Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !

उत्तर २४ परगणा (बंगाल) – येथील बांगलादेशाच्या सीमेवरील हकीमपूर चौकीवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी घुसखोर परत बांगलादेशात जाण्यासाठी पोचत आहेत. सीमा सुरक्षा दल त्यांना थेट सीमेपलीकडे पाठवण्याऐवजी बायोमेट्रिक आणि इतर ओळखपत्रे घेऊन बंगालमध्ये निर्माण केलेल्या तात्पुरत्या आश्रयगृहात ठेवत आहे. अनेक लोकांकडे भारतीय कागदपत्रे आहेत; परंतु बांगलादेशी ओळखपत्रे नाहीत.

बांगलादेशी घुसखोर पहिल्यांदाच स्वतःहून ओळख पडताळणीसाठी येत आहेत !

सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, अवैध स्थलांतरितांना शोधण्याची आवश्यकता नाही. लोक स्वतः पडताळणी करण्यासाठी आणि ओळख नोंदवण्यासाठी तपासणी चौकीवर पोचत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात आणि पडताळणीला बराच वेळ लागत आहे.

स्थानिक संघटना ‘भुका मानुषेर अधिकार अभियाना’चे अध्यक्ष मोहर मंडल यांच्या मते, पडताळणीसाठी पोचलेले बहुतेक लोक बांगलादेशातील ६ जिल्ह्यांतील आहेत आणि ते बेकायदेशीरपणे भारतात आले होते.

गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार बंगालमध्ये ११ आश्रयगृहे उभारण्यात आली आहेत.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार या ११ केंद्रांमध्ये सध्या एक सहस्रापेक्षा अल्प लोक आहेत. येथे भोजन, डॉक्टर आणि मुलांसाठी मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत.

बांगलादेशाने दक्षता वाढवली, सीमेत येण्यापासून रोखत आहेत

‘बांगलादेश बॉर्डर गार्ड’ने सीमा सुरक्षा दलावर अवैध स्थलांतरितांना त्यांच्या देशाच्या सीमेत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा दावा आहे की, गेल्या २४ घंट्यांत असे १० प्रयत्न थांबवण्यात आले आहेत. २९ मे या दिवशी बंगालच्या यंत्रणांनी ३८६ संशयित अवैध स्थलांतरितांना कह्यात घेतल्याच्या बातमीनंतर बांगलादेशाने सीमेवरील गस्त आणि सैनिकांची संख्याही वाढवली आहे.