वाढत्या मानसिक ताणामुळे ३ वर्षांत देशातील ४३८ सैनिकांच्या आत्महत्या !

कौटुंबिक दुरावा आणि मानसिक ताण ही मुख्य कारणे !

ए आय निर्मित चित्र

    छत्रपती संभाजीनगर – देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेचा मुख्य कणा असलेले निमलष्करी दलातील सैनिक सध्या मोठ्या मानसिक तणावातून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या अवघ्या ३ वर्षांत तब्बल ४३८ सैनिकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे, तर वर्ष २०१४ पासून आतापर्यंत २३ सहस्र ३६० सैनिकांनी स्वत:च्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. वर्ष २०२३ मध्ये १५७, तर वर्ष २०२५ मध्ये १३३ सैनिकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शासकीय आकडेवारीनुसार आत्महत्यांचे हे प्रमाण केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दल (सी.आर्.पी.एफ्.आणि बी.एस्.एफ्.) यांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

 सैनिकांच्या तणावाच्या विळख्यात ढकलणारी मुख्य कारणे

देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांची साथ सुटण्यामागे आणि त्यांनी नोकरीचा त्याग करण्यामागे खालील गंभीर कारणे अन्वेषणात समोर आली आहेत.

१. सततच्या आतंकवादविरोधी कारवाया, संवेदनशील भागात नियुक्ती आणि उच्च जोखमीच्या कर्तव्यामुळे सैनिकांवर २४ घंटे प्रचंड मानसिक दबाव असतो.

२. दीर्घकाळ घरापासून आणि कुटुंबापासून दूर रहावे लागल्याने मुलांचे शिक्षण, पालकांचे आजारपण अथवा घरगुती अडचणींच्या वेळी सैनिकांना उपस्थित रहाता येत नाही. हे दायित्व पार पाडता न आल्याची खंत त्यांच्या मनात घर करते.

३. काही वेळा कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून होणारा अवमान, सुट्यांचा अभाव, पदोन्नतीमधील अडथळे आणि तक्रारींचे वेळेत निवारण न झाल्याने सैनिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होते.

संपादकीय भूमिका

            सीमेवरील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांइतकाच ते शस्त्र चालवणार्‍या सैनिकांचे ‘मनोधैर्य आणि मानसिक स्तर’ उंचावणे, हे देशाच्या सार्वभौमत्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. सरकारने यावर तातडीने ठोस धोरणात्मक पावले उचलणे, ही काळाची आवश्यकता आहे !