Palakkad Naming School Of HH Hedgewar : पलक्कड (केरळ) येथील शाळेला पू. हेडगेवार यांचे नाव देण्याला काँग्रेस आणि माकप यांचा विरोध

पलक्कड नगरपालिकेत भाजप आणि विरोधी पक्ष यांच्या नगरसेवकांमध्ये वाद (डावीकडे) पू. हेडगेवार (उजवीकडे)

पलक्कड (केरळ) – भाजप सत्तेत असलेल्या पलक्कड नगरपालिकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव एका विशेष शाळेला द्यायचे आहे. याला काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी तीव्र विरोध केला आहे.

१. अपंग मुलांसाठी बांधल्या जाणार्‍या शाळेला हेडगेवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेने संमत केला. या वेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ‘हेडगेवार कोण आहेत ?’ असा प्रश्न विचारले. या वेळी भाजप आणि विरोधी पक्ष यांच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला.

२. नगरपालिकेच्या अध्यक्षा आणि भाजपच्या नेत्या प्रमिला शशिधरन् यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘निर्णयात कोणताही पालट होणार नाही. काँग्रेस आणि माकप यांनी कितीही विरोध केला तरी पलक्कडमध्ये भाजप सत्तेत आहे आणि आम्ही संस्थांना नावे देऊ.’ या वेळी शशिधरन् यांनी वर्ष १९२१ च्या मोपला हत्याकांड घडवून आणणारा वरियमकुन्नाथ कुन्हाहम्मद हाजी याचा संदर्भ दिला. ‘मलप्पूरम्मधील टाऊन हॉलला हाजी याचे नाव दिलेले तुम्हाला चालते. तो स्वातंत्र्यसैनिक होता का ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

३.  पलक्कडचे काँग्रेस आमदार राहुल ममकुट्टाथिल म्हणाले की, आम्ही या निर्णयाला राजकीय आणि कायदेशीररित्या विरोध करू. भाजप आणि संघ त्यांचे धार्मिक विचार केवळ हिंसाचाराद्वारेच राबवू शकतात.

४. माकपने नगरपालिकेबाहेर निदर्शने केली. पक्षाचे जिल्हा सचिव ई.एन. सुरेश बाबू म्हणाले की, आम्ही भाजपला शाळेला हेडगेवारांचे नाव ठेवू देणार नाही.’ बाबू यांनी ‘काँग्रेस या सूत्रावर केवळ नाटक करत आहे. ती संघाला साहाय्य करत आहे’, असा आरोपही केला.

५. यापूर्वी कोल्लममधील श्री कृष्णस्वामी मंदिरात हेडगेवार यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले, तेव्हाही वाद निर्माण झाला होता. हे मंदिर राज्य सरकारच्या देवस्वोम् बोर्डाच्या अखत्यारीत आहे. बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

संपादकीय भूमिका

पू. हेगडेगार या देशाचे महापुरुष होते आणि त्यांचे नाव शाळेला देण्यात येत असेल, त्याच चुकीचे काय ? गांधी परिवारातील अनेकांनी खर्‍या अर्थाने देश आणि समाज यांच्यासाठी काही केलेले नसतांना त्यांची नावे अनेक ठिकाणी देण्यात आली आहेत, त्याचे काय ?