Asim Munir Anti-India Speech: (म्हणे) ‘आम्ही भारताचे तुकडे पाडून वर्ष १९७१ च्या युद्धातील आमच्या पराभवाचा सूड उगवू !’

पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख आसिम मुनीर यांची भारताच्या विरोधात गरळओक !

पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख आसिम मुनीर

वॉशिंग्टन – ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नामुष्की ओढवल्यानंतरही पाकिस्तानकडून विविध मार्गांनी आगळीक चालूच आहे. आता अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करतांना मुनीर यांनी ‘आम्ही भारताचे तुकडे पाडून वर्ष १९७१ च्या युद्धातील आमच्या पराभवाचा सूड उगवू’, अशी धमकी दिली आहे. पाकिस्तानी पत्रकार अजाज सय्यद यांनी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.

आसिम मुनीर त्यांच्या भाषणात म्हणाले,

१. ‘‘आम्ही चीनसमवेत मिळून भारताच्या विरोधातील युद्ध लढलो. भारताच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला चीनकडून शस्त्रे आणि सैनिकी उपकरणे मिळाली होती.’’

२. या वेळी मुनीर यांनी २२ एप्रिल या दिवशी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ मानण्यास नकार दिला.

३. आसिम मुनीर यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताच्या विरोधात पाच आघाड्यांवर लढाई लढली. त्यात ‘सायबर’ युद्धाचाही समावेश होता. पाकिस्तानचे ड्रोन गुजरात आणि देहलीपर्यंत पोचले होते. एवढेच नाही, तर भारताच्या रेल्वेची यंत्रणाही बाधित करण्यात आल्याचा दावा आसिम मुनीर यांनी केला.

संपादकीय भूमिका

असे दिवास्वप्न पहाणार्‍या मुनीर यांनी पाकचे लवकरच अनेक तुकडे होणे निश्चित आहे, हे आधी लक्षात ठेवावे !