लाभल्याने त्याच मार्गावरून चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही वैद्य नक्की करत असतो.
दिवस साजरे होत रहातील… आजच्या काळात ते आवश्यक आहेच. आपण मात्र केवळ शारीरिक कसरतीतच अडकून न रहाता ‘योग’ आचरणात आणायचा प्रयत्न करूया !
– वैद्य परीक्षित शेवडे, एम्.डी. (आयुर्वेद), डोंबिवली.
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !