निरोगी जीवनासाठी व्यायाम ६३
‘आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ केले असले, तरी त्यामुळे शरिराची हालचाल न्यून झाली आहे. दिवसभर बसून काम केल्यामुळे निर्माण होणारी ‘बैठी जीवनशैली’ आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण करते. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ‘व्यायाम’ हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. या लेखमालेत आपण बैठ्या जीवनशैलीचे आपल्या आरोग्यावर होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम, त्याची कारणे अन् दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना’ इत्यादी सूत्रे समजून घेणार आहोत. या लेखात ‘बैठी जीवनशैली आणि सक्रीय जीवनशैली यांचे परिणाम अन् त्यांवरील उपाय’ यांविषयी पाहूया.

१. बैठी जीवनशैली
बैठी जीवनशैली, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात अधिकांश वेळ बसून किंवा झोपून रहाणे, तसेच थोडे किंवा मुळीच श्रम न करणे होय. बराच काळ बसून रहाणे किंवा अधिक वेळ झोपून घालवणे, तसेच व्यायाम न करणे यांमुळे दिनचर्या निष्क्रीय होते आणि जीवन गतीहीन होते.
२. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या हालचाली न्यून होऊन बैठी जीवनशैली वाढणे
पूर्वीच्या काळी माणसाला दैनंदिन कामे करण्यासाठी विविध प्रकारे श्रम करावे लागत असत, उदा. पाटा-वरवंट्याने चटणी करणे, जात्यावर दळणे, चुलीवर स्वयंपाक करणे, हाताने कपडे धुणे किंवा शेतातील कामे करणे. माणसांच्या श्रमप्रधान कामांमुळे शारीरिक हालचाली सहजपणे होत होत्या. कालांतराने तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘मिक्सर’, धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन), गिरणी, मायक्रोवेव्ह (अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे विजेवर चालणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण) यांसारख्या उपकरणांनी शारीरिक श्रम न्यून केले. लहान मुलांचे मैदानी खेळ आता भ्रमणभाष (मोबाईल) किंवा संगणक यांच्या स्क्रीनवर सीमित झाले आहेत. लोक चालत जाणे किंवा सायकल वापरणे याऐवजी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने प्रवास करत आहेत. या सुविधांमुळे माणसाच्या शारीरिक हालचाली न्यून झाल्या आहेत. परिणामी बैठी जीवनशैली वाढीस लागली आहे.

३. बैठ्या जीवनशैलीविषयी अपसमज आणि त्याचे परिणाम
काही लोक म्हणतात, ‘‘बसून राहिल्याने हानी होत नाही; उलट शरिराला विश्रांती मिळते. त्यात चूक काय आहे ?’’ प्रत्यक्षात मानवी शरीर सदृढ रहाण्यासाठी ते कार्यरत ठेवणे आवश्यक आहे. अतीश्रम झाल्यावर शरिराला थोडा वेळ विश्रांती देणे, हे पुनर्बल मिळवण्यासाठी आवश्यक आहे; पण अती विश्रांती, म्हणजे दीर्घकाळ हालचाल न करता बसणे किंवा झोपणे शरिरासाठी हानीकारक ठरते. त्यामुळे स्नायू दुर्बल होतात, रक्ताभिसरण मंदावते आणि शरिरातील चयापचयाची क्षमता न्यून होते.

४. सक्रीय जीवनशैली
बर्याचदा ‘आपण पुष्कळ सक्रीय आहोत’, असा अनेकांचा अपसमज असतो, उदा. ‘सकाळी केवळ ४५ मिनिटे व्यायाम केल्यावर सक्रीय आहोत’, असे वाटणे. व्यायाम करणे चांगले आहे; पण जर तुम्ही दिवसभरात ८ – १० घंटे सतत बसून घालवत असाल, तर ती ‘सक्रीय जीवनशैली’ नाही. आपल्या शरिराला दिवसभर अधून मधून हालचाल आणि सक्रीयतेची आवश्यकता असते.
५. शारीरिक क्रिया आणि त्यासाठी लागणार्या ऊर्जेच्या प्रमाणावरून सक्रीयता ठरवली जाणे
एखाद्या व्यक्तीची ‘बैठी जीवनशैली आहे कि सक्रीय जीवनशैली आहे ?’, हे ठरवण्यासाठी व्यक्तीकडून होणार्या क्रियांचे श्रमानुसार वर्गीकरण, शारीरिक क्रिया आणि त्याला लागणार्या ऊर्जेचे प्रमाण पुढील सारणीत दिले आहे.

टीप – शारीरिक क्रियांसाठी वापरण्यात येणार्या शरिराच्या ऊर्जेचे प्रमाण मोजण्यासाठी MET (Metabolic Equivalent of Task) हे एकक (युनिट) वापरले जाते. १ MET म्हणजे संपूर्ण विश्रांतीच्या स्थितीत असतांना शरिराला लागणार्या ऊर्जेचे मोजमाप आहे.
‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार (WHO नुसार) ज्या क्रियांसाठी १.५ MET किंवा त्याहून अल्प ऊर्जा लागते, त्याला ‘बैठी जीवनशैली’ म्हणतात. त्यामुळे आपले शरीर ‘अल्प ऊर्जा व्यय’ करण्याच्या स्थितीत जाते. ही स्थिती दीर्घकाळ चालू राहिली की, ती अनेक रोगांना आमंत्रित करते. यावरून आपल्याला मध्यम ते तीव्र श्रमाच्या कृती करणे आवश्यक आहे.
६. निष्क्रीय जीवनशैलीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक !
नियमित व्यायाम केल्याने होणारे आरोग्यदायी लाभ ज्ञात असूनही ‘शारीरिक निष्क्रीयता’ ही जागतिक महामारी म्हणून ओळखली जाते आणि ती अकाली मृत्यूच्या ४ मुख्य कारणांपैकी एक आहे. सध्या जागतिक स्तरावर ३१.१ टक्के प्रौढ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निष्क्रीय आहेत. त्या आरोग्यासाठी आवश्यक तेवढ्या शारीरिक हालचाली करत नाहीत. एखादी चारचाकी गाडी अनेक वर्षे चालवली नाही, तर ती निकामी होते. त्याचप्रमाणे आपण शरिराची ऊर्जा वापरली नाही, तर शरिराचे अवयव आणि यंत्रणा निकामी होते. शरीर क्रियाशील ठेवले की, त्याच्या चयापचयाची क्रिया (मेटॅबॉलिजम) सुधारते, म्हणजे अन्न लवकर पचते आणि शरिरात चरबी साठत नाही. आपली ऊर्जा सतत वापरली जाते आणि आपण अधिक कार्यक्षम रहातो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रतिदिन व्यायाम आणि दिवसभर क्रियाशील रहाणे अत्यंत आवश्यक असते. निष्क्रीय जीवनशैलीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यायाम हा प्रभावी उपाय आहे.’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (१३.४.२०२५)
या मालिकेतील आधीचे लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा →
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?