वडापावसाठी वर्तमानपत्राचा वापर करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई !

आयुक्त तुकाराम मुंढे यांची कारवाई !

मुंबई – मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून अन्नपदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वडापाव आणि इतर तेलकट खाद्यपदार्थ यांच्या वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करणार्‍या विक्रेत्यांवर कठोर कारवाई चालू केली आहे. आरोग्याच्या सुरक्षेसाठी वडापाव किंवा भजी वर्तमानपत्रात गुंडाळून देणे नियमांनुसार पूर्णपणे प्रतिबंधित आहे.

१. वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरण्यात येणार्‍या शाईत शिसे आणि विषारी रसायने असतात. ही रसायने थेट अन्नात मिसळतात. त्यामुळे पचनाचे गंभीर विकार आणि कर्करोगासारखे आजार होण्याचा धोका संभवतो.

२. विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत की, वडापाव किंवा तत्सम खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी फूड-ग्रेड पेपर (अन्नपदार्थांसाठी वापरण्याचा सुरक्षित कागद) किंवा बटर पेपरचा वापर करावा. या नियमांचे उल्लंघन करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.

३. वडापाव विक्रेत्यांनी म्हटले की, वडापावचे मूल्य अल्प आहे. जर वेगळ्या प्रकारच्या कागदांचा वापर केला, तर वडापावचे मूल्य वाढवावे लागेल. केवळ वडापावच्या संदर्भातच ही कारवाई का ? रस्त्यावर किंवा कचराकुंडीच्या शेजारी बिर्याणी किंवा शोरमा यांसारखे खाद्यपदार्थ बनवून विकले जातात, त्यावर कारवाई होणार का ?

संपादकीय भूमिका

  • जे नव्या आयुक्तांना जमले, ते आजवर सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना का जमले नाही ?
  • ग्राहकांच्या आरोग्याविषयी असंवेदनशील असलेल्यांवरही कारवाई व्हायला हवी !