Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : जिंकलो, तरच जगू शकू ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

सनातन धर्माची परंपरा वैज्ञानिक आहे. विश्वात सनातन विचारच संपूर्णतः वैज्ञानिक विचार आहेत, यावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. जी व्यक्ती, समाज, निसर्ग आणि परमात्मा यांचे संतुलन करते, तो सनातन धर्म आहे. विज्ञान आणि निसर्ग यांचे नियम जसे सर्वत्र सारखे असतात, तसे सनातन धर्माचेही नियम सर्वत्र सारखेच असतात. सनातन धर्माच्या नियमांमध्ये संपूर्ण विश्वाचे कल्याण करण्याची क्षमता आहे.

स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता असल्यामुळे आपला देश धर्मशाळा बनला आहे. आपल्याला मुक्त वातावरण कोण देणार ? आता आवश्यकता आहे, समाजाला प्रतिकाराच्या कर्तव्यासाठी सिद्ध करण्याची ! ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागले गेलो, तर कापले जाऊ) याऐवजी आता ‘जितेंगे तो जी पायेंगे’ (जिंकलो, तर जगू शकू) हे लक्षात घेतले पाहिजे. सनातन धर्माच्या आड येणारे सर्व कायदे ध्वस्त करून आपले कायदे बनवू. आपल्या देशात कोणते कायदे असले पाहिजेत ?, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

सनातनच्या एका हातात माळा आणि एका हातात भाला !

‘सनातन संस्थेने हिंदु धर्म, समाज यांसाठी केलेले कार्य आणि सनातन म्हणजे धर्माचा बोध करून देणारी एकमेव संस्था आहे’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि !

मी काही वर्षांपूर्वी जेव्हा ‘सनातन प्रभात’ हा शब्द वाचला, तेव्हा मला शंका आली होती, असे वर्तमानपत्र वाचणारे किती जण असतील ? हे कसे यशस्वी होतील ? पण सनातन संस्थेच्या कार्याने आता माझ्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. सनातन संस्थेने जागृती केली. सनातन धर्माचा बोध करून देणारी संस्था या रूपात मी तिला पहातो.

सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे आहे. ‘भगवद्गीता’ हा अध्यात्माचा ग्रंथ युद्धाच्या भूमीवर सांगितलेला आहे. सनातन संस्थेनेही त्याप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली आहे. मी या महोत्सवामध्ये युद्धकलांचे प्रदर्शन पाहिले. मला वाटते, ‘देशातील सर्व संतांनी त्यांच्या शिष्यांना हे शिकवले पाहिजे.’ सनातन संस्थेच्या साधनेत एका हातात जपमाळा, तर दुसर्‍या हातात भाला आहे. केवळ जप करत बसलो, तर काम होणार नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णानेही अर्जुनाला सांगितले होते, ‘माझे स्मरण कर; पण युद्ध कर !’


‘सनातन प्रभात’च्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ विशेषाकांचे प्रकाशन !

डावीकडून उपसंपादक श्री. उमेश नाईक, समूह संपादक श्री. योगेश जलतारे, अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय, संतोष भट गुरुजी, श्री. सतीश महाना, रस आचार्य पू. डॉ. धर्मयश, महंत श्री राजू दास महाराज, श्री देवकीनंदन ठाकूर, महंत पू. रवींद्र पुरी महाराज
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित श्री श्री १००८ स्वामी बालकानंद गिरि ‘महाराज श्री’, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, स्वामी आनंद स्वरूप महाराज, श्री. दर्शक हाथी, श्री. अभय वर्तक आणि श्री. सुरेश चव्हाणके

१ सहस्र वर्षांपूर्वीच्या सोमनाथ शिवलिंगाचे उपस्थितांना दर्शन ! 

सोरटी सोमनाथ येथील १ सहस्र वर्षांपूर्वीच्या मूळ शिवलिंगाचे अवशेष

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे आंतरराष्ट्रीय संचालक श्री. दर्शक हाथी यांनी सोरटी सोमनाथ येथील १ सहस्र वर्षांपूर्वीच्या मूळ शिवलिंगाचे अवशेष विशेषकरून महोत्सवासाठी आणले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह उपस्थित संत आणि वक्ते यांनी व्यासपिठावर त्याचे भावपूर्ण दर्शन घेतले, तसेच उपस्थितांनीही ‘स्क्रिन’द्वारे दर्शन घेतले.


‘शिवतेज आजही जिवंत आहे’, हे दाखवणारी शिवकालीन क्षात्रतेजयुक्त चित्तथरारक प्रात्यक्षिके !

‘सव्यासाची गुरुकुलम्’च्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, लाठीची कैची, भाला कैची, दांडपट्टा, दांडपट्टा कैची, स्त्रीचे शत्रूपासून रक्षण करणारे लाठी युद्ध, तलवारबाजी, ‘विटा शस्त्र’ आदी शस्त्रकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.