गीता आणि वेद यांचा जगभर प्रसार करणारे आधुनिक राष्ट्रसंत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि !

‘भारतात अनादी काळापासून संतपरंपरा चालू आहे. संतांनी वेळोवेळी हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षणही केले आहे. याच दिव्य परंपरेचे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि वाहक आहेत. स्वामीजींचे संपूर्ण जीवन धर्म, संस्कृती, समाज तथा राष्ट्र यांना समर्पित आहे. वेद आणि गीता यांचा प्रसार जगभर व्हावा, यासाठी त्यांनी विविध शाळा अन् संस्था स्थापन केल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करणे असो, श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी निधी समर्पण अभियानात सहभागी होणे असो वा महाराष्ट्रात शिवशाहीचे राज्य यावे, यासाठी त्यावर आधारित ७५ प्रवचने घेणे असो; या भूतलावर रामराज्य येण्यासाठी विविध माध्यमांतून कार्य करणारे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि हे आधुनिक राष्ट्रसंतच आहेत !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा परिचय

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे मूळ नाव किशोर मदनगोपाल व्यास आहे. त्यांचा जन्म १९४९ मध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर या छोट्याशा गावात झाला. एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या स्वामीजींना त्यांच्या पालकांकडून प्राचीन आध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास, भक्ती आणि कटीबद्ध धार्मिकता यांचा वारसा मिळाला. आपल्या मूळ गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘स्वाध्याय परिवारा’चे प.पू. डॉ. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या ‘तत्त्वज्ञान विद्यापिठा’त प्रवेश घेतला. प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीजींनी तत्त्वज्ञान विषयात पदवी मिळवली. त्यानंतर वाराणसी येथे शिकत असतांना त्यांना प्रसिद्ध वेदमूर्ती डॉ. विश्वनाथजी देव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘दर्शनाचार्य’ ही प्रतिष्ठित पदवी प्राप्त केली.

१२० वर्षांच्या कौटुंबिक परंपरेला पुढे नेत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी त्यांच्या मूळ गावी गीतेवर प्रथम प्रवचन केले. त्या वेळी ते केवळ १७ वर्षांचे होते. तेव्हापासून आजतागायत ते श्रीमद्भागवत, गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वसिष्ठ इत्यादी प्राचीन ग्रंथांवर प्रवचन देत आहेत. त्यांची मंत्रमुग्ध करणारी भाषणे केवळ भारतातच नव्हे, तर नेपाळ, कॅनडा, अमेरिका, ग्रेट ब्रिटन इत्यादींसह अनेक देशांत होत असतात. कालांतराने कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य ब्रह्मलीन प.पू. स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्याकडून अनुग्रह दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रह्मलीन महामंडलेश्वर प.पू. स्वामी श्री सत्यमित्रानंद गिरि महाराज यांच्याकडून ‘परमहंस संन्यास दीक्षा’ प्राप्त केली. त्यामुळे पूर्वी आचार्य किशोरजी व्यास म्हणून ओळखले जाणारे स्वामीजी औपचारिकपणे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि म्हणून ओळखले जाऊ लागले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली आहे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

सनातन संस्था काळाच्या प्रवाहाविरोधात कंबर कसून उभी राहिली. २५ वर्षांपूर्वी ‘सनातन’ हा शब्दही उच्चारणे कठीण होते, अशा काळात संस्थेने व्यापक धर्मकार्य आरंभले. भूमी, परंपरा आणि त्या परंपरा जपणारा समाज, या ३ गोष्टी जेथे असतात, त्याला ‘राष्ट्र’ म्हणतात. हे सत्यात उतरवून दाखवावे लागते. ते सनातनने केले. सनातन संस्थेचे वाढणारे कार्य पहाता, ‘हे कार्य आता थांबणार नाही, ते उत्तरोत्तर वाढतच जाईल आणि एक दिवस हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साकार करील’, याची ग्वाही मिळते. पूर्वी ‘सनातन’ हा शब्द उच्चारला जात नव्हता. आता मात्र अगदी राजधानी देहलीत ‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्याची मागणी होत आहे. हा ‘सनातन’ शब्द गोव्याहून (म्हणजे ‘सनातन संस्था’ या नावामुळे) देहलीत गेला आहे. ही ‘सनातन’ या शब्दाची शक्ती आहे. २५ वर्षांत सनातन संस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली, अनेक संकटे आली. आज सनातनच्या तपाचा (म्हणजे व्यापक धर्मकार्याचा) परिणाम आपल्याला पहायला मिळत आहे. सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली आहे.

२. वेदांचे रक्षण आणि राष्ट्रनिर्माण यांसाठी विविध संस्थांची स्थापना 

२ अ. ‘गीता परिवारा’च्या माध्यमातून देश-विदेशात भगवद्गीतेचा प्रसार ! : वर्ष १९८६ मध्ये प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी ‘गीता परिवार’ या संस्थेची स्थापना केली. यात ८ सहस्रांहून अधिक सेवाभावी कार्यकर्ते सहभागी आहेत. ‘गीता परिवारा’च्या माध्यमातून शेकडो शिबिरे तथा सहस्रो ‘संस्कार केंद्रे’ यांचे संचालन केले जाते. या परिवाराकडून सहस्रो बालकांना योग शिक्षण, विद्यालयांमध्ये नैतिक शिक्षण, भारतीय पौराणिक महानाट्यांचे मंथन, गीता महोत्सव, योग महोत्सव अशा विशाल कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (शेष पृष्ठ ६ वर)

‘लर्न गीता’च्या (‘गीता शिका’च्या) माध्यमातून १८१ देशांतील १३ भाषांमध्ये ८ लाख गीताप्रेमींना निःशुल्क ‘ऑनलाईन’ गीता प्रशिक्षण दिले.

२ आ. ‘महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान’ची स्थापना : वेदवाङ्मय हे सर्वाधिक श्रेष्ठ वाङ्मय आहे. वेदांचे अध्ययन करणे, अध्यापन करणे आणि त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन स्वामीजींनी वर्ष १९९० मध्ये आळंदी (जिल्हा पुणे) येथे ‘महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान’ संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे ३७ वेदविद्यालये चालवली जातात. सध्या ८० अध्यापकांच्या माध्यमातून १ सहस्र ९२९ विद्यार्थी निःशुल्क वेदांची शिक्षा प्राप्त करत आहेत. प्रतिवर्षी ‘महर्षि वेदव्यास पुरस्कार’, अग्निहोत्रींचा सन्मान, वृद्ध पुरोहितांना निवृत्तीवेतन देणे इत्यादी बहुविध कार्य करण्यात येते. प्रतिष्ठानच्या वतीने भारतातील १४ राज्यांमधील ५० वैदिक शाळांना अनुदान दिले जाते आणि २ सहस्र ५०० हून अधिक वैदिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

२ इ. अन्य उपक्रम : ‘श्रीकृष्ण सेवा निधी’च्या अंतर्गत गरजू लोकांना विविध प्रकारचे साहाय्य करण्यात येते. ‘श्रीकृष्ण सेवा निधी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह रुग्णसेवा तथा अन्य धर्मकार्य करण्यात आले. ‘संतश्री ज्ञानेश्वर गुरुकुला’च्या माध्यमातून त्यांनी प्रतिवर्षी ऋषिकेश येथे ‘गीतासाधना’ शिबिरांचे आयोजन केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वास्तव्यधाम श्री क्षेत्र देहू स्थित गाथा-मंदिर प्रांगणात ‘समर्थ रामदासस्वामी साधक निवास भवना’ची निर्मिती केली. बीड येथील ‘गणेश समन्वय आश्रमा’त सर्व जातींच्या अनाथ बालकांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नवीन आदर्श निर्माण केला गेला.

२ ई. ‘संतश्री ज्ञानेश्वर गुरुकुला’ची स्थापना : ‘ज्ञानेश्वरी’मध्ये असलेले अमूल्य ज्ञान भारतातील पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी प.पू. स्वामीजींनी वर्ष २००० मध्ये आळंदी येथे ‘संतश्री ज्ञानेश्वर गुरुकुल’ची स्थापना केली. हे गुरुकुल वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य भोजन पुरवते आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करते.

हे ही वाचा → Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : जिंकलो, तरच जगू शकू ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

३. अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे संचालन

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष म्हणून प.पू. स्वामीजी श्रीराममंदिराच्या उभारणीत बहुमोल योगदान देत आहेत. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्या येथे अभिजित मुहूर्तावर नियोजित वेळेनुसार रामलल्लाचा (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे संचालन प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले. या वेळी स्वामीजींनी पंतप्रधान मोदी यांना श्रीरामाचे चरणतीर्थ पाजून त्यांच्या ११ दिवसांच्या उपवासाचे मातृहृदयी ममतेने पारणे फेडले. त्या वेळी त्यांच्या मनात वात्सल्यभाव जागृत झाला आणि त्यांचा कंठ दाटून आला.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷