America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या

भारतीय तरुण अंशुल कुंचा याची गोळ्या झाडून हत्या

फिलाडेल्फिया (अमेरिका) – येथे मूळचा तेलंगाणाचा असलेला २८ वर्षीय भारतीय तरुण अंशुल कुंचा याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अर्धवेळ पिझ्झा वितरणाचे काम करणार्‍या अंशुल याला एका बनावट मागणीद्वारे बोलावण्यात आले आणि त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

अंशुल कुंचा गेल्या ४ वर्षांपासून अमेरिकेत रहात होता. तो तिथे एका नामांकित बहुराष्ट्रीय आस्थापनात पूर्णवेळ नोकरी करत होता. अतिरिक्त उत्पन्नासाठी तो शनिवार-रविवार यादिवशी पिझ्झा वितरणाचे काम करत होता. ६ जूनच्या रात्री त्याला एका ओसाड आणि निर्जन भागात पिझ्झा पोचवण्याची मागणी मिळाली. अंशुल जेव्हा त्या ठिकाणी पोचला, तेव्हा तिथे आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला.

त्यांनी अंशुलच्या डोक्यात एकापाठोपाठ एक अनेक गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला. या गोळीबारात अंशुलचा जागीच मृत्यू झाला. अंशुलकडून कोणतीही लूटमार झालेली नाही. त्याचे पैसे किंवा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या नसल्यामुळे या हत्येचा मुख्य उद्देश काय होता ?, याविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका

गेल्या काही वर्षांत विदेशात भारतियांच्या हत्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. याकडे भारत सरकारने गांभीर्याने पाहून पावले उचलली पाहिजेत !