‘शिवराज्याभिषेक’ ही हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरात नोंदवली गेलेली महत्त्वपूर्ण घटना आहे. आता तोच सोहळा विशाळगडावर साजरा करता येणार नाही. हा छत्रपती शिवरायांचा आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची बाजी लावणार्या सर्व मावळ्यांचा अपमान आहे.

१. मोगलांच्या काळची हिंदुस्थानची दुःस्थिती आणि छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करण्यामागील कारणमीमांसा
हिंदुस्थानात मोगलांची सत्ता परमोच्च स्थानावर होती. त्या वेळी मोगलांचे साम्राज्य, म्हणजेच हिंदुस्थानचे सरकार असे मानले जात होते. मोगलांशी आंतरराष्ट्रीय तहनामे आणि करार जे होत होते, ते हिंदुस्थानशी झालेले तहनामे अन् करार असल्याचे समजले जात होते. हिंदुस्थानातील हिंदु राजांना त्यांच्या राज्यावर स्वतःचा हक्क सांगता येत नव्हता. एखादा हिंदु राजा दिवंगत झाला, तर त्याच्या वारसाला मोगल सम्राटाकडून मान्यता घ्यावी लागत होती; कारण कोणताही हिंदु राजा मेला, तर त्याच्या मृत्यूसह त्याचे राज्य मोगलांच्या साम्राज्यात समाविष्ट केले जात होते. ‘ते राज्य जर राजाच्या वारसाला दिले, तर ते वंशपरंपरेने त्याला प्राप्त झालेले राज्य आहे’, असे समजले जात नव्हते, तर मोगल सम्राटाने नव्याने त्याला राज्य दिले आहे, असे समजले जात होते. त्यामुळे कुणालाही राज्यावर वडिलोपार्जित हक्क सांगता येत नव्हता. अशा राजाची नेमणूक एखाद्या मनसबीवर करण्यात येत होती. ‘मनसब’ याचा अर्थ ‘मोगल साम्राज्यातील नोकरी’, असा आहे. अशा राजाला त्याच्या राज्याबाहेर कुठेही नियुक्त केले जात होते. राजपूत राजांचे स्थानांतर किल्ल्याचे किल्लेदार म्हणून, तर कधी लष्करी ठाण्याचे ठाणेदार म्हणून त्यांची नेमणूक केली जात होती.
छत्रपती शिवरायांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. छत्रपती शिवरायांनी संभाजीराजांसाठी मोगलांच्या हाताखाली मनसब मिळवली होती. अशा पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि ते स्वतंत्र छत्रपती राजे झाले. ही घटना म्हणजे मोगली सत्तेला दिलेले प्रचंड आव्हान होते. मराठ्यांचे राज्य औरंगजेबाला मरेपर्यंत स्वतःच्या कह्यात घेता आले नाही किंवा मराठ्यांचे राज्य त्याला नष्ट करता आले नाही. औरंगजेबाच्या साम्राज्याचा विस्तार पहाता मराठ्यांचे राज्य अत्यंत छोटे राज्य होते. तरीही छत्रपती शिवरायांनी मोगल साम्राज्यावर स्वतःचा वचक बसवला होता.

२. शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनुमती न देणे, हे विजयी परंपरा विस्मृतीत टाकण्यासाठी पडलेले पाऊल
राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या नाण्यांची निर्मिती केली. स्वतःचा शक चालू केला. या दोन्ही गोष्टी म्हणजे स्वतंत्र राज्याची चिन्हे होती. बुंदेल छत्रसाल यानेही महाराजांचे अनुकरण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याला शस्त्रविद्या शिकवली. त्याला आशीर्वाद दिला. छत्रसालाने मध्य भारतातील बुंदेलखंडात स्वराज्याची स्थापना करत छत्रपती शिवरायांचे अनुकरण केले. वर्ष १६७४ मध्ये छत्रपती शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला, तर बुंदेलखंडच्या छत्रसालाने वर्ष १६८७ मध्ये राजा म्हणून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. इस्लामी राजवटीत जे हिंदु संस्कार लुप्त झाले होते, ते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे पुनश्च दिमाखात चालू झाले.
छत्रपती शिवरायांनी पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण केली. यातून निर्माण झालेले स्वराज्य हे हिंदुस्थानातील पहिले स्वराज्य आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील ही अभिमानास्पद अशी घटना आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक, म्हणजे विजयी परंपरेचे प्रतीक आहे. ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनुमती न देणे, याचा अर्थ विजय परंपरेचे स्मरण विस्मृतीत जाण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे’, असेच म्हणावे लागेल.
३. छत्रपती शिवरायांचे गड हे शौर्य, हिंदवी स्वराज्य आणि राज्याभिषेक यांचे साक्षीदार
परकीय आक्रमकांनी आपल्यावर केवळ राजकीय सत्ताच प्रस्थापित केली, असे नाही, तर हिंदु सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा पूर्णपणे नष्ट करण्याचे अश्लाघ्य कृत्य केले आहे. अनेक मंदिरांचा विध्वंस करून मूर्तीभंजनाचे कुकृत्य करणार्या आक्रमकांना परास्त करून हिंदु सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा सुरक्षित रहावी, यासाठी छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करवून घेतला. छत्रपती शिवरायांचे गड त्यांचे शौर्य, हिंदवी स्वराज्य आणि राज्याभिषेक यांचे साक्षीदार आहेत.
४. शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनुमती न देणे, हा बाजीप्रभु देशपांडेंसह सर्व मावळ्यांचा अपमान !

छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुखरूप पोचावेत; म्हणून बाजीप्रभु देशपांडे निर्धारपूर्वक घोडखिंडीत शत्रूला अडवण्यासाठी मावळ्यांसह उभे राहिले. सिद्दि मसूदला एक पाऊलसुद्धा पुढे टाकू दिले नाही. सलग २१ घंटे बाजीप्रभु मावळ्यांसह शत्रूशी झुंजत होते. त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा वहात होत्या; पण त्यांनी खिंड लढवली आणि शेवटपर्यंत शत्रूला अन् मृत्यूलाही रोखून धरले. छत्रपती शिवरायांना दिलेले वचन अखेरच्या श्वासापर्यंत बाजीप्रभूंनी पाळले. छत्रपती शिवराय विशाळगडावर सुखरूप पोचल्याचे कळताच त्यांनी प्राण सोडले.
गजापूरची घोडखिंड बाजीप्रभु देशपांडे यांच्या रक्ताने न्हाऊन निघाली. त्यांच्या रक्ताने आणि बलीदानाने पावन झालेल्या या खिंडीला ‘पावनखिंड’, असे नाव पडले. विशाळगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनुमती न देणे, म्हणजेच छत्रपती शिवराय आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्यासह सर्व मावळ्यांचा अपमान आहे.
५. मराठी भाषेत घुसलेल्या अरबी आणि फारसी शब्दांची हकालपट्टी करून छत्रपती शिवरायांनी राजव्यवहार कोश सिद्ध केला अन् परकीय शब्दांना संस्कृत प्रतिशब्द दिले. स्वत्व आणि स्वाभिमान जोपासला. शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रतिबंध, म्हणजे स्वत्व आणि स्वाभिमान यांना तिलांजली देण्यासारखे आहे.
६. राज्याभिषेक सोहळ्याला अनुमती नाकारणे, म्हणजे शौर्य, पराक्रम आणि विजिगीषू वृत्ती यांना विरोध !
छत्रपती शिवरायांनी छत्रसालाला पत्राद्वारे केलेला उपदेश पुढीलप्रमाणे आहे, ‘छत्रसाला, आपली भूमी जिंकून देशावर राज्य कर. तुझ्यापासून आम्ही वेगळे नाही. मोगलांना मार. दिल्लीच्या सैन्याचा पराभव कर. तुर्कांची पर्वा करू नकोस. त्यांच्याकडून विवेकाची अपेक्षा करू नकोस. मी तुर्कांविरुद्ध तलवार हाती घेतली आहे. तूसुद्धा तुझ्या मुलखात जाऊन सैन्य जमा कर आणि तलवारीच्या बळाने तुर्कांचा संहार कर.’ असे असतांना छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनुमती नाकारणे याचा अर्थ शौर्य, पराक्रम आणि विजिगीषू वृत्ती यांना केलेला विरोध असेच म्हणावे लागेल.
‘हिंदु समाजाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक म्हणून इस्लामी राजवटीचा नाश करणे’, हाच छत्रपती शिवरायांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेमागचा हेतू होता. तो छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे पूर्णत्वास गेला. अशा सोहळ्याला अनुमती नाकारणे, म्हणजे त्यांच्या प्रतिज्ञेचा हेतू धिक्कारल्यासारखा आहे.
७. …हा तर सार्वभौमत्वावर आणि स्वातंत्र्यावर घाला होय !
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा आणि बकरी ईद यांमध्ये जमीन आस्मानाचा भेद आहे. बकरी ईदला अनुमती नाकारतांना त्यामागे असलेली हिंसा कारणीभूत आहे. त्यासह विशाळगडासारखे पवित्र क्षेत्र भ्रष्ट करण्याचा हा प्रकार आहे. शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्राभिमान जागवणारा, राष्ट्ररक्षणार्थ तळहातावर शीर घेऊन लढण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करणारा आहे. परकीय आक्रमकांपासून देश, संस्कृती, परंपरा आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण यांसाठी मिळणारा ऊर्जास्रोत आहे. हा ऊर्जास्रोत तोडणे, म्हणजे हिंदवी स्वराज्याला नाकारणे आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला झालेला विरोध राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आणि स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे. आपण कोणत्या गोष्टीला प्रतिबंध केला आहे, याची जाणीव निर्माण व्हावी आणि अशा प्रकारचा अक्षम्य अपराध पुनश्च घडू नये, हा शुद्ध हेतू ठेवून हा लेख लिहिला आहे. यापेक्षा अधिक सांगणे न लागे. (७.६.२०२५)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक, डोंबिवली.
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !